नेफा आघाडीवरील अभ्यास करताना साहेबांच्या असं लक्षात आलं की, थोडकेच कार्यक्षम अधिकारी या युद्धात लढले; पण संरक्षणमंत्र्याच्या आशीर्वादानं अधिकारपदावर चढलेले अधिकारी पुळचट निघाले.
८ एप्रिल १९६३ ला संसदेत बोलताना साहेब म्हणाले, ''वरिष्ठ अधिकारी आणि प्रत्यक्ष आघाडीवर लढणारा सैनिक यांचे संबंध कसे आहेत यावर युद्धाचे यश अवलंबून असते. युद्धनीतीमध्ये या संबंधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. एक शूर सेनानी म्हणतो, शूर सैन्य आणि नेभळट सैन्य असा भेदभाव असूच शकत नाही. भेदभाव असतो तो कर्तबगार अधिकारी - अकार्यक्षम अधिकारी. यशस्वी अधिकारी सैनिकांमध्ये विश्वास निर्माण करतो व योग्य नेतृत्व देतो. या नेतृत्वावर सैनिकांचा विश्वास बसला की यश दूर राहत नाही. ही परस्परांमधील विश्वासाची भावना आपल्या सैन्यामध्ये वाढीस लागत आहे. हे देशाच्या दृष्टीनं सुचिन्ह आहे.''
साहेबांनी लष्करी छावण्यांना भेटी देण्याचं ठरविलं. राजस्थानातील झुनझुनू गावी हजारो माजी सैनिक संरक्षणमंत्र्याचा परिचय व स्वागतासाठी एकत्र आलेले. साहेबांसोबत मुख्यमंत्री सुखाडीया. या परिसराची ओळख लष्करी जवार पुरविणारा परिसर म्हणून होती. हजारो निवृत्त सैनिक पराक्रमाची पदके आपल्या छातीवर लटकवून साहेबांच्या स्वागताकरिता हजर होते. कमरेला तलवारी लटकवलेल्या तरुण जवानांचा त्यात भरणा होता. या गावचं वातावरण शौर्याची परंपरा सांगणारं होतं. साहेबांची गाडी कार्यक्रमस्थळी पोहोचताच 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' या ललकार्यांनी सर्व परिसर दुमदुमून गेला.
एक सेवानिवृत्त लष्करी जवान पुढे आला. त्याने साहेबांना लष्करी पद्धतीनं सॅल्युट ठोकला.
तो जवान सांगू लागला, ''माझे दोन पुत्र नुकत्याच झालेल्या युद्धात मारले गेले व तिसरा लापता आहे. माझ्या दोन पुत्रांनी माझ्या घराण्याची इज्जत व परंपरा आपल्या शौर्यानं वाढविली व ते धारातीर्थी पडले. माझा असा विश्वास आहे की, माझ्या तिसर्या पुत्रानं असाच पराक्रम करून देशासाठी बलिदान केलं असावं.''
या वेळी साहेबांना आपल्या जिल्ह्यातील अपशिंगे या गावाची आठवण झाली. या गावातील व परिसरातील अनेक पुत्र भारतमातेच्या संरक्षणाकरिता कामी आलेले आहेत. साहेबांच्या डोळ्यांत अश्रु तरारले. भरलेल्या डोळ्यांनी साहेब दोन पावले पुढं आले.
''चिन्यांच्या कैदेत मृत्यू येण्यापेक्षा लढता लढता माझा मुलगा धारातीर्थी पडला हे ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे.'' असं म्हणणारा वृद्ध लष्करी जवान जे.सी.ओ. ला साहेबांनी गळ्याशी लावलं. त्याला मिठी मारली. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकारांनी परिसर दणाणून गेला. साहेबांचा फेटा बांधून व तलवार भेट देऊन गावकर्यांनी सन्मान केला.
तवांग, सिक्कीम, नथुलाखिंड येथील लष्करी तळांना साहेबांनी भेटी दिल्या. नथुलाखिंडीपासून दुर्बिणीनं पाहिल्यास चीनच्या सैनिकांच्या हालचाली टिपता येतात. साहेब शिवाजी महाराजांच्या प्रांतातील मराठा संरक्षणमंत्री आहेत याची कल्पना येथील सैनिकांना होती. येथील सैनिकांनी साहेबांचे स्वागत 'शिवाजी महाराज की जय' या घोषणांनी केलं. साहेब सीमेलगतच्या लष्करी तळावरील सैनिकांत मिसळत. त्यांचे सुखदुःख समजावून घेत. त्यांच्या अडीअडचणी तत्काळ दूर करीत.