थोरले साहेब - १८५

आपल्या भावना व्यक्त करताना साहेब म्हणाले, ''तुमच्या माझ्या विश्वासाचा प्रश्न नाही तर प्रश्न आहे देशातील जनतेच्या विश्वासाचा.  संरक्षणमंत्रीपदावर पंतप्रधानांचा विश्वास नाही अशी भावना निर्माण झाली तर देशाची सुरक्षितता धोक्यात सापडेल.  आपला एकमेकांवर विश्वास असल्याशिवाय देश एकदिलानं शत्रूला सामोरा जाऊ शकणार नाही.  आज संरक्षण खात्यात जे बेदिलीचं वातावरण आहे ते देशाच्या दृष्टीनं घातक आहे.''

''टी.टी.के. आणि पटनाईक यांना पायबंद घातला जाईल तसेच संरक्षणमंत्री म्हणून तुमजी जी प्रतिष्ठा आहे तिला कुठेही तडा जाणार नाही याची काळजी घेण्यात येईल'' असा विश्वास नेहरूजींनी साहेबांना दिला आणि लगेच साहेबांनी घेतलेल्या निर्णयाविषयी विचारपूस करण्यास सुरुवात केली.

हेंडरसर-ब्रुक्स कमिटीची कार्यप्रणाली, ''नेफा चौकशीचे खापर लष्करी अधिकारी दिल्लीतील राजकारण्यावर फोडतील.''

यावर साहेब म्हणाले, ''तसे काही होणार नाही, असं मला लष्करी अधिकार्‍यांनी आश्वासन दिलं आहे.''

कौल यांच्या राजीनाम्याबद्दलही दोघांत चर्चा झाली.  शेवटी निघतेवेळी नेहरूजींनी सद्‍गतीत होऊन साहेबांचा हात हातात घेतला व म्हणाले,

''तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि मी सदैव तुमच्या पाठीशी राहील.  त्याबद्दल आपण निःशंक असावे.  आणि हे विसरून जा की, तुम्ही मला पत्र लिहिले आहे.''

नेहरूजींच्या आश्वासनानंतर साहेबांनी आपल्या कामाला गती दिली.  लष्करी साहित्यनिर्मिती, परदेशातून आधुनिक शस्त्रास्त्रांची आयात, भारतीय सरहद्दींना भेटी देऊन सैनिकांचे मनोधैर्य वाढविणे, त्यांच्या अडचणींची सोडवणूक करणे इत्यादी कामानिमित्तानं साहेबांचा प्रवास वाढला.  साहेब १३ जूनला नाशिकला पोहोचले.  सोबत डोंगरे होतेच.  तेथे पोहोचताच साहेबांना अस्वस्थ वाटू लागलं.  लगेच डॉक्टरांनी तपासलं.  हृदयाशी संबंधित ही अस्वस्थता असावी, असा प्रथम निष्कर्ष काढण्यात आला.  मी डोंगरे यांच्या संपर्कात होतेच.  ही वार्ता नेहरूजींच्या कानावर गेली.  त्यांनी कॅबिनेट सेक्रेटरी खेरांना आज्ञा दिली की, तुम्ही जातीनं लक्ष घाला.  मुंबईच्या तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवा आणि मला लगेच यशवंतरावांच्या तब्येतीबद्दल कळवा.  खेरांनी सरीन या आपल्या अधिकार्‍याला नाशिकला पाठवलं.  साहेबांना ४८ तास डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला.  नेहरूजींनी लगेच साहेबांना एक पत्र लिहिलं.

त्या पत्रात नेहरू म्हणतात, ''आपणास हृदयाचा त्रास होत असल्याचे ऐकून मला धक्काच बसला.  तुमच्या या बातमीवर माझा विश्वास बसला नाही.  प्रकृतीनं धडधाकट आहात अशीच माझी भावना आहे.  सुदैवानं तुम्हाला हृदयाचा त्रास नाही या डॉक्टरांच्या निष्कर्षानं माझी काळजी मिटली.  आपण पूर्ण बरे होईपर्यंत प्रवास करावा किंवा नाही याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा.''

साहेबांनी नेहरूजींना आभाराचे पत्र लिहिले.  त्यात १७ तारखेच्या कॅबिनेटसमोर जे महत्त्वाचे विषय आहेत ते पुढच्या बैठकीत घ्यावेत अशी विनंती केली.  नेहरूजींनी साहेबांची विनंती मान्य केली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org