थोरले साहेब - १८

असेच एक दिवस साहेब आपल्या देवराष्ट्रातील मित्रासोबत सोनहिर्‍याच्या काठी फिरायला गेले.  त्यांना पोहण्याची खुमखुमी आली.  कृष्णा-कोयनेच्या संगमात मी पट्टीचा पोहणारा आहे, असं दाखवावं म्हणून कपडे काढून सोनहिर्‍याच्या प्रवाहात उडी मारली.  पोहण्यास सुरुवात केली; पण साहेबांचे पोहण्याचे कसब सोनहिर्‍याच्या प्रवाहात कमी पडू लागले.  पोहता पोहता साहेब सोनहिर्‍याच्या मध्यभागी आले.  त्यांच्या हातापायातील बळ नाहीसं झालं.  आपण पाण्यात बुडतो की काय असा क्षणभर भास त्यांना झाला.  मित्रांना मदतीसाठी आवाज दिला.  मित्र धावून आले.  साहेबांना सोनहिर्‍याच्या काठावर सहिसलामत आणलं.  साहेब हिरमुसले.  कृष्णा-कोयनेच्या संथ प्रवाहात पोहणे वेगळे नि सोनहिरा ओढ्यात पोहणे वेगळे.  ओढ्यातील पाण्याच्या प्रवाहाला ओढ असते म्हणून त्याला 'ओढा' म्हणतात याची साहेबांना जाणीव झाली.  भविष्यात साहेबांच्या कर्तृत्वानं इतिहास घडणार होता म्ळणून साहेबांचा पुनर्जन्म झाला अन् तोही मित्रामुळे.  सोनहिर्‍याच्या पाण्याला कृष्णा-कोयनेच्या पाण्यापेक्षा जबरदस्त ओढ आहे याची जाणीव साहेबांना झाली.  वेळ मिळाला की साहेब तासनतास कृष्णा-कोयनेच्या संगमात पोहत असत.

आईची आई -  विठाई आणि साहेब पंढरीच्या वारीला निघाले.  कराड ते पंढरपूर ८० मैल असावं.  कराडहून एक पालखी नियमित पंढरपूरला जात असे.  या पालखीसोबत मजल-दरमजल करीत साहेब पंढरीची वाट चालू लागले.  या पालखीसोबत बैलगाड्या राहत असत.  एका बैलगाडीत, आजी, आई आणि साहेब.  एका वेळेस एकालाच बैलगाडीत बसावयास मिळत असे.  आजीचं वय झालेलं असल्यानं आजी जास्त वेळ गाडीत बसत.  साहेब आणि विठाईला जास्त वेळ पायी दिंडीसोबत चालावं लागायचं.  मुक्कामाच्या ठिकाणी तीन दगडांची चूल मांडून रस्त्यावरच भाकरी-पिठलं व्हायचं.  आजूबाजूच्या रानातून जळतणासाठी साहेब काट्याकुट्या जमा करायचे.  आठ-दहा दिवसांचा प्रवास करून साहेब पंढरपुरात पोहोचले.  नदीचा पूर अनेक वेळा पाहिलेला; पण माणसाचा पूर साहेब प्रथमच पाहत होते.  विठ्ठलाच्या दर्शनासाठी चार-पाच तास रांगेत ताटकळत उभं राहावं लागलं.  विठाईचा हात धरून साहेब राऊळात दाखल झाले.  वारकर्‍यांची रेटारेटी व बडव्यांची दांडगाई वारकर्‍यांच्या अंगवळणी पडलेली.  विठाईनं साहेबांना उचलून विठोबाच्या पायावर साहेबांचं डोकं टेकवलं.  तेवढ्यात बडवा वस्कन खेकसला, ''चला पुढे.''

पुढे अनेक वेळा सत्ताधारी म्हणून साहेबांना विठ्ठलाच्या दर्शनाचा योग आला.  त्यांना बुद्धिजीवी लोकांनी अनेकदा देवांच्या अस्तित्वाविषयी प्रश्न विचारले.  त्याला साहेबांचं उत्तर असायचं, ''देव आहे हे सिद्ध करणं अवघड.  देव नाही हे सिद्ध करणं त्याहूनही अवघड.  माझ्या मते ती एक अदृश्य शक्ती आहे.  तिच्या सान्निध्यात आपण आलो की, आपल्या मनाला शांती लाभते.''  साहेबांची मानसिक जडणघडण त्यांच्या मातोश्रींच्या आचरणातून तयार होत होती.  अनेक घटनांतून, प्रसंगांतून मनाची कसरत साहेबांना करावी लागायची.  आई हीच साहेबांची समाजशास्त्र व मानसशास्त्राची पाठशाळा होती.  

साहेबांचे बंधू गणपतराव सत्यशोधक चळवळीकडे ओढले गेले.  त्यांनी साहेबांना महात्मा फुले यांचे चरित्र वाचावयास दिले.  साहेबांना महात्मा फुले यांचे विचार पटले; पण त्यातील ब्राह्मण वर्गाला सरसगट धोपटलेले साहेबांना खटकत होते.  टिळकांच्या स्वातंत्र्य चळवळीतील कार्याकडे कानाडोळा करून चालणार नाही.  त्या कार्याला कमी लेखता येणार नाही.  दोघा भावंडांमध्ये या विषयावर वादविवाद-चर्चा होत.  सत्यशोधक समाजाची मुलूखमैदान तोफ म्हणून गाजणारे दिनकरराव जवळकर यांची सभा कराडच्या मैदानावर आयोजित करण्यात आली होती.  सोबत केशराव जेधे हेही होते.  सभेचा विषय होता - 'ब्राह्मणाचे भवितव्य'.  ब्राह्मण समाजावर दोन्ही वक्तयांनी सडकून टीका केली.  त्यांच्या टीकेच्या असुडातून टिळकही सुटले नाहीत.  महाराष्ट्राच्या वैचारिक राजकारणात या दोन्ही वक्तयांनी रानपेटवलं होतं.  श्री. दिनकरराव जवळकरलिखित 'देशाचे दुष्मन' हे पुस्तक साहेबांनी मिळवलं.  त्याचं वाचन केलं.  या सभेला 'तुफान' असं नाव साहेबांनी दिलं होतं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org