थोरले साहेब - १६७

''मी काहीएक सांगितलं नाही.  नेहमीप्रमाणं त्यांनी ही गोष्ट कोणाला कळता कामा नये, असा शब्द घेतला माझ्याकडून.  पण मी त्यांना सांगितलं, मला एका व्यक्तीला सांगावं लागेल.''

त्यावर नेहरूजींनी थोड्या नाराजीच्या सुरात विचारलं, ''कोण आहे ही व्यक्ती ?

मी त्यांना म्हणालो, ''माझी पत्‍नी सौ. वेणू.''

तिकडून नेहरूजी मनमोकळे हसले व म्हणाले, ''सौ. वेणुताईला सांगण्यास माझी हरकत नाही.'' साहेब.

''त्यांच्या मदतीला दिल्लीला जायचं म्हणजे काय करावं लागणार तुम्हाला ?''  मी.

''चीननं उत्तर सीमेकडून भारताच्या भूमीवर आक्रमण केलं.  ते आक्रमण परतावून लावण्याचे आदेश नेहरूंनी सैन्याला दिले.  चीनचे आक्रमण थोपवण्यास व परतावून लावण्यास आपलं सैन कमी पडू लागलं.  हिमालय संकटात सापडलाय.  दिवसेंदिवस आपल्या सैन्याला माघार घ्यावी लागत आहे.  एकामागून एक आपली ठाणी चीन हस्तगत करीत आहे.  सैन्याला जी शस्त्रास्त्रांची व युद्धसामुग्रीची रसद पुरवावयास पाहिजे त्यात कुठेतरी गफलत होऊ लागली.  संरक्षणमंत्री कमी पडू लागले.  भारतीय जनता व लोकसभा नेहरूजींवर आरोप-प्रत्यारोप करू लागली.  संरक्षणमंत्र्याच्या धोरणावर लोकसभेत स्वपक्षीय व विरोधक सडकून टीका करू लागले.  सीमेवर चीनच्या सैन्याला पाठ दाखवण्याची नामुष्की आपल्या सैन्याला स्वीकारावी लागत आहे.  तिन्ही सैन्यदलांचे सेनापती हतबल झालेत.  तिन्ही दलांत समन्वयाचा अभाव असल्याचा प्रत्यय येऊ लागला.  संरक्षणमंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी वाढू लागली.  संरक्षणमंत्री कृष्ण मेनन नेहरूजींच्या जीवलगांपैकी एक.  कृष्ण मेनन यांना नेहरू दुखवू इच्छित नव्हते.  अनेक अधिकारी संरक्षणमंत्र्याचा विश्वास संपादन करून मोक्याच्या पदावर जाऊन बसले.  त्यांची निष्काळजी सीमेवरील सैनिकांना भोगावी लागत आहे.  शेवटी नेहरूजींचा नाइलाज झाला.  त्यांनी कृष्ण मेननचा राजीनामा मागितला.  कृष्ण मेनन यांनीही आपल्या धोरणामुळं नेहरूजी अडचणीत येऊ नयेत म्हणून राजीनामा दिला.  नेहरूजींनी तो स्वीकारला.  संरक्षणमंत्र्याचा कारभार स्वतः नेहरूजींनी आपल्याकडे घेतला.  नेहरूजी मला केंद्रात संरक्षणमंत्री करू इच्छितात.  या संकटकाळी माझी मदत त्यांना हवी.'' साहेब.

बोलत बोलत मी व साहेब बंगल्यातील मुख्य बैठकीत आलो.  मी साहेबांना चूळ भरून येण्याची विनंती केली.  साहेब वॉशबेसीनकडे गेले.  मी स्वयंपाकघरात जाऊन दोन कप चहा ट्रेमध्ये घेऊन मुख्य बैठकीत आले.  तोपर्यंत साहेब चूळ भरून बैठकीत येऊन बसले.  आम्ही दोघे सोबत चहा घेऊ लागलो.  चहा घेता घेता मी साहेबांना विचारलं.

म्हणाले, ''तुम्ही काय ठरवलं मग ?''

''मी काय ठरवणार ?  ठरवायचं आहे तू, मी आणि आईंनी.  आपल्या तिघांचा एक विचार झाला की कळवू आपला निर्णय नेहरूजींना.  त्याकरिता दोन दिवसांचा अवधी मागवून घेतला मी नेहरूजींकडून. तुझा विचार, सल्ला माझ्याकरिता लाखमोलाचा आहे.'' साहेब.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org