थोरले साहेब - १५५

शिवनेरी महाराष्ट्रातील तीन कोटी रयतेच्या हृदयात ठाण मांडून बसलेला आहे.  शिवजन्मोत्सवाकरिता आपण काही लोक शिवनेरीवर आलेलो आहोत.  ज्या हृदयात आज शिवनेरी नाही असं हृदय शोधून सापडणे कठीण आहे.  आपल्याला नवमहाराष्ट्र घडवायचा आहे.  त्याकरिता एकदिलानं व एकसंध राहूनच आपण हे करू शकतो.  लोकशाहीत अनेक विचारांचे पक्ष असू शकतात आणि ते लोकशाहीत अभिप्रेतही आहे; पण मला वाटतं तिसर्‍या पंचवार्षिक योजनेपर्यंत आणि पक्षीय विचार बाजूला ठेवून नवमहाराष्ट्र घडवूया.  महाराष्ट्राचं स्वतंत्र असं राजकारण निर्माण करूया.  महाराष्ट्रासमोर दोन मूलभूत समस्या आहेत.  एक सामाजिक व दुसरी आर्थिक.  या समस्यांचे निर्मूलन करण्यासाठी आपण राजकारण करूया.  महाराष्ट्राला बुद्धीची आणि निसर्गाची देण मिळालेली आहे.  आतापर्यंत आपण पारतंत्र्यात होतो.  तिथे आपल्याला कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळत नव्हती.  आता आपण आपल्या बुद्धीचा वापर करून निसर्गाच्या साहाय्यानं नवीन महाराष्ट्र घडविला पाहिजे.  आपल्याला विकासाचे अनेक गड सर करावयाचे आहेत.  एकदा का आपण गडावर चढून आलो की, जोपर्यंत तो विकासाचा गड आपल्याला जिंकता येत नाही तोपर्यंत आपल्याला माघारी फिरता येणार नाही.  माघारी फिरलोच तर माघारी फिरणार्‍यांना सांगावेसे वाटते, माघारी कुठे जाल ?  दोर केव्हाच कापून काढले आहेत.

सामान्यांच्या प्रश्नाला प्राधान्य देऊन ते सोडवूयात.  महाराष्ट्र म्हणजे सामान्यांचं राज्य होय.  राज्याचा कर्णधार म्हणून माझ्याकडून तुमच्या अनेक अपेक्षा असणार.  त्या मी पूर्ण करू शकेलच असं काही नाही.  तक्रार करू नका.  त्या गरजा, त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्‍नांची पराकाष्ठा करू.  सामान्य जनतेच्या प्रश्नांचे रामायण-महाभारत आमच्यापुढे उभे आहे.  या समस्यांची उकल करण्याकरिता प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रात जबाबदारीने काम केले पाहिजे.''

शिवाजी महाराजांनी आदर्श राज्यकारभाराकरिता ज्या गुणांची जोपासना केली ते गुण राज्यकर्त्यांच्या अंगी असावेत, असं साहेबांना वाटायचं.  छत्रपती शिवजयंतीचा शिवनेरीवरील कार्यक्रम पार पाडून साहेब मलबार हिलवरील सह्याद्रीच्या दिशेने निघाले.  महाराजांचं कर्तृत्व, राजनीति, कारभार, त्यांचं शौर्य, धैर्य आणि चारित्र्य या गुणांची प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने पूजा बांधली पाहिजे.  त्यांनी शेतकर्‍यांच्या हातातून रुमणं काढून तलवार दिली, बारा बलुतेदारांना मावळे बनवून स्वराज्य स्थापनेत सहभागी करून घेतलं.  शेतकर्‍यांना-कष्टकर्‍यांच्या जगण्याचा सन्मान मिळवून दिला.  राज्यकर्ती जमात म्हणून त्यांच्यात विश्वास निर्माण केला.  त्यांना वैभव प्राप्‍त करून दिलं.  याच मार्गांनी आपल्याला नवमहाराष्ट्राची उभारणी करावी लागेल, असं साहेबांनी मनोमन ठरविलं.  २७ एप्रिल १९६० या शिवजयंतीदिनी नवमहाराष्ट्र राज्य निर्मिती दिवस ठरला असता तर महाराजांचं अधुरं राहिलेलं कार्य पूर्ण करण्याचं भाग्य मराठी माणसाला मिळालं असतं.  साहेबांनी आपलं लक्ष ३० एप्रिल रोजी मध्यरात्री व १ मेच्या पहिल्या प्रहरी होणार्‍या कार्यक्रमावर केंद्रित केलं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org