थोरले साहेब - १४१

या मनोभूमीची योग्य मशागत करून कर्तृत्वाचे भरघोस पीक काढण्यासाठी साहेब उत्सुक आणि अधीरही आहेत.  साहेब द्वैभाषिक राज्यात जे शिक्षण धोरण राबवीत आहेत त्याची भारतीय पातळीवर चर्चा होऊ लागली.  या सर्व शैक्षणिक कार्याची दखल अलिगढ मुस्लिम विद्यापीठानं घेतली.  अलिगढ मुस्लिम विद्यापीठानं साहेबांना 'ऑनररी डिग्री ऑफ एल.एल.डी.' ही पदवी प्रदान करून साहेबांच्या शिक्षणक्षेत्रातील कार्याचा गौरव केला.  या दीक्षांत समारंभात साहेबांनी शिक्षणाबद्दल जे परिवर्तनवादी विचार व्यक्त केले त्याची दखल राष्ट्रीय पातळीवरच्या शिक्षण धोरणात घ्यावी लागली.  

साहेब म्हणाले, ''समाजाचे जे घटक अनेक शतके दडपले गेले होते आणि शिक्षणाचे फायदे ज्यांना मिळू दिले नाहीत त्या घटकांना आपली उन्नती करून घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे.  विद्यापीठ व महाविद्यालये यात होणार्‍या गर्दीला ही इच्छाही अंशतः कारणीभूत आहे.  सामाजिकदृष्ट्या वरच्या पायरीवर जाण्याचे साधन एवढीच काहींची शिक्षणाबद्दल दृष्टी असेल; पण जातीनिष्ठ व श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या कल्पनांवर आधारलेल्या समाजातही निकोप व नैसर्गिक दृष्टी आहे असे म्हणावे लागेल.  ज्या तरुण मुलामुलींच्या आईवडिलांना व आजोबा-आजींना शिक्षणाचा लाभ घेता आला नसेल त्यांना शिक्षणामुळे आपली परिस्थिती सुधारेल म्हणून यावेसे वाटले तर त्याविरुद्ध काय आक्षेप असणार आहे ?  एवढेच नव्हे तर दूरदृष्टीने बोलावयाचे तर शिक्षणाच्या प्रसारात त्यांची गुणवत्ताही सुधारण्याची शक्यता आहे.  आपल्या विद्यापीठात जितके अधिक विद्यार्थी येतील ते गुणवत्तेच्या दृष्टीने निवड करण्यास उपयुक्त ठरतील.  शिक्षणाचा दर्जा सांभाळण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते आपले सर्व लक्ष यावरच केंद्रित करतील.  शिक्षणाच्या दर्जातही सुधारणा होणे अशक्य आहे असे मला वाटत नाही.

उच्च शिक्षणाचा प्रसार ही माझ्या मते आपल्या देशातील एक प्रभावी लोकशाही शक्ती आहे.  जोपर्यंत हे शिक्षण समाजातील मूठभर लोकांना मिळत होते तोपर्यंत आपल्या समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात सर्वोत्कृष्ट उच्च विद्याविभूषित अशा लोकांची संख्या अल्प असेल आणि या स्थितीत या मूठभर लोकांची प्रगती खुंटली, त्यांचा अधःपात झाला की समाजाचाही अधःपात होण्याचा धोका असतो.  अज्ञान व अशिक्षितता या परिस्थितीत वाढलेल्यांची बौद्धिक पातळी वाढली, बौद्धिक क्षितिजे रुंदावत गेली, त्यांच्यातील सुप्‍त गुणांचा उपयोग करण्याची त्यांना शक्य तितकी अधिक संधी मिळाली तर फक्त गुणवत्तेच्या जोरावर आपण आपले नेतृत्व मिळवू शकू.  असे झाले की सामाजिक दर्जा, जात, कौटुंबिक परंपरा इत्यादी घटक बाजूला पडतील.  आपल्या राजकीय जीवनाच्या दृष्टीने पाहता हे असे होणे इष्ट ठरणार आहे.  उच्च शिक्षणाकरिता होत असलेली गर्दी व त्यातून निर्माण होत असलेले बेशिस्तीचे वातावरण शिक्षणक्षेत्रात चिंताजनक आहे.  विद्यार्थ्यांच्या या बेशिस्तीतून निर्माण होणारे प्रश्न माझ्या मते मुख्यतः विद्यापीठांनीच हाताळले पाहिजेत.  मला फक्त एवढेच सांगावयाचे आहे की, आपले उच्च शिक्षण आणि देश यांच्या भवितव्याबद्दल चिंता करणार्‍या सर्वांनाच आपल्या विद्यापीठातील ही परिस्थिती चिंत्य वाटते.''

द्वैभाषिक राज्याच्या प्रगतीबरोबर भावनिक एकात्मता वाढविण्याचा आटोकाट प्रयत्‍न साहेब करीत आहेत.  मराठीभाषिक प्रांताबरोबर गुजरात प्रांताच्या भागातही साहेब जनतेची मनं सांधण्याचा प्रयत्‍न करू लागले.  महागुजरात समितीनं गुजरातमधील जनतेला द्वैभाषिकाच्या विरोधात भडकाविण्याचे उद्योग चालूच ठेवले होते.  गुजराती मंत्र्यांनाही गुजरातमध्ये फिरणे मुश्कील करून टाकले.  साहेब मात्र आत्मविश्वासाने गुजरातमध्ये हिंडू-फिरू लागले.  साहेबांनाही जनतेच्या रोषाचा प्रतिकार सहन करावा लागत होता.  कधीकधी तर हिंसक प्रकाराला तोंड द्यावं लागे.  एकदा गोळीबारही करावा लागला.  संरक्षणाचं कवच भोवती असल्यानं कुठला अनुचित प्रसंग घडला नव्हता.  विदर्भातही अधूनमधून धुसफूस डोकं वर काढायची.  गुजराती आणि मराठी भावांनी एकत्र राहावं असा निर्णय लोकसभेनं घेतला; पण या दोन्ही भावांनी सुखासमाधानानं नांदावं अशी काही मंडळींची इच्छा दिसत नव्हती. कुरापत काढून भांडण लावण्यात आपल्यातील काही मंडळी बुद्धी आणि शक्ती खर्च करण्यात गुंतली होती.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org