थोरले साहेब - १३८

या सवलती आणि हक्क देण्यामागची भूमिका स्पष्ट करताना साहेब म्हणाले, ''अस्पृश्यांना सवलती का दिल्या ते आपण तपासून बघितले पाहिजे.  आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यानं त्यांना या सवलती देण्यात आल्या आहेत.  ते कुठल्या धर्माचे आहेत म्हणून या सवलती दिल्या नाहीत.  धर्म बदलून कुठल्याही समाजाची आर्थिक उन्नती होत नाही.  धर्म हा आत्मसन्मानाचं समाधान देतो.  जिथे आत्मसन्मान मिळतो त्या धर्माकडे लोक आकृष्ट होतात.  बुद्ध धर्मामध्ये अस्पृश्यांना आत्मसन्मान मिळाला म्हणून त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला.  त्यांनी धर्म बदलला म्हणून त्यांना सवलती आणि हक्क आपल्याला नाकारता येत नाही.  उलट त्यांचं दारिद्रय जलदगतीनं नष्ट करण्याकरिता आपल्याला काय उपाययोजना कराव्या लागतील त्या आपण केल्या पाहिजेत.''

साहेबांचा हा निर्णय ऐतिहासिक ठरला.  महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरलं की, ज्याने नवबौद्धांच्या सवलती व हक्क अबाधित ठेवले.  समाजपरिवर्तनासाठी उचललेलं हे एक पाऊल होतं.

शिक्षण माणसाला आत्मभान मिळवून देतं यावर साहेबांचा विश्वास होता.  साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेताच खेरांनी इंग्रजी विषयाच्या संदर्भात जो निर्णय घेतला होता तो रद्दबातल ठरवून इंग्रजी विषयाचं शिक्षण पूर्ववत सुरू केलं.  उच्च शिक्षणाच्या बाबतीतही साहेब सतर्क होते.  उच्च शिक्षणाच्या सोयीसुविधा ज्या भागात सामान्य जनतेपर्यंत पोहोचल्या नव्हत्या त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं धोरण साहेबांनी आखलं.  मराठवाडा निजाम राजवटीत असताना उच्च शिक्षणाकरिता मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना हैदराबादला जावं लागायचं.  ऐपत असणारेच उच्च शिक्षण घेऊ शकत होते.  गोरगरिबांची मुलं हुशार असूनही त्यांना आर्थिक परिस्थितीमुळं उच्च शिक्षणाला मुकावं लागे.  मराठवाडा विभागाकरिता एक विद्यापीठ असावं ही निकड लक्षात घेऊन साहेबांनी जस्टिस एस. एम. पळणीटकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली.  त्यात सेतुमाधवराव पगडी, डॉ. वि. भि. कोलते, एफ. बी. तय्यबजी, शामराव कदम, डोंगरकेरी, वैशंपायन, शेंदारकर, एम. बी. चिटणीस यांची सदस्य म्हणून नियुक्ती केली.  या समितीनं डिसेंबर १९५७ पर्यंत आपला अहवाल सरकारला सादर केला.  साहेबांनी या अहवालास मंत्रिमंडळाची मंजुरी घेतली.  मराठवाड्यातील महाविद्यालये उस्मानिया विद्यापीठाशी संलग्न होती.  त्याची मुदत संपत आली होती.  जून ५८ पासून या शैक्षणिक वर्षात विद्यापीठाची स्थापना करणे आवश्यक होते.  

मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेचा दिवस जवळ येऊन ठेपला.  या विद्यापीठ स्थापनेच्या उद्‍घाटनाकरिता साहेबांनी नेहरूजींना आमंत्रित केलं.  नेहरूजींनी साहेबांच्या निमंत्रणाचा स्वीकार केला.  २३ ऑगस्ट १९५८ या दिवशी नेहरूजींच्या शुभहस्ते मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली.  साहेबांनी स्वागतपर भाषणात मराठवाड्याचा इतिहास उभा केला.

''याच मराठवाड्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्वज नांदले, बुद्धकालीन वेरूळ, अजिंठा लेण्यांच्या साक्षीनं प्राचीन संस्कृतीचा वारसा मराठवाड्याला मिळाला.  मराठीचे आद्यकवी मुकुंदराज याच भूमीत जन्माला आले.  यादवांचा अभेद्य देवगिरी किल्ला आजही अभिमानाने ताठ उभा आहे.  या शहरात दक्षिणेतील ताजमहाल 'बीबी का मकबरा' प्रेमाची साक्ष देत उभा आहे.  नांदेडमध्ये गुरुगोविंदसिंगजीचं कर्तृत्व मोठ्या अभिमानानं जतन करण्यात आलं आहे.  दक्षिण गंगा जिला संबोधण्यात येतं ती गोदावरी नदी या भागातील जमिनीची तहान भागवून शेतकर्‍यांचं जीवन फुलवीत आहे.  मराठवाडा विभागातील जनतेनं संघटितपणे रझाकाराच्या विरोधात सशस्त्र लढा उभारून जनतेचं संरक्षण केलं.  अन्याय, अत्याचारापासून जनतेला वाचवलं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org