थोरले साहेब - १३७

साहेब आत्माराम पाटलांना म्हणाले, ''या महार वतनानं दलितांवर बरेच अन्याय-अत्याचार केले.  या वतनापायी संपूर्ण हयातभर गावकीची कामं दलितांना करावी लागतात.  कामाच्या बदल्यात कुठलाच मोबदला त्यांना मिळत नाही.  ऊन, पाऊस, थंडी या निसर्गनिर्मित संकटात त्यांना आपला जीव धोक्यात घालून कामं करावी लागतात.  या अमानवीय परिस्थितीतून या वर्गाची सुटका करण्याकरिता असेंब्लीत आवाज उठविला पाहिजे.''

''साहेब, मी माझ्या परीनं महान वतन कायदा रद्द कसा करता येईल याकरिता प्रयत्‍न करतो.  असेंब्लीमध्ये खेरांचे वर्चस्व आहे.  आम्ही पुरोगामी विचारांचे लोकप्रतिनिधी अल्पमतात आहोत.'' आ. पाटील.

''मानवेंद्रनाथ रॉय हे श्रेष्ठीला सांगून मुख्यमंत्री खेर यांच्यावर दबाव आणून हा कायदा रद्द करावयास लावू शकतात.'' साहेब.  

आ. आत्माराम पाटील यांनी सर्व मार्गांचा अवलंब करूनही त्यांना यश आलं नाही.  त्यांनी साहेबांकडे असमर्थता व्यक्त केली.  असेंब्लीमध्ये बहुजनांच्या उत्कर्षाच्या बाबतीत कुठलाच विचार होत नसे.  वर्णवर्चस्ववाद्यांची मजबूत पकड असेंब्लीवर होती.  या प्रतिगाम्यांचं वर्चस्व मोडून काढण्यासाठीच पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात शे. का. पक्षाचा उदय झाला.  साहेबांनी विद्यार्थिदशेत महान वतनदारी कायदा रद्द करण्याचा प्रयत्‍न करून पाहिला; पण त्यात त्यांना यश आलं नव्हतं.

महार वतनदारी कायदा विद्यार्थीदशेत प्रयत्‍न करूनही साहेबांना रद्द करता आला नव्हता.  ही खंत साहेबांच्या मनाला लागून होती.  योगायोग असेल किंवा नियतीच्या मनात असेल, आपल्या राजकीय जीवनातील सत्तासूत्रे साहेबांनी १४ एप्रिल या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मदिनी पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून स्वीकारली.  साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हाती घेताच वंचित वर्गाच्या हिताचे व सुखाचे दिवस कसे आणता येतील त्याकरिता पूरक धोरण आखून साहेबांनी निर्णय घेण्यास सुरुवात केली.  कूळ कायदा, जमीन तुकडेबंदी असे दीनदुबळ्यांच्या हिताचे निर्णय साहेबांनी घेतले.  साहेबांनी दलितांची मानसिक गुलामगिरीतून सुटका करणारा निर्णय घेतला.  डॉ. बाबासाहेबांनी आपल्या हयातीत पंचवीस-तीस वर्षे संघर्ष करूनही महार वतन कायदा रद्द करण्यात त्यांना यश आलं नाही.  साहेबांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर १९५८ ला असेंब्लीमध्ये 'बॉम्बे इन्फिरिअर व्हिलेज बॉन्टस ऍक्ट १९५८' हा कायदा संमत करून घेतला.  हजारो वर्षांपासून महान वतनाच्या जोखडात अडकून पडलेल्या महान बांधवांची मुक्तता केली.  मुक्ततेच्या संदर्भात साहेबांनी फार बोलकी प्रतिक्रिया व्यक्त केली.  

म्हणाले, ''डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीत हा प्रश्न सुटला असता तर मला अधिक समाधान मिळालं असतं.  डॉ. बाबासाहेबांचं अधुरं राहिलेलं स्वप्न मी पूर्ण करू शकलो याचं मला समाधान आहे.''

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्यांचे अनुयायी बौद्ध धर्माकडे आकृष्ट झाले.  बहुसंख्य अस्पृश्य समाजानं बौद्ध धर्म स्वीकारला.  अस्पृश्यांना देण्यात येत असलेल्या सवलती नवबौद्धांना देण्याचं नाकारावं असा दबाव शासनावर येऊ लागला.  अस्पृश्यांना मिळत असलेले हक्कही नाकारण्यात यावे यावरून देशात आणि महाराष्ट्रात वादंग निर्माण झाले.  समाजात उलटसुलट चर्चा सुरू झाली.  वर्णाभिमानी पडद्याआडून सूत्र हलवून छुपा विरोध करू लागले.  देशभरात खलबतं होऊ लागली.  धर्मांतर केल्यानंतर सोयीसवलती व हक्क देता येतात का यावर देशभर खल सुरू झाला.  साहेब भारतातील एकमेव मुख्यमंत्री निघाले, ज्यांनी नवबौद्धांना सवलती व हक्क देण्याचे मान्य केले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org