थोरले साहेब - १२९

'महाराष्ट्र म्हणजे सह्याद्री आणि सह्याद्री म्हणजे महाराष्ट्र' अशी सह्याद्रीची ख्याती देशभर पसरलेली आहे.  सह्याद्रीच्या अंगाखांद्यांवर अभेद्य असे गडकोट, किल्ले निर्माण करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली.  सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यात शत्रूंची दमछाक करून मावळ्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं.  आजही घोड्यांच्या टापांचा, मावळ्यांच्या 'हर हर महादेव'च्या ललकार्‍यांचा आवाज सह्याद्रीच्या कडेकपारीत घुमत आहे.  या कर्तृत्वाचं स्मरण कायम होत राहावं म्हणून साहेबांनी आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक निर्णय घेतला.  मंत्रिमंडळातील सहकारी राहत असलेल्या निवासस्थानाला इंग्रजांनी दिलेली नावे स्वातंत्र्यानंतरही तशीच होती.  पारतंत्र्यातील हे नावाचं जोखड काढून टाकून महाराष्ट्र संस्कृतीची जी प्रतीकं आहेत ती नावं या बंगल्यांना देण्याचा निर्णय बैठकीत घेतला.  साहेबांना मुख्यमंत्री म्हणून जो बंगला निवडला होता त्या बंगल्याला साहेबांनी महाराष्ट्राचा मानबिंदू, महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या सह्याद्रीचे नाव दिले.  साहेबांनी आपल्या मातेसोबत मलबार हिलवरील सह्याद्री निवासस्थानी जाण्याचा दिवस निवडला.

सह्याद्रीवर राहण्यास जायची तयारी मी करू लागले.  प्रथम मी सह्याद्रीवर जाऊन आले.  सह्याद्री निवासस्थान मलबार हिलचा मानबिंदू.  'सह्याद्री' नावाला शोभेल असा ऐसपैस पसरलेला.  बंगल्याच्या चोहोबाजूंनी विस्तीर्ण मोकळी जागा.  परत त्यावर हिरवळीचा हिरवागार गालिचा.  आल्हाददायक वातावरण.  मी राहत असलेल्या बंगल्यावर परत आले.  साहेबही घरी आले होते.  मी वेळ काढून माझ्या मनात असलेले विचार त्यांना विचारण्याचे ठरवले.

म्हणाले, ''अहो, तुम्हाला एक विचारू का ?''

''काय विचारायचे ते विचार की !'' साहेब.

''आईला इथं घेऊन यावं म्हणते मी.  आपण सह्याद्रीमध्ये जातेवेळी आईसोबत असलेल्या बर्‍या.  कराडलाही आता सर्वकाही ठिकठाक चाललंय.  सोनूताईही तयार होतील आईला इकडे पाठवायला.'' मी.  

''चांगला विचार आहे तुझा.  ज्या आईनं सह्याद्रीच्या रूपानं माझं पालनपोषण केलं तिच्या उपस्थितीत आपण सह्याद्रीवर राहावयास जाऊ.  डोंगरेंना सांगून तुझी कराडला जाण्याची व्यवस्था करतो.  तू जाऊन आईला घेऊन ये इथं.'' साहेब.

दुसर्‍या दिवशी मी गाडी घेऊन कराडला पोहोचले.  रात्री मुक्कामाला थांबले.  रात्री बर्‍याच उशिरापर्यंत आम्ही दोघी जावा संसाराच्या गत आठवणीत डुंबून गेलो.  भागीरथीताईंची आठवण झाली.  आमच्या लेकीचा संसार चांगला चालला होता.  मुलांची शिक्षणात प्रगती चांगली होती.  चव्हाण कुटुंबावर घाटगे आणि जाधव ही माहेरची मंडळी लक्ष ठेवून होती.  सोनूताईच्या पाठीमागे आता कुठलीच चिंता उरलेली नव्हती.  रात्री उशिरा आम्ही दोघी झोपलो.

सकाळीच उठून सोनूताई आणि मी घरातील सर्व कामं आवरली.  आईच्या सामानाची बांधाबांध केली.  सोनूताईनं आईचं दर्शन घेऊन आम्हा सासू-सुनेला निरोप दिला.  आई व मी उंबरठा ओलांडून घराबाहेर पडलो.  क्षणभर घराकडे पाहून घराला डोळ्यात साठवून घेतलं.  आईचा कंठ दाटून आला.  सोनूताईला जवळ घेतलं.  त्यांच्या डोक्या-तोंडावरून हात फिरविला.  जड पावलानं गाडीकडे निघालो.  गाडीत बसून आम्ही दोघी सासू-सुना सह्याद्रीच्या पंचक्रोशीतील भूतकाळातील आठवणींना मागे सोडत गुंबईतील सह्याद्री बंगल्याच्या वाटेला निघालो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org