थोरले साहेब - १२६

देशात भाषावर प्रांतरचना करून भाषिक राज्ये निर्माण करण्यात येऊ लागली.  कानडी, तामिळी जनतेला न्याय मिळाला होता.  मग मराठी आणि गुजराती जनतेनं असं काय काँग्रेस श्रेष्ठींचं घोडं मारलं आहे की, त्यांना भाषिक राज्य मिळत नाही ?  अशी भावना या दोन्ही भाषिकांच्या मनामध्ये खदखदत होती.  गुजरात आणि महाराष्ट्राची जनता साहेबांना अशा प्रकारचे प्रश्न विचारून भंडावून सोडत होती.  साहेब आपल्या परीनं जनतेची मनधरणी करीत होते.

गुजरातमध्ये गेले तर साहेब जनतेला सांगायचे, ''गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन भाऊ आहेत.  स्वातंत्र्यलढ्यात या दोन भावांनी खांद्याला खांदा लावून लढा दिलेला आहे.  लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्रात जन्म घेऊन 'स्वातंत्र्य मिळविणे माझा हक्क आहे आणि तो मी मिळविणारच' असा दृढनिश्चय केला.  गुजराती मातीत गांधीजींचा जन्म झाला.  या भूमीला स्वातंत्र्य मिळवून दिलं, तिचं सोनं केलं ते महात्मा गांधी भारताला वंदनीय आहेत.  गुजरात आणि महाराष्ट्र भाऊ-भाऊ म्हणून गुण्यागोविंदाने नांदले आणि द्वैभाषिकाचा विकास झाला तर देशात एक आदर्श निर्माण केल्याचं श्रेय आपल्याला मिळेल.  भाऊ-भाऊ म्हणून एकत्र न राहण्याची भावना ज्यादिवशी निर्माण होईल तेव्हापासून या देशाच्या उत्कर्षाला ग्रहण लागण्याची भीती मला वाटते.  टिळक, गांधी या दोन्ही भूमिपुत्रांनी देशासाठी केलेला त्याग, बलिदान व्यर्थ जाऊ द्यावयाचे नसेल तर देशाने आपल्यावर टाकलेली ही द्वैभाषिकाची जबाबदारी आपल्याला यशस्वीपणे पार पडावी लागेल.''

ऐतिहासिक, पौराणिक दाखले देऊन साहेब जनतेच्या भावनेला हात घालायचे; पण महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र समिती आणि गुजरातमध्ये महागुजरात परिषद यांनी जनतेची मनं द्वैभाषिकाच्या विरोधात चेतविली होती.  ती चेतविलेली मनं विझविण्यासाठी आपल्या तत्त्वज्ञानाचा, बुद्धिचातुर्याचा शिडकावा जनतेच्या मनावर साहेब करीत होते.  दुसर्‍या सार्वजनिक निवडणुकीचे वारे देशात वाहू लागले.  साहेबांना मुख्यमंत्री होऊन तीन-चार महिने लोटले.  विरोधकांच्या डावपेचांना साहेब पुरून उरू लागले.  वेळ कमी पडू लागला तरी साहेब पायाला भिंगरी लावून कधी विदर्भात, कधी कोकणात, कधी काठेवाडात तर कधी मराठवाड्यात जाऊन रात्रीचे दिवस करू लागले.  मुंबईतील कामगारांचा आणि कारखानदारांचा विश्वास संपादन करण्यात साहेब आपल्या बुद्धिकौशल्याचा पुरेपूर उपयोग करू लागले.  कारखानदार, कामगार, शेतकरी यांना साहेब आपले वाटू लागले.  संयुक्त महाराष्ट्र समितीचं नेतृत्व करणारे साहेबांच्या सुदैवानं सर्व पांढरपेशा वर्गातील होते.  शेतकर्‍यांचं पोर मुख्यमंत्री झालं म्हणून महाराष्ट्रातील ही पांढरपेशी मंडळी साहेबांच्या विरोधात आहे हा विचार हळूहळू सामान्य माणसापर्यंत झिरपू लागला.  संयुक्त महाराष्ट्र समितीच्या जाहीरनाम्यात साहेबांचा पराभव करणं हा एकमेव विषय होता.  'साहेबांचा पराभव म्हणजे काँग्रेसचा पराभव' असं समीकरण विरोधकांनी मांडण्यास सुरुवात केली.

दुसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीचे रणशिंग पुंफ्कले गेले.  महाराष्ट्रात २ मार्च ते १७ मार्च १९५७ च्या दरम्यान मतदान घेण्याचे जाहीर केले.  साहेबांनी १ नोव्हेंबर १९५६ ला मुख्यमत्रीपदाची सूत्रं स्वीकारून पाच महिने लोटले होते.  संयुक्त महाराष्ट्र समितीच्या झेंड्याखाली एकवटलेला प्रबळ विरोधक आणि विस्कळीत काँग्रेस या दोघांमध्ये महाराष्ट्राच्या भूमीवर युद्ध होण्याची चिन्हं दिसू लागली.  ही निवडणूक भारत विरुद्ध इंडिया या दोन विचारांचा संघर्ष ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.  बहुजन समाज आणि उपेक्षितांचं प्रतिनिधत्व काँग्रेस पक्ष करीत आहे तर इंडियाचं प्रतिनिधित्व विरोधी पक्ष करीत आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org