थोरले साहेब - १२१

''महाराजांच्या काळातील जी घरंदाज घराणी आहेत ती आजही महाराजांच्या वंशाशी संबंधित आहेत.  देवाणघेवाण करून ज्यांनी खानदानपण मिळविलं ती घराणी सामान्य जनतेतून बाहेर फेकली जात आहेत.  त्यांचा एक समूह म्हणून ते आपलं वेगळेपण टिकविण्याच्या प्रयत्‍नात असतात.  त्या मानसिकतेतून इतरांकडे पाहतात.'' मी.

''तुला आठवतं ?  जेव्हा तुला पाहावयास आलो होतो तेव्हा मी काय म्हणालो होते ते ?  नाही आठवणार तुला...'' साहेब.

''नाही कसं आठवणार मला !  चांगलं लक्षात आहे माझ्या.  माझी आई देवभोळी आहे.  तिला समजून घेणारी घरंदाज सून हवीय, असं तुम्ही म्हणाला होता.  असं आहे व्हय माझ्या निवडीमागचं तुमचं रहस्य !  मला आता कुठे घरंदाज आणि खानदारी याचा अर्थ उमगला.''  मी.

जगातील सामाजिक व्यवस्थेनं नाकारलेल्या तमाम वंचित नागरिकांच्या जीवनातील १ नाव्हेंबर १९५६ सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा आजचा दिवस.  भूमीचा मालक असून समाजव्यवस्थेनं भूमिहीन ठरवून ज्यांच्या कुटूंबाला रस्त्यावर आणून सोडलं, ज्यांच्या पूर्वजांना पोटाची खळगी भरण्याकरिता भटकंती करावी लागली, क्षत्रिय शेतकरी कुळात जन्मून ज्यांना समाजव्यवस्थेनं नाकारून मानसिक यातना दिल्या तो बळवंतरावांचा पराक्रमी पुत्र यशवंत बुद्धी आणि कर्तृत्वाच्या जोरावर द्वैभाषिक राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर आज विराजमान झाला आहे.  वय केवळ बेचाळीस वर्षे.  जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीप्रधान देशातील प्रगत आणि पुरोगामी अशा राज्याचा एकमेव तरुण मुख्यमंत्री.  घराण्यात जमीनदारकी नाही, घराण्याला ऐतिहासिक वारसा नाही, घराण्याला राजकारणाचा गंध नाही.  'करा सही' म्हटलं तर अंगठा पुढं करून 'लावा शाई' म्हणणार्‍या संस्कृतीचा वारस.  अमुक एका कुळात जन्माला आलो नाही म्हणून पुढे जाता येत नाही असं नियतीला दोष देत मुळमुळत व कुढत बसणार्‍या तरुणांना आपल्या कर्तृत्वानं प्रोत्साहन देणारा हा भूमिपुत्र.  तरुणांचा आदर्श.  आपल्या बुद्धीची शिक्षणाद्वारे मशागत करून बुद्धीच्या संघर्षात अनेकांना पाणी पाजून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.  राजमार्गावरील काटे दूर सारून कष्टकर्‍यांच्या पुत्रांना राजसत्तेचा मार्ग दाखवणारे वाटाडे झाले साहेब.  शेतकर्‍यांची, कष्टकर्‍यांची दुःखं आपली मानणारा मुख्यमंत्री, गरिबांचा कैवारी, गरिबांच्या जीवनात सुखाची स्वप्नं पाहणारा मुख्यमंत्री प्रथमच साहेबांच्या रूपानं महाराष्ट्राला मिळत आहे.  आतापर्यंत 'गरिबी' या शब्दाच्या अर्थाशिवाय गरिबीशी संबंध न आलेले मुख्यमंत्री या राज्याने पाहिले.  कुपर, खेर, मोरारजी देसाई यांची आणि गरिबीची भेटच झालेली नव्हती.  जन्माबरोबर गरिबीची सोबत लाभलेले साहेब या मंडळींचे वारस झाले.  जनतेच्या मनात आपोआप साहेबांबद्दल आपुलकी निर्माण झाली.  अनेक अपशकुनी मंडळी साहेबांना अपशकुन दाखवण्याच्या कार्यात मग्न होती.  त्यांच्या अपशकुनाला न जुमानता साहेब बुद्धीच्या जोरावर एक एक गड चढून आपल्या कार्याचा, कर्तृत्वाचा ध्वज गडावर फडकावत होते.  द्वैभाषिकातील तमाम मावळे साहेबांच्या पाठीमागे आपलं बळ उभं करू लागले.  'ज्यांना औताचा कासरा धरता येत नाही अशाच्या हाती राज्याची बागडोर सोपविण्यात कुठलं शहाणपण आहे ?' अशी कोल्हेकुई बुद्धिजीवी मंडळींनी सुरू केली.  शिक्षणाकरिता गरिबीचे चटके सोसणारे, तत्त्वासाठी भावाचा विरोध पत्करणारे, स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून गावोगाव भटकणारे, गांधी-नेहरूंना निष्ठा अर्पण करणारे साहेब आज सर्वोच्चपदी विराजमान झाले.  माती, माय व बंधू यांच्याशी नाळ न तोडणारे, कार्यकर्त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवणारे, मैत्रीला जागणारे साहेब आज द्वैभाषिकाचा काटेरी मुकुट स्वीकारीत आहेत.  या मुकुटातील काटे काढून त्या ठिकाणी विश्वासाची फुले कशी फुलविता येतील याचा विचार साहेब करू लागले.  शपथविधी पार पडल्यानंतर जनतेला उद्देशून त्यांनी भाषण केले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org