विठाई व बळवंतराव संसाराचा गाडा नेटानं ओढत होते. विटा येथील शेतीच्या उत्पन्नावर काढलेल्या दिवसाची आठवण आली म्हणजे बळवंतरावांसमोर अंधार पसरायचा. नोकरीच्या निमित्ताने जो संसार उजळला तो सुखकारक आहे यावर समाधान मानून बळवंतराव दिवस काढीत होते. बळवंतराव कराडला डुबल गल्लीत स्थिरस्थावर झाले. राधाअक्काच्या लग्नाचा विचार बळवंतरावांच्या डोक्यात घोळू लागला. त्यांनी एके रात्री विठाईच्या कानावर ही गोष्ट घातली.
विठाईनं विचारलं, ''मुलगा बघितला का ?''
बळवंतराव म्हणाले, ''रामचंद्र कोतवाल हा मुलगा मला आवडला आहे.''
''अहो, पण त्याच्या आईवडिलांना विचारलं का ?'' विठाई.
''होय, माझा एक जीवलग मित्र रहिमतुल्ला मुजावर याच्या घरासमोर कोतवाल कुटुंब राहातं. मुजावरने त्यांच्याशी बोलणी केली.'' बळवंतराव.
''मग एखादा चांगला मुहूर्त पाहून करू या की लग्न राधाचं.'' विठाई.
रहिमत मुजावरच्या साहाय्यानं रामचंद्रराव कोतवाल यांच्याशी राधाक्काचा विवाह बळवंतरावांनी पार पाडला. माझी नणंद राधाक्का कोतवाल घराण्याची सून झाली. राधाक्काला बाबुराव, दिनकर व एक मुलगी. रामचंद्रराव कोतवालांचं अकाली निधन झालं. हे कोतवाल कुटुंब चव्हाण कुटुंबाच्या आश्रयानं राहू लागलं.
१९१७ चा काळ असेल. भारतातील जनता प्लेगच्या वरवंट्याखाली भरडली जात होती. गावची गावं ओस पडली. ज्या गावात प्लेगची लागण होई त्या गावातील जनता रानोमाळी राहावयास जात असे. एक दिवस हे प्लेगचं संकट कराडला येऊन पोहोचलं. गाव खाली होऊ लागलं. विठाई-बळवंतरावांनी निर्णय घेतला. कराड सोडून विठाई लेकरांना घेऊन देवराष्ट्रला आल्या.
बळवंतरावांना नोकरीच्या निमित्तानं कराडला थांबणं अनिवार्य होतं. बळवंतराव अधूनमधून सुटीच्या दिवशी देवराष्ट्राला जात असत. देवराष्ट्र हे लहानसं खेडं. गावातील सर्व मुलं वेशीतील पटांगणात खेळत. बळवंतराव कराडहून देवराष्ट्रला येत तेव्हा गावच्या वेशीलगत आलं की त्यांची लेकरं त्यांना येऊन बिलगत. बळवंतराव त्यांना उचलून घेत व घराकडे घेऊन जात. एक-दोन दिवस मुलाबाळांसोबत घालवीत. देवराष्ट्रहून निघताना विठाईला मुलांची काळजी घेण्याबद्दल जतावीत अन् जड पावलानं कराडला परत येत.
कराड प्लेगच्या वावटळीत सापडलेलं. चोहीकडे हाहाकार माजलेला. कुणी कुणाच्या दुःखावर पुंफ्कर घालायची हा प्रश्न. प्लेगचा बकासुर कुटुंबेच्या कुटुंबे गिळंकृत करायचा. दुःखाला पारावार उरला नाही. जनता धास्तावलेली... उद्याचा दिवस पाहावयास मिळतो की नाही याची शंका असायची. जिवंत राहिलो म्हणून जगायचं यापलीकडे मानवाच्या हाती काहीही राहिलं नव्हतं. असंच क्षणभंगुर जीवन बळवंतराव कंठीत होते.