थोरले साहेब - १११

साहेब सांगलीला पोहोचले.  साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी सातारा, कोल्हापूरच्या जनतेची रीघ सांगलीकडे लागली.  वसंतदादांनी सभेची जय्यत तयारी केली होती.  या सभेतील साहेबांचं भाषण महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणार याची खात्री कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती.  तळागाळातील सर्वहरा वर्ग मिळे त्या साधनांनी सांगलीची वाट धरून सांगली जवळ करीत होता.  सांगलीचे सर्व रस्ते जनतेनं भरून सभास्थानाकडे वाहू लागले.  सभा निर्विघ्न पार पडणार असं वातावरण सांगलीत तयार झालं.  विरोधकांनीदेखील साहेबांचे विचार ऐकण्याचं ठरविलं असावं.  या सभेत कुठलाच अडथळा विरोधकांनी आणला नाही.  साहेबांनीही खुल्या मनानं भावना व्यक्त केल्या.  महाराष्ट्राच्या राजकारणात आपली प्रतिमा एक फितूर, विश्वासघातकी म्हणून विरोधकांनी निर्माण केली आहे.  त्या विधानाचा समाचार साहेबांनी मनसोक्त घेतला.  आपल्या प्रत्येक कृतीमागे राष्ट्रभावना कशी ओतप्रोत भरलेली आहे असं ठणकावून सांगितलं.

म्हणाले, ''माझ्या कुठल्याही भाषणात मी मुंबई महाराष्ट्राला नको, असं कधीही आणि कुठंही म्हटलेलं नाही.  मुंबईसाठी रक्तपात नको, एवढंच मी म्हणतो.  मुंबई न मिळाल्याची जखम माझ्याही काळजात झाली आहे.  ही जखम भरून काढण्यासाठी मी शांततेच्या मार्गाचा अवलंब करणार आहे.  काँग्रेसमधून बाहेर पडून रस्त्यावर उतरण्याची भाषा विरोधक करीत आहेत.  रस्त्यावर उतरून आमच्याच हातानं आमच्या बांधवांची घरं जाळायची आहेत का ?  यासाठीच आम्ही स्वातंत्र्य मिळविलं का ?  हा खरा प्रश्न माझ्यासमोर आहे.  मला मुंबईसह महाराष्ट्र हवाय.  त्याकरिता आयुष्याची आहुती द्यायला मी तयार आहे.  ज्या शक्तीच्या जोरावर आम्ही स्वातंत्र्य मिळविलं त्या मार्गानं आम्हाला मुंबई मिळविणं अवघड नाही.  त्या साधनाचा उपयोग करून आपलं ध्येय आपण साध्य करू, असं मी जनतेला सांगतो; पण जनता विरोधकांच्या भावनात्मक आवाहनाला बळी पडत आहे, फसत आहे.  मी सत्तेत आलो ते सेवेचे व्रत घेऊन.  याकरिता मी आयुष्यातील चाळीस वर्षे पणाला लावली आहेत.  माझ्या राजकारणाची पाळमुळं जनतेच्या हृदयात खोलवर रुतलेली आहेत.  कुठलंही राजकीय वादळ मला उखडून टाकू शकत नाही.  पालापाचोळ्यासारखा मी वादळात उडून जाणार नाही.  कारण माझ्या राजकारणाचं झाड कृष्णा-कोयनेच्या भूमीत ज्याग, श्रम, देशसेवेचं समर्पित जीवनाचं सिंचन करून वाढविलं आहे.  त्याला कुठलाही सोसाट्याचा वारा हलवू शकत नाही.  मी माझ्या मूळ मुद्द्याकडे वळतो.  मी फलटणच्या सभेत काय म्हणालो ?  ज्या महामानवांनी आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्या प्रती मी माझ्या निष्ठा वाहिल्या तर माझ्यावर नाही नाही ते आरोप करून मला इतिहासातील खलपुरुष ठरविण्याचा उद्योग या मंडळींनी आरंभिला आहे.  नेहरू की महाराष्ट्र ?  यात मी नेहरूजींना पसंती देईल, असं म्हणालो तर मला 'सूर्याजी पिसाळ' म्हणून हिनविण्यात येत आहे.  नेहरू म्हणजे भारत आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले ते नेहरू-गांधींमुळे.  भारत स्वतंत्र झाला म्हणजे महाराष्ट्र स्वतंत्र झाला.  भारताच्या प्रती माझ्या जशा निष्ठा आहेत तशाच निष्ठा महाराष्ट्राच्या प्रती माझ्या मनात आहेत.  शिवाजी महाराजांनी स्वराज्याकरिता आपल्या कर्तृत्वाची बाजी पणाला लावली व स्वराज्य मिळविलं.  उभा देश त्यांच्या चरणी आपल्या निष्ठा अर्पण करतो, नतमस्तक होतो.  शिवाजी महाराजांनंतर या देशाला नेहरू-गांधींनी आपल्या त्यागाची, कर्तृत्वाची बाजी पणाला लावून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं.  त्यांच्या प्रती निष्ठा वाहू नको तर काय मग स्वातंत्र्याच्या दिवशी आपल्या घरावर काळे झेंडे फडकावणार्‍यांच्या प्रती निष्ठा वाहू ?  शिवाजी महाराजांनी जे स्वातंत्र्य मिळविलं तेच स्वराज्य ज्यांनी आपल्या विलासीवृत्ती व रयतेवर अन्यायकारक जाती-धर्माचा बडगा उगारून मातीत मिळविलं त्यांच्या प्रती मी माझ्या निष्ठा वाहू ?  संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत काळे झेंडे हातात घेणार्‍यांना तुम्ही शिवाजी महाराज म्हणणार का ?  या माझ्या भूमिकेत कुठे सूर्याजी पिसाळ दिसतो हे तुम्हाला ठरवायचे आहे.  मी या संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेत सूर्याजी पिसाळ आहे असं ज्यांना म्हणायचं आहे त्यांना माझा प्रश्न आहे - यात काळे झेंडे हातात घेणारे औरंगजेब कोण आहे हे सांगावं.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org