थोरले साहेब - 120

''ऐक तर... महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी दोन वेळेस असे प्रसंग निर्माण करण्यात आले.  पहिला प्रसंग शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी आणि दुसरा शाहू महाराजांच्या पुरोहितांनी निर्माण केलेला.  महाराष्ट्रातील ऐतखाऊ वर्गांनी आपल्या उपजीविकेचा संबंध धर्मशास्त्रांशी जोडला आणि त्यातून हे प्रश्न निर्माण झाले.  धर्मशास्त्रे ही या वर्गांनी आपल्या उपजीविकेकरिता निर्माण केलेली आहेत.  त्या धर्मशास्त्रांना कुठलाही वैज्ञानिक आधार नाही.  या वर्गांनी महाराजांचा राज्याभिषेक करण्याचं नाकारलं.  कारण काय तर म्हणे महाराज क्षत्रिय नाहीत.  राजा होण्याचा अधिकार हा क्षत्रियांनाच आहे असं या वर्गाचं धर्मशास्त्र सांगतं.  क्षत्रियांना गोत्र असतं.  हे गोत्र या वर्गातील ॠषीमुनींच्या नावानं आहे.  या गोत्रांचे ग्रंथ या वर्गांनी लिहिलेले आहेत.  गोत्राच्या ग्रंथात असं लिहून ठेवलेलं आहे की, वशिष्ठ ॠषीचा जन्म वेश्येच्या पोटी झालेला आहे, व्यास ॠषीचा जन्म केवट कन्येच्या पोटी झाला, पाराशर ॠषीचा जन्म चांडाळ-मांगणीच्या पोटी झाला.  (संदर्भ : स. ना. सूर्यवंशी लिखित 'हे राष्ट्रा... महाराष्ट्रा', राजर्षी शाहू जन्मशताब्दी सामाजिक कृतज्ञता अंक, पान क्र. ३९.)  ही गोत्रं ९६ कुळी मराठ्यांना देण्यात आली आहेत.  ज्या ९६ कुळातील मराठ्यांचे गोत्र, वशिष्ठ, व्यास, पाराशर आहे मग या सर्व ९६ कुळी मराठ्यांचे पूर्वज वेश्या, केवट, मांगणींच्या पोटी जन्माला आले आहे.  या तीन ॠषींच्या नावांचे गोत्र असलेले सर्व मराठे हे शूद्र आहेत असे हे ग्रंथ सांगतात.  याबाबत माझं असं मत आहे की, गोत्र हे ब्राह्मणांना असतात, असं या धर्मग्रंथांत सांगितलेलं आहे,  क्षत्रियांना आणि मराठ्यांना ब्राह्मणांनी आपल्या स्वार्थापोटी ही गोत्रं दिलेली आहेत.  

ऐतखाऊ वर्गाचं उपजीविकेचं साधन धर्म.  या धर्मावर अतिक्रमणं होऊ लागली.  इस्लाम व ख्रिश्चन धर्मीय लोक भारतात सत्ता काबीज करून सत्तेच्या जोरावर धर्माचा प्रचार आणि प्रसार करू लागले.  हा वर्ग आपलं स्वतःचं व धर्माचं रक्षण करण्यास असमर्थ होता.  त्यांनी आपलं व आपल्या पोटार्थी धर्माचं संरक्षण करण्याकरिता बहुजनांची पायधरणी केली.  त्या बदल्यात आम्ही तुम्हाला गोत्र व क्षत्रिय म्हणून मान्यता देतो.  बहुजनांतील लढवय्या जमातीनं पोटार्थी धर्माचं आणि या वर्गाचं परकीयांच्या आक्रमणापासून रक्षण केलं.  लढवय्या जमातीतील लोकांची गोत्रं त्यांच्या भागातील या वर्गाची जी गोत्रं आहेत तीच गोत्रं या क्षत्रिय जमातीची आहेत.  शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणार्‍या या वर्गाला महाराजांनी पैशाचे आमिष दाखवताच राज्याभिषेक केला.  तीच गत राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोहितांची.  पुरोहितांचे तनखे बंद करताच त्यांच्याच जातीबंधूच्या शाहू महाराजांकडे रांगा लागल्या - आम्ही तुमचे पौराहित्य करावयास तयार आहोत.  आम्हाला तनखे द्या.  असाच प्रकार खानदान याबाबतीत आहे.  स्वतःला उच्चकुलीन म्हणवून घेणार्‍यांच्या बाबतीत आहे.  सत्ताधार्‍यांशी कौटुंबिक नाते निर्माण करून जहागीरदार, देखमुख, देशपांडे, कुलकर्णी, पाटील, चौधरी ही पदं व वतनदारी मिळवायची आणि या जोरावर जी घरंदाज घराणी होती त्यांच्यावर सत्ता गाजवायची.  या वतनदारांनी जी पदं मिळविली त्याच नावानं ते समाजात वावरू लागले.  यांनी आपलं घरंदाज आडनाव लावणं सोडून दिलं.  

या सर्व वतनदारांना त्यांची त्यांची आडनावे असतात म्हणूनख् देशमुख-देशमुख, देशपांडे-देशपांडे यांच्यात विवाह होतात.  सत्ता बदलली की येणार्‍या सत्ताधार्‍यांशी लागेबांधे निर्माण करून आपली वतनदारी टिकवून ठेवावयाची.  त्या काळी सर्व मुस्लिम सत्ताधारी असल्यानं कुठल्यातरी खानाची सत्ता असायची.  त्या खानांनी दिलेल्या दानावर निर्माण झालेला समाजातील एक वर्ग स्वतःला खानदानी समजू लागला.  महाराजांनी या वर्गाची मानसिकता ओळखली होती.  वतनाकरिता ही मंडळी फितूर व्हायची.  या फितुरीचा धोका स्वराज्यास व्हायचा.  महाराजांनी आपल्या स्वराज्यात वतनदारी पद्धत नष्ट केली.  असा हा ९६ कुळी, खानदानी व कुलवंताचा इतिहास आहे.  घरंदाज घराणी स्वराज्याशी इमान राखून राहिली.  तीच खरी घरंदाज घराणी स्वातंत्र्य चळवळीत सामील झाली.  स्वातंत्र्य मिळताच या घरंदाज घराण्यातील सामान्य व्यक्ती बहुजनांच्या पाठिंब्यावर सत्तेत येत आहेत.'' साहेब.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org