मराठी मातीचे वैभव- ९ प्रकरण ३

३ बलवंत यश सरले ! !

शिवाजी सावंत

दि. २५ नोव्हेंबर १९८४ रोजी या मराठी मुलखातून एक 'बलवंत' 'यश' उभ्या भारत देशाला धक्का व तीव्र शोक देऊन गेले.  स्वातंत्र्यसंग्रामातला ज्याला सच्चा धडाडीचा असा 'शेवटचा' वैचारिक क्रियाशील 'रोमन योद्धा' म्हणता येईल असा बलदंड राजपुरुष हरवला.

स्व. यशवंतराव चव्हाण तुमच्या आमच्यातून जाऊन आताशी कुठ फक्त चार एक वर्ष झालीत.  एव्हाच आपणाला अनेक आघाड्यांवर त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी तीव्रपणे जाणवायला लागली आहे.

यशवंतरावांची त्यांच्या जाण्यानंतर अनेक जाणत्या प्रज्ञावतंतांनी आधुनिक लो. टिळक अशी भलावण केली आहे.  अनेक वाद-विवादपटूंना ती अवास्तव वाटली आहे.  पण ती रास्त आहे.  लोकमान्यांनी सातशे वर्ष थंडगार गोळ्यासारख्या पडलेल्या या कोट्यवधींच्या जनसमूहात 'स्वराज्याची स्वातंत्र्याची' प्रेरणा व आच हक्क म्हणून भरली.  तेल्या-तांबोळ्यांचे ते जननायक झाले.  यशवंतरावांनी स्वातंत्र्यानंतर प्रथम महाराष्ट्राची बहुजनगंगा ज्ञानाच्या व आर्थिकाच्या आघाडीवर क्रियाशील पावले टाकून सतर्क व सजग केली.  त्यासाठी विषवत् असलेली कठोर टीका प्रसंगी शंकराचं शाळीग्रामी, निर्धारी मन करून पचविली.  प्रथम महाराष्ट्र सत्ता-विकेंद्रीकरण व डोळस सहकारी क्षेत्राच्या आघाडीवर पुढे खेचून आणला.  मग १९६२ साली देशावर चीनचं आक्रमण येताच पंडितजींच्या आवाहनाला कष्टाळू सेवेनं रोकडा प्रतिसाद दिला.  महाराष्ट्र सावरणार्या यशवंतरावांनी आपल्या सायवळ हातांनी व हितकर दूरदृष्टीच्या बुद्धिमत्तेनं भारताच्या संरक्षण खात्यातील निर्माणाचा विभाग व अनुशासनाचा विभाग इतका भक्कम कार्यक्षम केला की, १९६५ च्या पाकबरोबरच्या संघर्षात देशानं १९६२ मध्ये झालेली नामुष्की धुऊन काढली.  पुढे परराष्ट्र, अर्थ व गृह अशी देशाची महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली.

१९६५ पर्यंतचे यशवंतरावांचे राजकीय जीवन हे नीलवर्णी आकाशमार्गावर सरसरत झेपावत जाणार्या सुवर्णी बाणासारखं आहे.  त्यांच्यावर पूर्वी टीका करणारेही राजकारणातही चाललेली चाजही धुळवड बघताना बोलून जाताना दिसतात की, ''साहेब गेले ते आपल्याबरोबर महाराष्ट्रात अनेक आघाड्यांवरचे, क्रियाशील म्हणजे विधायक असं बेरजेचं श्रेय घेऊन गेले.  त्यांच्या जाण्याबरोबर एक 'बलवंत' 'यश' महाराष्ट्र नक्कीच हरवून बसला आहे.  स्व. यशवंतरावांच्या अकाली हरवण्यामुळं महाराष्ट्राची दिल्ली दरबारातील असलेली पत व वट कितीतरी टक्क्यांनी कोसळली आहे.''

यशवंतराव तडकाफडकी जाणं हा महाराष्ट्राच्या अनेक आघाड्यांवरचा वर्मी घाव तर आहेच, पण उभ्या देशाचा विचार केला तर राष्ट्रहिताच्या वैचारिक बँकेतील ती एक जबरदस्त हानी आहे.  ज्या पिसं कुरतडत जाणार्या वाटेनं त्यांना एकेकाळी ऐटदार मयूराचं जीवन संपन्न केलेल्या आठवणी जपत जाणं लागलं आहे, याचं स्मरण तर त्यांच्यावर निरपेक्ष व निकोप प्रेम करणार्या कुठल्याही भारतीयाला केवळ उद्विग्न करणारं आहे.

सतत सभोवती वावरणार्यांनाही यशवंतरावांच्या अभिजात देशप्रेमाची जातकुळी नेमकी काय होती, तिची पाळंमुळं त्यांच्या बालमनावर संस्काररूपानं कशी शिल्पासारखी कोरली गेली होती हे कधीच कळलं नाही.  यशवंतरावांच्या अडगर किशोरवयात घडलेली एक अत्यंत बोलकी अशी संस्कारदायी घटना त्यांच्या उभ्या व्यक्तिमत्त्वालाच स्पष्ट व ढळढळीत दर्पण दाखविणारी आहे असं मला नेहमीच प्रकर्षानं वाटत आलं आहे.  यशवंतरावांची राष्ट्राची कल्पना, त्यांचं स्वातंत्र्यप्रेम, त्यांची नेहमीच दृग्गोचर होणारी प्रगल्भ जाण, त्यांचं सुसंस्कारित व माणूसवत्सल मन या सर्वांचच मूळ या छोट्या घटनेत सखोलपणे व चपखल बसलेलं जाणवतं.  

ती घटना अशी आहे - 'देवराष्ट्रे' हे कर्हाडजवळचं छोटेखानी गाव.  हे यशवंतरावांचे जन्मगाव.  तेथून ते हायस्कूलच्या शिक्षणासाठी कर्हाडला आले.  एका नातेवाइकाकडं राहिले.  त्यांचं वय १४ ते १६ असं शाळकरी असतानाच ते स्वातंत्र्याच्या लढ्याकडं ओढले गेले होते.  हे साधारण २८ ते ३० साल होतं.  लो. टिळकांचा राजकीय क्षितिजावरून अस्त होऊन म. गांधीजींची विचारधारा देश स्वीकारत चालला होता.  याच काळात बंगालमधील थोर क्रांतिकारक यतीनदास यांनी तुरुंगात राजकीय कैद्यांना ब्रिटिश सरकार अमानवी व निर्दय वागणूक देत आहे म्हणून निषेधार्थ कठोर उपोषण केलं.  त्या काळात ते उपोषण फारच गाजलं होतं.  उभा भारत देश यतीनदासांच्या श्वासाबरोबर थडथडत होता त्या वेळी.  त्या थोर व कृतानिर्धारी क्रांतिकारकाची तब्येत कशी आहे याची वजन, नाडी, झोप या तपशिलासह देशाला गुपचूप माहिती देणारी पत्रक त्यांचे तुरुंगाबाहेरील चाहते क्रांतिकारक मित्र गुप्तपणे छापत व हातोहात देशभर वाटत.  उभा देश ती पत्रके औत्सुक्याने वाचत असे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org