मराठी मातीचे वैभव- ८७

राजकीय क्षेत्रात जागृती निर्माण करणे व सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी श्री. वसंतराव नाइकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली व याबाबत १ मे १९६२ ला जिल्हा परिषदा व पंचायत समित्या स्थापन करण्यात आल्या.  त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाला वेग आला.  नवे ग्रामीण नेतृत्व निर्माण झाले.  राजकारभार व्यवस्थितपणे चालवू शकणा-या अनुभवी नेते प्रशासकाचा वर्ग निर्माण झाला.

कोकणच्या विकासासाठी कोकण रेल्वे मार्ग सुरू करण्यात आला.  दिवा ते पनवेल मार्गाची सुरुवात पण करण्यात आली.  

इतर अनेक महत्त्वाचे निर्णय ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना घेतले गेले.  त्यात उल्लेखनीय असे खालीलप्रमाणे आहेत.

खेळाच्या विकासासाठी त्यांनी मदत केली.  १९५९ साली मुंबईत पहिली राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा त्यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आली.  विकासासाठीही त्यांनी प्रेरणा दिली.  १९५८ साली महारवतन रद्द केले.  तसेच महारांना मिळणा-या सवलती नवबौद्धांनाही मिळतील असे त्यांनी मान्य केले.  पददलितांना न्याय देण्यासाठीचाच हा निर्णय होता.  महात्मा गांधींच्या खुनानंतर महाराष्ट्रात ब्राह्मणांची घरे, दुकाने, कारखाने नष्ट करण्यात आली होती.  ती नव्याने निर्माण करण्यासाठी सरकारने कर्जे दिली होती.  त्यांची परतफेड करणे अनेकांना अशक्य होते म्हणून यशवंतरावांनी जळीत-पीडितांची कर्जे माफ केल्याची घोषणा केली.  या सर्व गोष्टींमधून यशवंतरावांचा उदार दृष्टिकोण व दूरदृष्टी याचा प्रत्यय येतो.  १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले.  देश अतिशय कठीण परिस्थितीत असताना यशवंतरावांना संरक्षणमंत्रिपदी नेमण्यात आले, आणि देशाच्या विविध समस्यांशी झुंजत राहण्याचे कार्य सुरू झाले.  यशवंतराव दीर्घकाळपर्यंत (१९६२ ते १९८० पर्यंत अडीच वर्षे वगळता) केंद्रीय सत्तेत वित्त खात्याचे प्रमुख म्हणून काम पाहात होते.  या काळात अवाढव्य देशाच्या अवाढव्य समस्यांशी गनिमी काव्याने लढण्याचे 'मराठा तंत्र' त्यांनी अवलंबिले.  संरक्षण, अर्थ परराष्ट्र व्यवहार व गृह खात्याचा कारभार त्यांनी समर्थपणे पाहिला.  उपपंतप्रधानपदाची धुराही त्यांनी काही काळ सांभाळली.  आधुनिक काळात दिल्लीवर प्रभावी सत्ता गाजवू शकणारा एकमेव महाराष्ट्रीय नेता असा त्यांचा उल्लेख करणे भाग आहे.

यशवंतरावांचे काही मौलिक विचार

(१) इतिहासाने काही अडचणी निर्माण करून ठेवल्या असल्या तरी त्या आता आपण बाजूला सारल्या पाहिजेत.  पूर्वी हिंदुस्थानचा जो इतिहास घडला त्याला तुम्ही आणि मी जबाबदार नाही.  कारण तो इतिहास तुम्ही आणि मी, तुमच्या आणि माझ्या हाताने घडविला नाही.

भंगलेली मने जोडून जातीयवादाच्या या विषारी विचारापासून महाराष्ट्राला मुक्त करावे.  'मराठा' या शब्दामागे महाराष्ट्राच्या एकजिनसी जीवनाची भावना आहे.  भंगलेले मन जर आपल्याला एक करावयाचे असेल तर दोन गोष्टींची आवश्यकता आहे.

(१)  आपण एकमेकाकडे संशयाने पाहावयाचे नाही.  संशय निर्माण करावयाचा नाही.

(२)  गुणांची पूजा बांधावयाची.

राष्ट्रनिष्ठा आणि महाराष्ट्रनिष्ठा हातात हात घालून चालली पाहिजे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org