मराठी मातीचे वैभव- ८० प्रकरण १८

१८ नवमहाराष्ट्राचे भाग्यविधाते : यशवंतरावजी चव्हाण

प्राचार्य जे. यु. चामरगोरे

स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील तरुण पिढीचे भाग्यविधाते कै. यशवंतरावजी चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१४ रोजी देवराष्ट्रे या खेडेगावी सातारा जिल्ह्यात झाला.  १९२० पासून महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतात स्वातंत्र्याची चळवळ फोफावत होती.  त्यामुळे अगदी वयाच्या सोळाव्या वर्षीच ते माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी असताना म. गांधींनी सुरू केलेल्या कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी उडी घेतली.  घरची एवढी वाईट परिस्थिती असतानादेखील भविष्याची मुळीच पर्वा न करता यशवंतरावांनी १९३० साली गांधीप्रणीत अहसकारितेच्या चळवळीत भाग घेतला.  घरादाराची जीविताची पर्वा केली नाही.  त्यामुळे त्यांना १९३२ मध्ये १८ महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला.  लहान वयातच भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रवादी विचाराची त्यांच्यावर छाप पडली.  ब्रिटिशांचे राज्य नष्ट व्हावे व भारतास स्वातंत्र्य मिळून सामान्य माणसाची सामाजिक व आर्थिक गुलामगिरीतून मुक्तता व्हावी म्हणून त्यांनी सातारा काँग्रेसमध्ये काम करण्यास सुरुवात करून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली.

१३८ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची पदवी व १९४० मध्ये एलएल.बी.ची पदवी प्राप्त करून वयाच्या २६ व्या वर्षी वकिली व्यवसायास सुरुवात केली.  १९४२ च्या मे महिन्यात त्यांचे वेणूताईंशी लग्न झाले.

ऑगस्ट १९४२ मध्ये म. गांधींनी ब्रिटिशांना 'चले जाव' ची आज्ञा देऊन गुलामगिरीत खितपत पडलेल्या भारतीयांना मोलाचा मंत्र देऊन स्वातंत्र्य लढ्यासाठी प्रवृत्त केले.  त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रातसुद्धा उमटले.  कै. यशवंतरावजींनी कै. किसन वीर व इतर सहका-यांसोबत सातारा जिल्ह्यातील भूमिगत चळवळीत भाग घेऊन सदरहू चळवळीचे नेतृत्व केले.  त्यांच्या पत्नी वेणूताई ह्या एप्रिल १९४३ मध्ये अत्यंत आजारी असल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी म्हणून ते आले असताना त्यांना अटक झाली.  त्याच वर्षी त्यांना त्यांचे ज्येष्ठ बंधू यांच्या मृत्यूचा आघात सोसावा लागला.

महात्माजी म्हणत की माझ्या सार्वजनिक कार्यात माझी पत्नी कस्तुरबाचा सिंहाचा वाटा आहे.  त्याचप्रमाणे यशवंतरावजींच्या कार्यात त्यांच्या पत्नी वेणूताईंच्या त्यागाचा महत्त्वाचा भाग आहे.  वेणूताईंच्या अशक्त प्रकृतीबद्दल कोणी प्रश्न काढला की यशवंतराव म्हणतात, ''तिची प्रकृती खराब व्हायला मी कारणीभूत आहे.''

१९४५ ला यशवंतरावजींची तुरुंगातून सुटका झाली.  १९४६ मध्ये त्यांनी मुंबई विधिमंडळाच्या निवडणुकीत कराड मतदारसंघातून निवडणूक लढविली व ते निवडून आले.  त्यानंतर मुंबई राज्यात मोरारजी भाईंच्या मंत्रिमंडळात गृहखात्याचे पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून त्यांची निवड करण्यात आली.

१९५२ साली मुंबई विधिमंडळाच्या सार्वत्रिक निवडणुकीत कराड मतदारसंघातून पुन्हा निवडून आले व त्या वेळच्या मुंबई राज्याच्या मोरारजीभाईंच्या मंत्रिमंडळात पुरवठामंत्री म्हणून त्यांना घेण्यात आले.

विशाल द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाल्यानंतर १९५६ च्या नोव्हेंबरमध्ये श्री. यशवंतरावजी वयाच्या ४२ व्या वर्षी मुख्यमंत्रिपदी आरूढ झाले.  

१ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन नवीन राज्याचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावजींची निवड झाली.

यशवंतरावजी गरीब, शेतकरी व सामान्य कुटुंबातून पुढे आले.  त्यांनी अनंत हालअपेष्टा सोसून शिक्षण घेतल्यामुळे त्यांच्यात ध्येयवाद, राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्याची तयारी व सामान्य माणसाविषयी खरीखुरी तळमळ दिसून येते.  विद्यार्थी असताना यशवंतरावजींना त्यांच्या गरीब परिस्थितीमुळे शाळेची फी भरणे अशक्य होते.  इतर चारचौघांसारखे चांगले कपडेच काय पण पायात चप्पलसुद्धा घालता येणे त्यांना शक्य नव्हते.  अशा गरीब व सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले यशवंतरावजी जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किंवा स्वतंत्र भारताचे उपपंतप्रधान झाले तेव्हा राष्ट्रपिता म. गांधीजींची महत्त्वाकांक्षा खरी झाली असे म्हणता येईल.

मुख्यमंत्रिपदाची जिम्मेदारी मी शेतकरी, कष्टकरी जनतेसाठी घेतलेली आहे व मी जर त्या कामात चुकलो तर शेतकरी, कष्टकरी अशा पदास नालायक आहे अशी सर्व भारतीयांची समजूत होईल असे ते मानत.  यशवंतरावजींनी गरीब व सामान्य शेतक-यांचे कोणत्याही प्रकारे शोषण होऊ नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org