मराठी मातीचे वैभव- ७९

१९५२ पासून सत्तेच्या खुर्चीवर ते प्रत्यक्ष बसल्यानंतर, दिवसभर काम करताना लहानांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून आपण काही केले का ?  याची बोच त्यांच्या मनात सतत राहिली.  आपल्या जुन्या प्रेरणा काय होत्या ?  आणि सत्तेत आल्यानंतर त्या शाबून राहिल्या आहेत का ?  याचा अंतर्मुख होऊन विचार करणारा हा नेता त्यामुळेच सत्तेत टिकला आणि लहान सर्वसामान्यांसाठी काम करू शकला.  समाजातील श्रीमंत पुढारी, सत्ताधारी यांच्यातील अनेकजण स्वार्थी व विषयलोलुप बनलेले आहेत हेही यशवंतरावांनी आपल्या जीवनात पाहिलं.  त्याचबरोबर गरीब, अडाणी, सामान्य जनताही सचोटीने जगताना पाहिली.  त्यामुळे ते जातील तेथे गरीब व मध्यम स्थितीतल्या लोकांमध्ये अधिक मिसळले.  सर्वसामान्य लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोण त्यांनी असा ठेवला की, राजकारणात आपण मोठे झालो.  परंतु एका मनुष्याने मोठा होऊन, पूर्णत्वाला जाऊन देशापुढच्या समस्या सुटणार नाहीत.  यासाठी अनेकांनी अनेक पातळीवरून मोठा व्हायला पाहिजे.  किमान थोडंतरी मोठं बनलंच पाहिजे.  या तळमळीने यशवंतराव ग्रस्त असल्याने राजकारणात, उद्योगात, सरकारात आणि अन्य विविध क्षेत्रांत अनेकांना त्यांनी या दृष्टिकोणातून संधी उपलब्ध करून दिली.  सहसा कोणाच्या गुणांचा कधी अव्हेर केला नाही.  आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुधारण्याचाच प्रयत्न यशवंतरावांनी अनुष्यभर केला.  प्रत्येकाशी संवाद साधून त्याला संतोष प्राप्त करून देण्यात त्यांची वर्षांमागून वर्षे खर्ची पडली.  अनेकांशी त्यांनी व्यक्तिगत संबंध जोडला.  तत्त्व कितीही उच्च असले तरी त्याची कसोटी त्या तत्त्वांच्या आचरणातच लागते ही यशवंतरावांची भूमिका असल्याने त्यांच्याकडे येणारे कुणी बुद्धिमान तरुण असोत किंवा अडाणी, गरीब शेतकरी असोत त्यांच्या दैनंदिन जीवनात राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रप्रेम रुजले पाहिजे यावर त्यांनी कटाक्षाने सतत भर दिला.

यशवंतरावांच्या संगतीत हजारो माणसे आली परंतु एकदा भेटलेला माणूस पुन्हा पाहताच त्यांना ते बरोबर नावाने हाक मारीत व क्षेमकुशल विचारीत.  ऐकणाराही त्यामुळे चकित होत असे.  एवढा मोठा माणूस पण त्यांनी आपलं नाव लक्षात ठेवलं याचा आनंद अशा वेळी त्या माणसाच्या मनात जन्मभर टिकतो.  राजकीय डावपेचात त्यांना कोणी लबाड ठरवलं तर कोणी सत्तालोलुप म्हटलं.  म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही अशा अधांतरीपणानं कुंपणावर बसून राजकारण करतात असा आरोपही कुणी त्यांच्यावर केला.  कुणी दुरून त्यांच्याविषयी विनाकारण गैरसमज करून घेतला.  परंतु प्रत्यक्ष परिचय होऊन निकट संबंध आला की त्यांच्याविषयी अनेकांचे मत बदलून गेले.

मुळात यशवंतराव हा माणूसच मोठ्या मनाचा माणूस.  देशासाठी, समाजाच्या हितासाठी विरोधकांचे आर्जव करण्याची वेळ आली तरी त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.  अनेकदा त्यांनी विरोधकांच्या गोटात त्यांच्या पुढा-यांकडे स्वतःच अनाहूतपणाने जाऊन सामाजिक स्वास्थ्य टिकविण्याचा प्रयत्न केल्याची उदाहरणे आहेत.  या प्रसंगी एक घटना आठवते ती अशी - मुंबईला हुतात्मा स्मारकाच्या उद्धाटनास उपस्थित राहून विरोधकांना त्यांनी आश्चर्यचकित केले.  संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मुंबईतील गोळीबारात जे कामी आले त्यांचं एक स्मारक फ्लोरा फाऊंटनच्या ठिकाणी समितीच्या नेत्यांनी उभारले.  या स्मारकास उपस्थित राहण्यासाठी त्यांना निमंत्रणपत्र अशा वेळी पोचविण्यात आले की त्यासंबंधी विचार करण्यास अवधीच उरू नये.  निमंत्रण मिळाले, त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता यशवंतराव निघाले आणि फ्लोरा फाऊंटनच्या ठिकाणी समारंभात दाखल झाले.  त्यांना अचानक आलेले पाहताच सारेच चपापले.  यशवंतराव उपस्थित राहिले नसते तर विरोधकांना टीकेसाठी भांडवल मिळणार होते.  प्रश्न महाराष्ट्राच्या भावनेचा होता.  परंतु यशवंतरावांनी मुख्यमंत्रिपदाचा मोठेपणा, समारंभास उपस्थित राहण्याच्या पद्धती वगैरे सर्व बाबी बाजूस ठेवून स्वतः तेथे उपस्थित झाल्याने विरोधकांची अपेक्षित भांडवलाची हवाच निघून गेली.  समाजाच्या हिताचे जे जे काही घडणार असेल त्यासाठी मानपान, प्रतिष्ठा, सत्ता या गोष्टी बाजूला ठेवून समाजहितालाच प्राधान्य देण्याच्या यशवंतरावांच्या या स्वभावामुळेच हे घडू शकले.  झाल्या-गेल्याचा विसर आणि पुढच्याचा विचार हा एक त्यांच्या स्वभावाचा विशेष पैलू होता.

महाराष्ट्राने हिमालयाऐवजी जी माणसे निर्माण केली व ज्यांनी हिमालयाचे उत्तुंगत्व व भारताचे स्वातंत्र्य जतन करण्याकरता आपले जीवनसर्वस्व अर्पण केले त्यामध्ये यशवंतरावांचं स्थान वरच्या दर्जाचे आहे.  महाराष्ट्राची जडण-घडण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहेच.  परंतु भारताच्या राजकारणातही त्यांनी अनन्य साधारण कामगिरी बजावली आहे.  स्वदेश त्यांनी सर्वश्रेष्ठ मानला व शेवटच्या श्वासापर्यंत त्याचेच एकमेव चिंतन केले.  जनसामान्यांतून उदयास आलेला हा असामान्य लोकनेता काळाच्या पडद्याआड निघून गेला यावर विश्वास ठेवण्यास मन अजूनही तयार होत नाही, इतका हा नेता या मातीशी एकरूप झालेला होता.  ज्यांच्या निधनाने महाराष्ट्राची प्रकृती क्षीण होते असे बोटावर मोजता येतील अशी जी काही कर्तबगार मंडळी आहेत त्यांमध्ये स्वातंत्र्योत्तर काळात यशवंतरावांना अग्रमान द्यावा लागेल.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org