मराठी मातीचे वैभव- ७७ प्रकरण १७

१७ यशवंतराव :  एक माणूसवेडा माणूस

प्रा. भूषणकुमार जोरगुलवार, (शहापूरकर)

यशवंतराव चव्हाणांच्या बाबतीत विचार करताना रोमा रोलाँ यांच्या प्रसिद्ध विधानाची आठवण होते की, ''महापुरुष हे उंच पर्वतशिखराप्रमाणे असतात.  वारे त्यांच्यावर प्रहार करतात, मेघ त्यांना झोकाळतात, परंतु तेथेच अधिक मोकळेपणाने व जोरदार रीतीने आपण श्वासोच्छवास करतो.''  रानडे, गोखले, नौरोजी व टिळक यांच्यानंतर अखिल भारतीय राजकीय नेत्यांमध्ये ज्यांचा समावेश करता येईल असा महाराष्ट्रीय नेता एकटाच झाला आणि तो म्हणजे यशवंतराव बळवंतराव चव्हाण.  विसाव्या शतकाच्या सहाव्या दशकाच्या उत्तरार्धात यशवंतरावांचे जीवननाट्य एका राष्ट्रीय उत्कर्षबिंदूपर्यंत पोहोचते.  प्रादेशिक राज्याचा मुख्यमंत्री एकभाषिक प्रादेशिक राज्य शांततापूर्ण मुत्सद्देगिरीने निर्माण करण्यात यशस्वी होतो, महाराष्ट्राच्या इतिहासात एक युगप्रवर्तक कालखंड म्हणून इतिहासकाराला त्याची नोंद घ्यावी लागते.

वास्तविक पाहता संयुक्त महाराष्ट्राचा लढा १९४६ साली सूरू झाला आणि १९६० साली विजयी झाला.  महाद्वैभाषिक मुंबई राज्याचे यशवंतराव मुख्यमंत्री झाले तेव्हाची परिस्थिती अशी होती की, यशवंतराव हे केंद्र सत्ताधा-यांच्या कूट कारस्थानाला बळी पडले आणि संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे उद्दिष्ट संकटात सापडले असे वाटावे.  संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हजारो लोकांना अटक झाली, हजारो गोळीबार झाले, शेकडो लोकांना कैदेची शिक्षा झाली आणि एकशेपाच लोकांना हुतात्मा बनावे लागले.  अशा अतिशय नाजूक, विद्रोहग्रस्त व स्फोटक परिस्थितीत जरी यशवंतराव हे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले तरी सबंध महाराष्ट्र असंतुष्ट व अस्वस्थ होता.  भाषिक प्रादेशिक राज्य निर्माण करण्याच्या विरुद्ध खुद्द पंतप्रधान नेहरू, व त्यांचे केंद्रीय मंत्रिमंडळा होते.  महाराष्ट्रातील द्वैभाषिक राज्य प्रामाणिकपणे राबविण्याची प्रतिज्ञा करूनच यशवंतराव सत्तारूढ झाले आणि तीन वर्षे प्रामाणिकपणे ते राबवलेसुद्धा.  अशा प्रतिकूल परिस्थितीत यशवंतरावांनी सर्वत्र सामंजस्याचे वातावरण निर्माण केले, विरोधी पक्षनेत्यांनासुद्धा मित्रभावनेने वागवले.  पण शेवटी हे द्वैभाषिक राज्य चालविणे यापुढे काँग्रेस पक्षाच्या कुवतीपलीकडचे आहे हे स्पष्ट झाले.  तेव्हा पंडित नेहरूंसारख्या मुत्सद्दयांना यशवंतरावांनी पटवून दिले की, काँग्रेस पक्षाच्या मिठीतून हे महाद्वैभाषिक मुंबई राज्य आता निसटणार व गुजराथ आणि महाराष्ट्र अशी दोन स्वतंत्र राज्ये निर्माण करणे अपरिहार्य आहे.  या ठिकाणी हृदयपरिवर्तनाच्या राजकारणाची व मुत्सद्दीपणाची कसोटी लागली.  प्रामाणिकपणे महाद्वैभाषिक मुंबई राज्याचा मुख्यमंत्री विद्वेषाच्या आणि विग्रहाच्या राजकारणातून महाराष्ट्राला आणि गुजराथला प्रेमाच्या आणि मैत्रीच्या राजकारणाकडे मोठ्या कौशल्याने नेऊ शकला.  ही घटनाच मुळी महाराष्ट्राच्या इतिहासात एकाकी आहे.

यशवंतरावांच्या जीवनातील १९४६ ते १९७५ हा जो तीस वर्षांचा कालखंड आहे तो अतिशय बहारीचा कालखंड होय.  या काळात यशवंतराव चढत्या क्रमाने अनेक पदांवर रुजू झाले.  अनेक उच्चपदे त्यांनी समर्थपणे भूषवली व पेलली.  या काळात यशवंतराव म्हणजेच महाराष्ट्र असे समीकरण बनले.  काँग्रेस पक्षाची तर अशी अवस्था होती की, यशवंतराव बोले आणि काँग्रेस हाले.  संपूर्ण मराठा समाजाचे नेतृत्व त्यांच्याकडे आले.  त्या वेळच्या कोणत्याही काँग्रेस पुढा-याची ताकद त्यांच्या विरोधी जाण्याची नव्हती.  महाराष्ट्रातील त्यांचे स्थान व कर्तृत्व ओळखूनच केंद्रीय नेतृत्वाने त्यांना विशाल अशा राष्ट्रीय प्रवाहात आणले.  तेथेही त्यांनी आपली अमीट अशी वैशिष्ट्यपूर्ण छाप पाडली.  लाघवी वाणी, सखोल गाढ वाचन, अभ्यासूवृत्ती यामुळे त्यांनी संसदेमध्येही आपले विशिष्ट स्थान निर्माण केले होते.  मराठी भाषेवर त्यांचे अपरंपार प्रेम होते.  पूर्ण आयुष्यात त्यांच्यावर घडलेल्या सुसंस्कारांमुळेच हे सारे झाले.  जे जे म्हणून चांगले आहे ते ते आपणास माहीत असावे ही यशवंतरावांची भूमिका.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org