मराठी मातीचे वैभव- ७४

राजकारणात सत्तेचा वापर अटळ असतो.  सत्तावापर हेच राजकारणाचे मुख्य सूत्र असते.  सत्तेचा वापर इतका जाणीवपूर्वक, समजून आणि समतोल, सर्वांगीण दृष्टीने करणारा नेता यशवंतरावजी चव्हाणांइतका क्वचितच असेल.  महाराष्ट्र राज्याची निर्मती ही शिवरायाची पुण्याई आहे या त्यांच्या ठाम श्रद्धेतच सत्तेची त्यांची कल्पना स्पष्ट होते.  जनतेला काय वाटते हे महत्त्वाचे आहे ते जाणून सत्तेचा वापर केला पाहिजे असे त्यांना वाटे.  आर्थिक विकासातील नियोजनाचे महत्त्व हे, कोणत्याही शासनपद्धतीवर अवलंबून नसते.  सत्ता अशी वापरावी की तिचा फायदा सर्वसामान्य लोकांना मिळाला पाहिजे.  सांगलीच्या सभेत एकदा ते म्हणाले होते की, मी सेवेचा अधिकार घेऊन राजकारणात आलो आहे.  म्हणून ते म्हणत की सत्तेचा वापर करीत असताना प्रशासनाने किंवा धुरीणांनी सत्तेचा वापर आपण कशासाठी करीत आहोत याचा दररोज विचार केला पाहिजे.  साधा पोलिसही गणवेश चढविला की सत्तेबद्दल एकदम जागरूक होतो.  पण यशवंतरावजी एवढे मोठे सत्ताधारी असूनही अहंकाराचा साधा स्पर्शही त्यांना कधी झाला नाही.  सत्ता त्यांच्याकडे नम्रपणेच वागली.  ती उद्दाम कधीच झाली नाही.  मुख्य म्हणजे नेहमीच सत्ता त्यांच्याकडे आपण होऊन चालत आली.  दिल्लीला १९६२ मध्ये संरक्षणमंत्री म्हणून जाताना सत्तेचा वाद खेळण्यासाठी आपणाला बोलावले नसून देशाच्या कर्तव्यपूर्तीसाठी आपण जात आहोत की खूणगाठ त्यांनी पक्की केली होती.  तसेच ते पुढे वावरलेही.  सत्ता हेच सर्वस्व त्यांनी कधीच मानले नाही.  सत्ता व सामाजिक कार्य यांचा अनुक्रम ठरविताना सत्ता ही सामाजिक का-यासाठीच वापरावी ही ठाम श्रद्धा त्यांनी मनात जपली होती.  म्हणूनच एस. एम. जोशीसारखे सर्वमान्य नेते त्यांना लोकशाहीवादी प्रवृत्तीचा नेता हे सार्थ विशेषण लावतात.  सत्तेचा वापर इतक्या सुसंस्कृतपणे क्वचितच कोणी केला असेल.  सत्तेच्या राजकारणाच्या आडदांड जंगलात हे कठीणच असते.  उलट सत्ता वापरताना गोंजारून, पटवून ते विरोधाचे धुके वितळवून टाकीत.  दूरदृष्टीने धोरणे आखून समस्यांची उकल करीत.  सहकार, जिल्हा परिषदा ही त्याची उदाहरणे होत.  कौश्यल्याने प्रशासकीय निर्णय घेणे हा तर त्यांचा स्थायिभावच होता.  त्वरित व स्वच्छ निर्णय घेण्याच्या त्यांच्या कुशलतेने त्यांना उत्कृष्ट प्रशासकाच्या पंक्तीत नेऊन बसविले.  राज्यकारभार चालविताना एखादा मुद्दा इतरांना न पटला तर मोठ्या खुबीने ते आपली नाराजी व्यक्त करीत.  त्यामुळे अधिका-यांत त्यांच्याबद्दल आदराची भावना असे.  त्या काळातील सनदी अधिकारी ब्रिटिश परंपरेत वाढलेले असल्याने अहंकारी अलिप्तता त्यांच्यात प्रकर्षाने जाणवे.  त्यांचा दबदबाही असे.  परंपरेला चिकटून राहण्याची त्यांची प्रवृत्ती चाकोरीबाहेर जाऊन निर्णय घेणे अशक्य बनवीत असे.  इथे यशवंतरावजींनी प्रशासनात सामाजिक जाणीव सावधपणे निर्माण केली.  प्रशासकांची स्थितिप्रियता दूर केली.  त्यासाठीच अधिका-यांची निवडही ते कौशल्याने करीत.  अधिका-यांची कल्पकता व कार्यक्षमता व्यापक समाजका-यासाठी खर्च व्हावी असे त्यांना वाटे.  त्यासाठी बेडरपणे त्यांनी गुणवत्तेला अग्रक्रम दिला.  म्हणूनच स. गो. बर्वे, मधुसूदन कोल्हटकर, डी. डी. साठे, कृ. पां. मेढेकर यांसारखी प्रशासनात मुरलेल मातब्बर मंडळी यशवंतरावजींबद्दल सखोल आदर बाळगून असत.  स्वच्छ माणसाने उभी केलेली ही स्वच्छ माणसे होती.  त्यांचा कट्टर शत्रूसुद्धा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करू शकणार नाही.  राजकारणातील या दुर्गुणांचा दूरान्वयानेही तिथे स्पर्श नव्हता.  नेत्याला स्वच्छ लखलखीत प्रसन्न राजकीय, प्रशासकीय जीवन जगता येते हा महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वोत्कृष्ट प्रयोग होता.  राजकारणात एवढी निर्मळता, साधनसुचिता, एवढे सामंजस्य, मृदुता आजपर्यंत क्वचितच कोणी दाखविली असेल.

माणसे जोडण्याची अद्वितीय कुशलता हा यशवंतरावांचा स्वतःचा वैशिष्ट्यपूर्ण गुण होता.  कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणे व पुढे येण्याची संधी देणे, सहका-यांना विश्वासात घेणे, त्यांच्यावर जबाबदारी टाकून त्यांचा आत्मविश्वास वाढविणे हे त्यांचे वैशिष्ट्य.  तसेच विरोधी पक्षातही बुद्धिमान माणसे आहेत त्यांचाही उपयोग करून घेतला पाहिजे, त्यांच्याबद्दल मनात राग व सूडबुद्धी न ठेवता त्यांना समजून घेतले पाहिजे, ही त्यांची उदारमतवादी राजकारण करण्याची रीत होती.  अशा शांत व समतोल विचारसरणीचा अत्यंत वादळी परिस्थितीतही त्यांना फायदा झाला.  त्यामुळे विरोधकांतसुद्धा त्यांच्याबद्दल कमालीचा आदर असे.  एखादा मुद्दा हसतमुखाने विरोधकास पटवून देणे, डोंगराएवढ्या आपत्तीला अपार धीराने तोंड देणे, चौफेर दृष्टी ठेवून विरोधकांशी शांत वृत्तीने वागणे हे त्यांच्या राजकारणाचे सुसंस्कृत स्वरूप होते.  म्हणूनच संघटनाकुशल व गुंतागुंतीचे प्रश्न सोडविणारा कर्तबगार मुख्यमंत्री म्हणून त्यांनी लौकिक प्राप्त केला.  एवढा लोकसंग्रह करणारा नेता अलीकडे तरी महाराष्ट्रात झाला नाही.  स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांना दहशत बसविणारे आणि स्वातंत्र्योत्तर काळात संपूर्ण भारताचे मन जिंकून घेणारे हे एक दुर्मिळ व्यक्तिमत्त्व होते.  म्हणूनच जयप्रकाश नारायणांसारख्या अखिल भारतीय कीर्तीच्या नेत्यानेसुद्धा यशवंतराव चव्हाण भारताचे पंतप्रधान होऊ शकतील असा निर्वाळा दिला.  तसे राजकारण गढूळ चिखलासारखे असते पण त्यातूनही आपले स्वच्छ, प्रसन्न व्यक्तिमत्त्व टिकविण्याची कला त्यांनी कशी प्रयत्नपूर्वक जोपासलीहा कौतुकाचा विषय ठरेल.  त्यामागे मोठा आत्मसंयम व निग्रहीपणा आहे.  माणसांवर माया करण्याचा स्नेहार्द्र स्वभाव आहे.  इतरांच्या गुणांचे चीज करण्याची उदात्त वृत्ती आहे.  ब्रिटिश मुत्सद्दी डिझरेली म्हणतो की राजकारण फक्त उपयुक्ततेला स्थान व मान आहे, स्नेहाला नाही.  त्यांनी राजकारणात या रूक्ष चाकोरीच्या व संकुचित स्वार्थाच्या परिघाबाहेर नेले. खाजगी भेटीत दिलेला शब्दसुद्धा ते पाळीत.  सहकारी व स्नेही यांच्याबद्दल इमान व स्नेह त्यांनी कधीही ढळू दिला नाही.  विरोधकांचाही स्नेह संपादन करण्याचे अतुल कौशल्य त्यांनी सतत दाखविले.  त्यामुळे ते इतके मितभाषी, संयमी, नेमके बोलणारे, सौजन्याने वागणारे झाले असावेत.  शब्दाला जागणारा, संग्राहक वृत्तीचा राजकारणी नेता ही त्यांची प्रतिमा अनेकांनी जपलेली आहे.  महाविदर्भासाठी उग्र आंदोलन करणारे वि. गो. देशमुख सुरुवातीला यशवंतरावजींचे कट्टर विरोधक पण यशवंतरावांमुळेच ते काँग्रेसमध्ये आले. 

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org