मराठी मातीचे वैभव- ७१

तसा विविध विषयांचा व्यासंग करणे हे यशवंतरावांची उपजत आवड होती.  साहित्यासह इतर सर्व कलांचा आस्वाद त्यांना राजकारणापेक्षाही महत्त्वाचा वाटत असे.  भारताच्या राजकारणात हा विशेष प्रामुख्याने पं. जवाहरलाल नेहरूंच्या व्यक्तिमत्त्वात पहिल्यांदा आढळतो.  पंडित नेहरूंच्या इतकीच रसिकता यशवंतरावांच्या जवळ होती.  स्वातंत्र्योत्तरकाळातील राजकारणात प्रभावी ठरलेल्या व्यक्तीत हे गुण मोडीत निघालेले दिसतात.  स्वातंत्र्यपूर्वकाळात मात्र राजकारणातील बलदंड नेते साहित्य, संस्कृती आणि कला यांच्याशी निकटचे जिव्हाळ्याचे नाते असलेले दिसतात.  यशवंतराव चव्हाण असे वैशिष्ट्य असलेले शेवटचे राजकारणी.

साहित्यावरचे त्यांचे प्रेम ही एक नितांत सुंदर वैशिष्ट्यपूर्ण घटना आहे.  राजकारणात ते जर नसते तर एक प्रतिभासंपन्न लेखक म्हणून त्यांना निश्चितच प्रतिष्ठा मिळाली असती.  हे विलोभनीय वैशिष्ट्य सत्तेच्या राजकारणात केवळ यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वातच होते.  यशवंतरावांचं पडलेलं भाषण जसं कुणी ऐकलं नाही तसा त्यांचा फसलेला लेखही कधी कुणी वाचलेला नाही.  यशवंतराव स्वतः एक शैलीदार वक्ते व लेखक तर होतेच.  पण मराठीतील व इंग्रजीतील उत्तमोत्तम लेखकांचे लेखन त्यांनी जितक्या आवडीने वाचले तितक्याच आवडीने मराठीतील सर्व वाङ्मयप्रवाहही त्यांनी अभ्यासले.  काव्य, कथा, कादंबरी, नाटके, ललितलेखन ते वेळात वेळ काढून अपूर्वाईने वाचत असत.  त्यांनी दिलेली दादही संबंधित लेखकाला मानाची वाटत असे.  फडके-खांडेकरांच्या कादंब-या, कुसुमाग्रज-बोरकर-अनिल-महानोरांची कविता ही त्यांना मनोमन आवडत असे.  दुर्गा भागवत, इरावती कर्वे यांचे ललितलेखन जितके त्यांना मोहवीत असे तितकेच गडकरी, अत्रे, पु. ल. देशपांडे यांचे विनोदी लेखनही त्यांना हवेहवेसे वाटत असे.  ग्रामीण व दलित वाङ्मयाचे त्यांचे वाचन जसे अद्ययावत होते तसे नाट्य, संगीत, चित्र या कलांतील त्यांची रसिकताही अतिशय निकोप होती.  वाङ्मयाच्या सर्व प्रकारांतील लेखनाशी जवळिक साधणे हा तर त्यांच्या सत्तेच्या राजकारणातील विरंगुळा होता, आणि समृद्ध जीवनाची उभारणी कलांच्या अभ्यासातून, आस्वादातूनच होते यावर त्यांची जाज्वल्य निष्टा होती.  प्रत्येक वैचारिक चळवळ स्वागतार्ह आहे, असे मानून तिच्यातील चांगलेपण टिपणे आणि ते वृद्धिंगत करण्यासाठी साहाय्यभूत होणे त्यांना फारफार मोलाचे वाटे.  लेखक साहित्यिक आणि कलावंतांनीही त्यांच्यावर प्रेम करण्यात व त्यांच्याशी जवळिक साधण्यात धन्यता वाटत असे.  

यशवंतरावांचे वक्तृत्व ही एक अपूर्व किमया होती.  उपमा-दृष्टान्त देण्यात व म्हणी-वाक्प्रचार वापरण्यात तर त्यांचा हातखंडा होता.  कुठलाही विषय पटवून देताना त्यांचे हे वैशिष्ट्य तीव्रतेने लक्षात येत असे.  शारदेचे तर त्यांना वरदानच लाभलेले होते आणि अगदी साध्या समारंभातसुद्धा उपचार म्हणून यांनी केलेले भाषणही कुठलातरी विचार समृद्ध करतच श्रोत्यांच्या अंतःकरणाचा ठाव घेत असे.  सभा शेतक-यांची असो की साहित्यिकाची असो की वैदिक पंडितांची असो की महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची, आपल्या आटोपशीर भाषणात श्रोत्यांनी मनःपूर्वक दाद द्यावी असा विचार ते मांडत असत आणि एखादी वीज चमकावी तसा विचार श्रोत्यांच्या मनात चमकून जात असे.  या दृष्टीने १९५२ साली पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत 'हिंदी लोकशाहीचे भवितव्य' या विषयावर भाषण करताना त्यांनी मांडलेला विचार पाहण्यासारखा आहे.  ते म्हणाले, ''गरीब मनात नव्या आकांक्षा निर्माण करून त्यांना कार्यप्रवण करण्यास प्रवृत्त करण्याऐवजी त्यांच्यात असंतोषच पसरवण्याचा प्रयत्न झाला तर रात्री त्याचे लक्ष त्या श्रीमंतांच्या तिजोरीकडे जाईल इतकेच. पण खरा प्रश्न कायमच राहील.  पैसा पुंजीपतीच्या किंवा सरकारच्या तिजोरीत नसून तो आकाशातील ढगात आहे.  त्या ढगातून खाली कोसळणा-या जलधारांत आहे.  त्या पाण्याच्या प्रवाहरूपी नदीत आहे.  नदीच्या दुकाठास मिळणा-या काळ्या जमिनीत आहे.  त्याच जमिनीतील खनिज संपत्तीत आहे.  त्याच खनिजसंपत्तीद्वारा निर्माण होणा-या वैज्ञानिक यंत्रसामग्रीत आहे.  इतकेच नव्हे तर त्या सर्वांना एका सूत्रात बांधणा-या मानवाच्या मनगटात आहे.  असे जर त्या गरीब जनतेला पटवून देऊन, त्यांच्यात सर्जनशक्ती निर्माण करून त्यांना कार्यप्रवण केले तर आपले सारे प्रश्न सुटतील व त्या सुटण्यातच भारतीय लोकशाहीचे भवितव्य सामावलेले आहे.'' - हा विचार किती नवीन आणि भव्य आहे.  यशवंतरावांच्या चिंतनातून तो निर्माण झालेला आहे.  त्यावरून त्यांच्या सर्जनशील प्रतिभेचा जसा प्रत्यय येतो, तसाच विधायक कार्यकर्तृत्वाचाही येतो.  मानवाच्या मनगटातील सामर्थ्यावर श्रत्र निर्माण करणारा हा नवीन विचार ऐकून श्रोत्यांचे अंतःकरण फुलून न गेले तरच आश्चर्य.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org