मराठी मातीचे वैभव- ७०

महाराष्ट्राने यशवंतरावांवर काही अपवादात्मक प्रसंग सोडले तर अपरंपार प्रेमच केले.  कारण त्यांच्यासारखे रसिले आणि राजकारणात यशस्वी ठरलेले अष्टपैलू नेतृत्व मराठी माणसाला प्रथमच पाहायला मिळत होते.  यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाची बव्हंशी जडणघडण राजकारणाने केली हे तर खरेच, पण त्यांनी जे राजकारण केले त्यामागे केवळ पक्षीय राजकारण नव्हते, हे आज निर्लेप मनाने विचार केल्यावर कोणालाही मान्य करावे लागेल.  त्यांनी जसं केवळ पक्षीय राजकारण केलं नाही तसं राजकारण म्हणजे जीवनसर्वस्व असंही कधी मानलं नाही.  प्रबोधनावर तर त्यांचा गाढ विश्वास होता, आणि मूळ म्हणजे सामान्य मराठी माणसाच्या मनावर ते सदैव विसंबून होते.  कारण या सामान्य माणसात ते वावरले होते.  या माणसांजवळ असलेली स्वातंत्र्यप्रीती, देशनिष्ठा आणि दारिद्रयातही आपल्या नेत्यावर श्रद्धा ठेवून त्यांच्या आदेशानुसार स्वतःची किंवा संपूर्ण संसाराची काळजी न करता सर्वस्वाने स्वतःला झोकून देण्याची वृत्ती त्यांनी जवळून पाहिली होती.  शिवाजीमहाराजांवर जिवापाड प्रेम करणारे अनेक मावळे याच मातीने दिले ही वस्तुस्थिती ते विसरू शकत नव्हते.  खेडं आणि खेड्यातील मन यशवंतरावांना जितकं कळलं तितकं ते इतर कुणालाही उमगलं नाही.  केवळ राजकारण करणं, सत्ता मिळवणे हा त्यांचा जीवनादर्श नव्हता.  शतकानुशतके दारिद्र्य भोगलेल्या शेतकरी-कामकरी जनतेलाही एक मन आहे, हे ते उमजू शकत होते, आणि केवळ शिक्षणाच्या अभावी उत्तम बुद्धी असलेलं खेडूत मन विकसित होऊ शकत नाही हे दुःख त्यांना सतत व्यथित करत होतं.  शाहू महाराज, म. ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगे महाराज यांनी शिक्षणाचं आवर्जून सांगितलेलं महत्त्व त्यांच्या डोळ्यासमोर तरळत असे.  खेडोपाडी शिक्षणाच्या सोयी उलपब्ध केल्या गेल्या तर बहुजनसमाजातून सुद्धा तोलामोलाची माणसं मिळू शकतात यावर त्यांचा विश्वास होता.  या सगळ्यांच्या परिणामी शहरी संघटनेपेक्षाही खेड्यातील संघटना अधिक प्रभावी राहू शकते यावर त्यांनी आपल्या राजकारणाचं गणित बांधलं आणि अगदी स्वातंत्र्य चळवळीपासून खेड्यातील असंख्य माणसांची संघटना त्यांनी अगदी काळजीपूर्वक निर्माण केली.  सर्वसामान्य माणसातील कर्तृत्व त्यांनी जागृत आणि संघटित केलं.  माणसं जोडणं, माणसांचा संग्रह करणे, आणि प्रत्येकातील दुर्गुणांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यातील सद्गुणांचा उपयोग करून घेणं त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचेच वैशिष्ट्य बसले.  सत्ताकारणात विरोधी पक्षातील अनेक माणसे ते आपल्याकडे आकर्षित करून घेऊ शकले याचे प्रमुख कारण त्यांनी प्रयत्नपूर्वक खेड्यातील माणसांचा विश्वास संपादन केला होता हे आहे.

भारतीय संस्कृतीची खोलवर रुजलेली पाळेमुळे ही त्यांना ज्ञात होती.  इंग्रजी वाङ्मयाच्या परिशीलनाने पाश्चात्त्य आणि पौर्वात्य विचारांची सांगड घालून जीवन समृद्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न असे.  जिथे जिथे जे जे चांगले दिसेल ते ते टिपण्याचा त्यांचा प्रयत्न असे.  म्हणूनच बहुजन समाजाचा नेता म्हणून जरी त्यांना प्रतिष्ठा मिळालेली होती तरीही सर्व जाति-जमातींतील नेते त्यांच्यावर खरेखुरे प्रेम करत असत.  प्रत्येकालाच त्यांच्या व्यक्तिमत्त्वासंबंधी जिव्हाळा वाटत असे आणि असा हा जिव्हाळा वाटावा अशी वागणूक समाजातल्या सर्व स्तरांतील लोकांची जवळिक साधून त्यांनी टिकवली होती.

यशवंतरावांचा पिंड कलासक्त होता.  साहित्य संस्कृती आणि अनेकविध कलांच्या आस्वादात ते रमत असत.  आरंभी एम. एन. रॉय यांच्या विचारसरणीने भारावून गेलेले त्यांचे मन केवळ तार्किकपणे शेवटपर्यंत रॉय यांचे अनुयायी म्हणून त्या म-यादेतच गुंतून पडले नाही.  तसेच बहुजन समाजाच्या भलेपणाचे कंकण बांधलेल्या सत्यशोधक चळवळीतही त्यांचे मन अडकून पडले नाही.  तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारख्या ज्ञानमहर्षीच्या सहवासात जसे त्यांचे विचार विकसित झाले तसे नाना पाटलांच्या क्रांतिकारी चळवळीचे महत्त्वही आत्मसात करणे त्यांना महत्त्वाचे वाटले.  लो. टिळक, गोपाळ गणेश आगरकर, मा. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा पगडा जसा त्यांच्या मनावर होता, अगदी तसाच मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचा पगडाही त्यांच्यावर होता.  म. गांधींच्या विचारांची आणि नेतृत्वाची यशस्विता त्यांना जशी भारावून टाकणारी होती, तद्वतच पं. नेहरूंच्या अजोड व्यक्तिमत्त्वाची त्यांच्या मनावर विलक्षण मोहिनी होती, आणि म्हणूनच नेहरू हा आधुनिक भारताचा युगपुरुष आहे, यावर त्यांचा गाढ विश्वास होता.  जवाहरलाल नेहरू, आचार्य कृपलानी, नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण यांची समाजवादी विचारसरणी त्यांना मनापासून पटत होती, आणि हे सगळं समजून घेण्यासाठी सतत अभ्यास करण्याची आवश्यकता त्यांनी आयुष्यभर महत्त्वाची मानली होती. त्यामुळे एकाच वेळी समतोल विचारवंत आणि व्यवहारी प्रज्ञावंत, सुसंस्कृत राजनीतिज्ञ आणि वैचारिक वसा जपणारा रसिला राजकारणी हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अपरिहार्य पैलू बनले होते.  त्यामुळं महाराष्ट्राच्या इतिहासात एवढा रसिकाग्रणी आणि चतुरस्त्र मुत्सद्दी व कर्तबगार राजकारणी दुसरा झाला नाही, याचे कारण भारताच्या राजकारणातील अनेक श्रेष्ठ व ज्येष्ठ व्यक्तींच्या जीवनाचा त्यांच्याइतका सखोल विचार अन्यकोणी केलेला नव्हता हे आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org