मराठी मातीचे वैभव- ६९

देवराष्ट्रेसारख्या चिमुकल्या खेड्यात, गरीब कुटुंबात जन्मलेला असा हा माणूस.  शिक्षणाची फार मोठी परंपरा चव्हाण कुटुंबाला लाभलेली नव्हती.  यशवंतरावांच्या वेगळेपणाचा विचार करताना आपण ह्या गोष्टी नेहमीच ध्यानात घेतो असे नाही.  यशवंतरावांना थोडेसे समजू लागले होते त्या काळात महाराष्ट्रात ब्राह्मणेतर चळवळ अतिशय जोरात होती.  सा-या ग्रामीण भागात या चळवळीविषयी विलक्षण ओढ होती.  आपुलकीची भावना होती.  पण एव्हाना जातिधर्म-पंथ-भाषा यांच्या पलीकडे असलेला निखळ आणि शुद्ध राष्ट्रवाद म्हणजे काय ते त्यांना उमगले होते.  त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीच्या जाळ्यात न अडकता, स्वातंत्र्यलढ्याच्या मुख्य प्रवाहात यशवंतरावांनी त्या वयातही स्वतःला बेभान होऊन झोकून दिले.  आज यशवंतरावांच्या या वागण्याविषयी तटस्थ राहून बोलणे, लिहिणे सोपे आहे.  यशवंतरावांच्या या निर्णयाचे मोल आणि महत्त्व त्या काळातला ग्रामीण महाराष्ट्र जाणण्याची दृष्टी ज्याच्या पाशी आहे, त्यालाच समजू शकेल.  ग्रामीण भागातून पुढे आलेला, खस्ता खात खात अडीअडचणीतून शिक्षण पूर्ण केलेला आणि कायम दारिद्-यातसुद्धा सतत वाचन, विचार व रसिकता जपलेला हा माणूस देशाच्या राजकारणात सतत चाळीस वर्षे या ना त्या नात्याने वावरला.  या दीर्घ काळात कुठल्या ना कुठल्या का-यात सर्व काळ मन गढून गेलेले यशवंतराव हे एक अनेकावधानी नेते होते.  बेचाळीसच्या स्वातंत्र्य आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता, किंवा स्वातंत्र्यसंग्रामात कोवळ्या वयापासूनच त्यांनी भाग घेतला होता ही बाब घरची परिस्थिती बिकट असतानाही सांसारिक गरजांपेक्षा सामाजिक गरजा जास्त महत्त्वाच्या मानणा-या त्यांच्या स्वभाववैशिष्ट्याची साक्ष देणारी आहे.  ग्रामीण भागातून आणि विशेषतः बहुजन समाजातून असे सर्वंकष नेतृत्व महाराष्ट्राला पूर्वी लाभलेलेच नव्हते.  अर्थात इतिहासाची साक्ष काढायची ठरली तर केवळ छत्रपती शिवाजीमहाराजांचाच तसा संदर्भ देता येऊ शकेल.  ग्रामीण भागाची परंपरा असलेल्या इतर अनेक समाजसुधारकांचा नेतृत्वविकास शहरी भागातच झालेला दिसेल.  ''कृष्णाकाठ'' या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी कुठलीही अतिशयोक्ती न करता, सहज सांगताना जे उल्लेख केलेले आहेत त्यावरून निराधार अवस्थेत केवळ आत्मबळावर विसंबून, स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवून सातारा, कोल्हापूर आणि पुणे या सगळ्या परिसरात जमेल तेथे आणि मिळेल त्या संधीचा फायदा घेत त्यांचे व्यक्तिमत्त्व कसे विकसित झाले याचा उल्लेख केला आहे.  त्यांच्या पूर्व जीवनातील या आठवणी वाचत असताना या माणसाने केवळ जिद्दीने स्वतःला आभाळाएवढे केले, हे कुठलाही पुरावा न देता कबूल करावे लागेल.  इतपत माहिती दिलेली आहे.  ही माहिती वाचताना मन हळवे व्हायला लागते आणि ते एक अनेकावधानी व्यक्तिमत्त्व होते असा जो उल्लेख यापूर्वी केला आहे त्याला हा एक संदर्भ प्राप्त होतो.  प्राप्त परिस्थितीशी जुळवून घेत, कुठलीही तडजोड न करता त्यांनी आपले वाचन, मनन, चिंतन, निरीक्षण कायम ठेवले, आणि त्याचे कारण ते त्यांचे उपजत गुण होते.  तसं तर त्यांचं सारं जीवन म्हणजे एकामागून एक अशा कठीण समस्यांची मालिका होती.  त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांना उदंड पश्चिम घ्यावे लागले.  अनेकविध विषयांचे ज्ञान त्यांनी स्वकष्टाने मिळवले.  वाचन ही त्यांची स्वाभाविक आवड होती, आणि प्रत्येक वेळी निर्माण होणा-या समस्यांतून मार्ग काढणे हा त्यांचा स्वभावधर्म होता.  समस्यांचे आव्हान स्वीकारणे आणि त्यावर मात करणे हा त्यांच्या जीवनविकासाचा एक अव्याहत क्रम राहिलेला आढळतो.  अप्रतिहतपणे आपली रसिकता जपत मिळवलेले अनेक विषयांतील ज्ञातेपण त्यांनी आयुष्यभर सांभाळले.  आरंभी उदंड दारिद्र्य, नंतर मध्यमवर्गीय जीवन आणि नंतर राजकीय प्रतिष्ठा मिळाल्यानंतरचे वैभवी जीवन जगत असतानासुद्धा ते कधीही आपले पूर्वायुष्य विसरले नाहीत.  जीवनाचे अनंत नमुने त्यांनी पाहिले आणि स्वतःही एक नमुनेदार जीवन ते जगले.  त्यामुळे सामान्य माणसाची सुखदुःखे, त्यांच्या भावना, वासना, अडचणी यांची त्यांना चटकन् कल्पना यावयाची.  शहरात असो वा खेड्यात त्यांच्या तरल, कल्पक मनात जीवनातील ही वास्तविकता सतत जागी असायची.  ते जेव्हा बोलू लागायचे तेव्हा त्यांच्या वाणीने समृद्ध केलेली अकृत्रिम शब्दकळा अगदी अशिक्षित माणसाच्याही हृदयाला जाऊन भिडत असे.

स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राचं नेतृत्व करणं ही गोष्ट तशी सोपी नव्हती.  भल्याभल्यांनाही महाराष्ट्राचे नेतृत्व यशस्वी रीत्या करणं जमलं नाही.  शंकरराव देव, काका गाडगीळ, केशवराव जेधे, शंकरराव मोरे या सगळ्यांच्या काँग्रेसमधील राजकारणाला बगल देत, बाळासाहेब खेरांचा विश्वास संपादन करत, भाषावार प्रांतरचनेपूर्वीच आपण राजकारणात अटळ आहोत असा दबदबा निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व फक्त यशवंतरावांचेच होते, आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे सामान्यांच्या जीवनाचं आणि त्यांच्या अवस्थांचं चित्रण नेमक्या पण प्रभावी शब्दात, अंतःकरणाचा ठाव घेणा-या मुलायम भाषेत ते लीलया करू शकत असत, हे होतं. मनाचा उदारपणा, मार्मिकता, दिलदारपणा आणि उदारमनस्कता त्यांच्यापाशी भरपूर होता, आणि या उदार-दिलदारपणाला जोड होती वस्तुनिष्ठ अभ्यासाची, प्रभावी पण मधाळ वक्तृत्वाची आणि त्यांच्या माणुसकीला सुंदर झालर होती जिव्हाळ्याची.  परिणामी अतिशय कमी कालावधीत जातीची, पंथाची बंधनं मोडून यशवंतरावांनी मराठी माणसाच्या मनात आपले घर निर्माण केले.  पहिलवानी उमेदपणा व कविमनाचा मोकळेपणा, आदर्शवाद आणि व्यवहार यांचा बेलामूम आणि मनोज्ञ संगम असलेला त्यांचा स्वभाव अभिजात रसिकता, मनाची सुसंस्कृतता आणि सततचा व्यासंग यामुळे अधिकच प्रभावी झाला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org