मराठी मातीचे वैभव- ६४

गुणवत्तेच्या नावावर उच्चशिक्षणसंस्थांमध्ये मर्यादित संख्येचा आग्रह धरणे अदूरदर्शीपणाचे ठरले असते.  समाजाचा जो एक मोठा भाग शतकानुशतके पददलित राहिला व ज्याला ज्ञानापासून वंचित ठेवण्यात आले त्यातील तरुण आज ब-याच मोठ्या संख्येने महाविद्यालयात व विद्यापीठात प्रवेशासाठी धडपडताना दिसतात.  त्यांची ही धडपड वस्तुतः सामाजिक प्रतिष्ठा व अस्मिता प्राप्त करण्याची धडपड आहे.  असे यशवंतरावजींचे स्पष्ट मत होते.  ते म्हणतात, ''ज्यांच्या अनेक पिढ्यांना शिक्षणाची दारे बंद होती अशा तरुण मुलामुलींना आपली परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने उच्च शिक्षण घ्यावेसे वाटले तर त्यात आक्षेपार्ह असे काहीच नाही.  एवढेच नव्हे तर दूरदृष्टीने पाहिल्यास ज्ञानाच्या या प्रसारामुळे शिक्षणाच्या दर्जात सर्व बाजूंनी सुधारणा होणे अगदी शक्य होणार आहे.  कारण जेवढे अधिक विद्यार्थी विद्यापीठात जातील, तेवढ्या लायक विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी अधिक वाव मिळणार आहे.  म्हणून शिक्षणाचा दर्जा सांभाळण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी त्याच का-यावर आपले लक्ष केंद्रित केल्यास कालांतराने शिक्षणाचा दर्जा सुधारणे फारसे अवघड जाईल असे मला वाटत नाही.''२२

यशवंतरावांची ही भूमिका महाराष्ट्र शासनाने स्वीकारली नसती तर महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला नसता.  आज ग्रामीण भागात ज्या अनेक शिक्षणसंस्था अस्तित्वात आल्या त्या याच ध्येयधोरणाच्या पाठपुराव्यातून.  त्या संदर्भात ते म्हणतात, ''आज उच्च शिक्षणाचा जो प्रसार होत आहे त्यामागे माझ्या मते, देशातील लोकशाहीच्या प्रसाराची प्रभावी शक्ती आहे.  उच्च शिक्षणाचा लाभ जोपर्यंत फक्त मूठभर लोकांनाच मिळत होता तोपर्यंत समाजजीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांत पुढे येणा-यांची संख्या अगदी अल्प असे.  अशा परिस्थितीत या मूठभर लोकांची बौद्धिक वाढ खुंटल्यास सर्व समाजाचीच अधोगती होण्याचा धोका निर्माण होतो.  म्हणून निरक्षरता व अज्ञान यात रुतून बसलेल्या लोकांच्या बुद्धीचा विकास घडवून आणून, आणि त्यांच्या अंगच्या सुप्त गुणांचा पुरेपूर विकास होण्यासाठी त्यांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देऊन गुणवत्तेवर आधारलेले नेतृत्व आपण निर्माण करू शकू.  तसे झाल्यास सामाजिक दर्जा, जात, कूळ यासारख्या गोष्टी हळूहळू मागे पडत जातील, आणि परिणामी आपले सामाजिक जीवन अधिक निकोप व निर्मळ होईल यात वाद नाही.''२३

शिक्षणप्रसारातून आज लक्षणीय परिवर्तन झाल्याचे आपण पाहात आहोत. सर्वांगीण विकासाच्या प्रक्रियेच्या गतीला अधिक वेगवान करण्याच्या कामी शिक्षणक्षेत्राने फार मोठे योगदान दिले आहे हे अमान्य करता येत नाही.  ग्रामीण भागात सर्व स्तरांवरच्या शिक्षणाचा विस्तार झाला नसता तर विकेंद्रित लोकशाहीचा पाया आपण घालू शकलो नसतो, ग्रामीण भागातून राजकीय आणि आर्थिक नेतृत्व उभे करू शकलो नसतो, आणि ज्या कृषिऔद्योगिक समाजाची संकल्पना मा. यशवंतरावजींनी मांडली ती आज आकार घेत असल्याचे दृश्य आपण पाहू शकलो नसतो.  जे शिक्षण आज उपलब्ध आहे त्यात खूप दोष आहेत, जे नेतृत्व आज उभे राहिले आहे तेही ब-याच प्रमाणात सदोष आहे आणि जे छोटेमोठे सहकारी कारखाने निर्माण झाले आहेत त्यांतही खूप उणिवा आहेत.  हे सर्व लक्षात घेऊनही असे म्हणावे लागेल की आपण बरेच अर्थपूर्ण असे परिवर्तन घडवून आणले आहे.  या सर्व घडामोडींच्या मागे यशवंतरावजींच्या विचारांची व नेतृत्वाची प्रेरणा आहे, हे कुणीही नाकारू शकत नाही.

पान नं. १३८ व १३९ सापडलेली नाहीत

असे म्हणता येईल.  तेव्हा साहित्यिकांबरोबर शास्त्रज्ञ, इतिहासकार, तत्त्ववेत्ते हे सर्वजण मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासास चालना देतील असा मला विश्वास वाटतो.''२६  मराठी भाषेत नव्या विचारांची, नव्या शब्दांची आणि नव्या शास्त्रीय ज्ञानाची भर पडावी असे त्यांना मनोमन वाटत होते.  महाराष्ट्र राज्यनिर्मितीच्या सोहळ्यापूर्वीच त्यांनी यासंबंधीचे आपले चिंतन व्यक्त केले होते.  ते म्हणाले होते, ''नव्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचे काम आम्हाला करावयाचे आहे.  जुने अमृतासारखे शब्द आहेत ते शब्द तर आम्हाला वापरायचे आहेतच, पण तुमच्या आमच्या जुन्या पिढीला माहीत नसणारे अमृतासारखे विचार अजून आपल्याला शोधून काढावयाचे आहेत.  नवीन शास्त्रीय विचारांचा, शास्त्रीय ज्ञानाचा एक नवा इमला आपल्याला महाराष्ट्राच्या जीवनामध्ये उभा करावयाचा आहे आणि या सगळ्या विचारांचे पोषण करणारे, त्यांना तोलणारे शब्द आणि भाषा तुम्हा आम्हाला निर्माण करावयाची आहे.''२७  लेखकांनी, विचारवंतांनी आणि विद्यापीठांनी हे अमूल्य काम हाती घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते.  ज्ञान-विज्ञानाचे मूलभूत संशोधन हाती घेण्याचा प्रयत्न ज्या भाषेत होतो तीच भाषा ख-या अर्थाने ज्ञानाची भाषा होऊ शकते.  मूलभूत संशोधन आणि मूलभूत चिंतन आणि मूलभूत विचारनिर्मिती मराठीत होणे आवश्यक आहे.
--------------------------------------------------------------------------
२२.  'लोकशाही शक्तीचा प्रभावी आविष्कार', सह्याद्रीचे वारे, पृ. १५६.
२३.  कित्ता, पृ. १५६-५७.
२४.  'नवपदवीधरांकडून अपेक्षा', सह्याद्रीचे वारे, पृ. १४६.
२५.  कित्ता, पृ. १४७-४८.
२६.  कित्ता, पृ. १४८.
२७.  'जनप्रेमाची शक्ती', सह्याद्रीचे वारे, पृ. २६.

-----------------------------------------------------

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org