मराठी मातीचे वैभव- ५८

वस्तुतः यशवंतरावजींचा स्वतःचा वैचारिक पिंड उदारमतवादी शिक्षणावर (Liberal Education) पोसला गेला होता.  त्यांचे व्यक्तिमत्त्व ह्युमॅनिटीजमधून विकसित झाले होते.  साहित्य, इतिहास आणि इतर सामाजिक शाखांच्या अभ्यासातून त्यांचे वैचारिक व भावनिक जीवन फुलले होते.  माणसाच्या जीवनात उदात्त मूल्यांचे बीजारोपण मानव्यविद्यांच्या (Humanities) शिक्षणाद्वारे होते.  उदारमतवादी शिक्षणात एक फार मोठी संस्कारक्षमता दडलेली असते.  विचारसामर्थ्याबरोबर संवेदनशीलता देण्याचे कार्यही हे शिक्षण करते यात शंका नाही.  ''माणूस मनाने, विचाराने मुक्त व समर्थ कसा होईल, ही शिक्षणाची महत्त्वाची कसोटी व साध्य आपण मानले पाहिजे,'' असे यशवंतरावजींचे स्वतःचे मत होते.  मूल्याधिष्ठित शिक्षण म्हणजे सांस्कृतिक प्रगल्भता !  'ब्रेड' आणि 'बटर'च्या पलीकडचा विचार या शिक्षणात असतो.  अशा या उदारमतवादी शिक्षणातून आपल्याला व्यक्तिस्वातंत्र्याच्या प्रेरणा आणि सामाजिक जाणिवा प्राप्त होतात.  अशा शिक्षणातून ज्ञानप्राप्तीबरोबर व्यक्तींच्या भावजीवनाची प्रगल्भताही वाढते अशी यशवंतरावांची धारणा होती.  ते म्हणतात की, शिक्षणातून ''केवळ ज्ञानाची उपासना वा बुद्धीची जोपासना करून चालणार नाही, तर भावनांची प्रगल्भता आणि अंतःकरणाचा मोठेपणा अंगी असणे अवश्य आहे.''७  माणसाला संवेदनाशील व सुसंस्कृत बनविणे हे शिक्षणाचे महत्तम उद्दिष्ट असले पाहिजे.  म्हणूनच ते म्हणतात, ''कारण माणसाचे मन शिक्षणाच्या संस्काराने अधिक संपन्न केल्याशिवाय समाज ख-या अर्थाने समाज बनत नाही.''  अर्थातच सुसंस्कृत माणसांच्या सहअस्तित्वातून 'समाज' अस्तित्वात येत असतो, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

माणसाला मुक्त करण्याची, त्याचा स्वाभिमान जागृत करण्याची किमया ज्ञानच करू शकते, याच्यावर यशवंतरावांची नितांत श्रद्धा होती.  हा विचार त्यांनी अनेकदा बोलून दाखविला होता.  इतिहासाने आपल्यासमोर उभी केलेली आव्हाने स्वीकारण्याचे सामर्थ्य आपण आपल्या अंगी बाणविले पाहिजे.  ''परंतु खरे सामर्थ्य निर्माण होते, खरी शक्ती वाढते आणि राष्ट्र पहिल्या प्रतीची बनतात ती शेवटी बुद्धीच्या क्षेत्रात, ज्ञानाच्या क्षेत्रात.  या क्षेत्रात निरलसपणे अखंड सेवा करणारी जी माणसे असतात त्यांच्या का-यामुळेच राष्ट्रे मोठी होतात हे मी आपणास सांगू इच्छितो.  ज्ञानाच्या अखंड सेवेमधून निर्माण होणारे जे सामर्थ्य आहे तेच खरे सामर्थ्य आहे.''९  यशवंतरावांचा हा बहुमोल विचार आपल्याला अंतर्मुख बनवितो.  माणसाला मुक्त करण्याची, त्याचा स्वाभिमान जागृत करण्याची आणि त्याचे जीवन प्रगतीच्या दिशेने मार्गस्थ करण्याची प्रतिज्ञा घेऊनच शिक्षणसंस्थांनी आणि विद्यापीठांनी काम केले पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते.  महाराष्ट्रातला सामान्य माणूस सर्व प्रकारच्या जाचक बंधनांतून मुक्त झाला पाहिजे असे त्यांना मनोमन वाटत होते.  स्वतःचे भाग्य स्वतःच्या हाताने घडविण्याचे सामर्थ्य असणारा माणूस शिक्षणामुळेच तयार होणार आहे अशी त्यांची श्रद्धा होती.  वास्तविक या प्रेरणेसाठी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खूप प्रयत्न केले होते याची जाणीव यशवंतरावांच्या मनात सतत वास करीत होती.  माणूस मनाने, विचाराने मुक्त व समर्थ कसा होईल, ही शिक्षणाची महत्त्वाची कसोटी व साध्य आपण मानले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.

स्वातंत्र्याच्या विचारांचा आरंभ भाकरीपासून होतो.  पण अंतिमतः तो विचार आपल्याला भाकरीच्या पलीकडे घेऊन जाणारा असला पाहिजे.  या दोन्हीही गोष्टींचे भान राखता आले तरच शिक्षणाची प्रमुख उद्दिष्टे आपल्याला ठरविता येतात.  यशवंतरावांनी या महत्त्वाच्या गोष्टीचे भान आपल्या मनात नेहमीच बाळगले होते.  समाजाच्या भौतिक गरजांची पूर्तता करीत करीतच मानवी जीवनाच्या उच्चतर मूल्यांकडे जाणे आवश्यक आहे, असे त्यांना वाटत होते.  तेव्हा विकासाच्या प्रश्नांना अधिक प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे होते यात शंका नाही आणि म्हणूनच यशवंतरावांनी महाराष्ट्र राज्यनिर्मितीनंतर आर्थिक धोरणाशी सुसंगत असे शैक्षणिक धोरण स्वीकारले.
---------------------------------------------------------------------
६.  'अमृताचे कुंभ', युगांतर (पुणे :  कॉन्टिनेन्टल प्रकाशन, १९७०), पृ. १८१.
७.  'समाजाभिमुख शिक्षण', भूमिका (पुणे :  प्रेस्टीज पब्लिकेशन्स, १९७९), पृ. १६८.
८.  'लोकभाषा हीच ज्ञानभाषा', युगांतर, पृ. १७०.
९.  'अमृताचे कुंभ', युगांतर, पृ. १८५.
-------------------------------------------------------------------

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org