मराठी मातीचे वैभव- ५७

वरील शब्दात यशवंतरावजींच्या शिक्षणाकडे बघण्याचा मूलगामी दृष्टिकोण व्यक्त झाला आहे.  या शब्दातून महाराष्ट्रशासनाचे शैक्षणिक धोरणच त्यांनी व्यक्त केले, असे म्हणावे लागेल.  कारण महाराष्ट्र शासनाने या विचारांचा समावेश आपल्या शैक्षणिक धोरणात केला आहे आणि त्याची अंमलबजावणी करण्याचेही प्रयत्न त्याने चालविले आहेत.  शिक्षणाची संधी खालच्या थरातील सर्वांना मिळाली पाहिजे आणि शिक्षणातून त्यांच्या अस्मितेचा आविष्कार झाला पाहिजे.  समाजाच्या आर्थिक विकासासाठी तांत्रिक शिक्षण आवश्यक आहे; कारण तांत्रिक शिक्षणाशिवाय आधुनिक जगात आर्थिक विकासाची कल्पनाही करणे शक्य नाही.  समाजाला आणि पर्यायाने राष्ट्राला स्वावलंबी बनविण्याचे एक प्रभावी माध्यम बनणे हेच शिक्षणाचे आज तरी प्रमुख उद्दिष्ट असू शकते.  हाच विचार यशवंतरावजींनी महाराष्ट्र राज्याच निर्मितीनंतर आपल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी प्रसंगीही व्यक्त केला.  त्या प्रसंगी त्यांनी आपल्या प्रशासनाचे धोरण काय असेल याचा ऊहापोह केला.  ते म्हणाले होते, ''शिक्षणाच्या बाबतीत माध्यमिक शिक्षणात व्यावसायिक बाजूवर विशेष भर देण्यात येईल.  हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारे अडचणी येऊ नयेत म्हणून शिष्यवृत्त्या वगैरे मार्गांनी सर्व प्रकारे साहाय्य करण्यात येईल.''  या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी इ.बी.सी. आणि मागासवर्गीयांना शिष्यवृत्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. अनुसूचित जातिजमातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देण्याचे धोरण हे तसे केंद्रशासनाचे धोरण होते.  पण इ.बी.सी. ची योजना हे महाराष्ट्र शासनाने स्वतंत्रपणे उचललेले पुरोगामी पाऊल होते.  बाराशे रुपये वार्षिक उत्पन्नाखालील सर्वांना या योजनेच्या तहत फीमाफीचा फायदा मिळाला.  या क्रांतिकारी निर्णयाद्वारे यशवंतरावजींनी शिक्षणाची सारी दारे सताड उघडली.  त्याचा फायदा महाराष्ट्रातील हजारो तरुण-तरुणींना झाला.  ज्यांच्या घरात आणि दिव्याभोवती पिढ्यानपिढ्या कुणीही पुस्तक उघडले नव्हते त्यांच्या घरात पहिल्यांदाच सरस्वती नांदायला गेली.  

महाराष्ट्राच्या भवितव्याविषयी यशवंतरावजी आपले चिंतनगर्भ विचार मांडितच राहिले.  त्या विचारात नियोजनाला आणि नियोजनात शिक्षणाला त्यांनी अनन्य साधारण महत्त्व दिले.  २५ ऑगस्ट १९६० या दिवशी त्यांनी विधानसभेत 'लोकशाहीतील नियोजन' या विषयावर महत्त्वपूर्ण विचार मांडले.  त्या प्रसंगी त्यांनी शिक्षणावर अधिक भर दिला.  महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाचे आणि सामाजिक सुखसोयीचे माध्यम म्हणून शिक्षणाकडे बघण्याचे आवाहन त्यांनी सभागृहाला केले.  ते म्हणाले होते की, ''सामाजिक सुखसोयींकडे दुर्लक्ष होता कामा नये ही गोष्ट मी मान्य करतो, आणि त्यातल्या त्यात शिक्षणाकडे तर मुळीच दुर्लक्ष होता कामा नये.  मी 'च'च्या भाषेत बोलणार नाही, परंतु शिक्षणाची बाब इतकी महत्त्वाची आहे की त्यासंबंधी 'च'च्या भाषेत मला बोलावे लागत आहे.  आपल्याला नवीन पिढी निर्माण करावयाची आहे.  म्हणून मी सांगू इच्छितो की, शिक्षणाच्या बाबीकडे मुळीच दुर्लक्ष होणार नाही.  मी ही गोष्ट मुद्दाम आग्रहपूर्वक सांगतो आहे.''  यशवंतरावांनी शिक्षणासंबंधी जी भाषा वापरली ती 'च'ची भाषा होती.  ही भाषा शिक्षणाच्या संदर्भात ते सतत वापरीत राहिले.  महाराष्ट्राच्या भवितव्याचा आकृतिबंध त्यांना पूर्ण रूपाने आम जनतेसमोर मांडायचा होता.  मला असे वाटते की त्यांचे हे मौलिक कार्य १९६० साली महाबळेश्वर येथे आयोजित केलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या शिबिरात पूर्ण झाले.  या शिबिराच्या समारोप प्रसंगी त्यांनी केलेल्या भाषणात शिक्षणाच्या प्रश्नांची दखल अतिशय चांगल्या प्रकारे घेण्यात आल्याचे आपल्याला दिसेल.  ते म्हणाले होते : ''मी आपणाला सांगू इच्छितो की, शिक्षणाकडे निव्वळ सामाजिक गरजेच्या दृष्टीने मी पाहात नाही.  माझ्या मते शिक्षण हे आर्थिक विकासाचे एक मूलभूत साधन आहे.  आमच्यामध्ये शक्ती निर्माण करण्याकरिता आमच्याजवळ मनुष्यबळाशिवाय दुसरे काही साधन नसल्यामुळे आम्ळाला या साधनाचा विकास करण्यासाठी त्याला शिक्षणाची जोड द्यावयाची आहे.  खेड्यात बिजली नेऊन पोहोचविल्याशिवाय ज्याप्रमाणे शेताचा विकास होणार नाही, त्याचप्रमाणे आमचा नापीक पडलेला मनुष्यबळाचा हा जो मोठा थोरला साधनसंपत्तीचा भाग आहे त्यात शिक्षणाची बिजली नेल्याशिवाय नवसामर्थ्य निर्माण होणार नाही.  शिक्षणाकडे पाहण्याचा माझा स्वतःचा हा असा दृष्टिकोण आहे.  महाराष्ट्राची औद्योगिक प्रगती करण्याचा कार्यक्रम जितका महत्त्वाचा आहे, शेतीचे उद्योगीकरण करण्याचा कार्यक्रम जितका महत्त्वाचा आहे, तितकाच शिक्षणाचा हा कार्यक्रम महाराष्ट्रात महत्त्वाचा आहे.''  उद्योग शेती आणि शिक्षण ही यशवंतरावांच्या शासकीय धोरणाची 'ट्रिनिटी' होती.  सर्वांगीण विकासाचे त्यांचे तत्त्वज्ञान ह्या त्रिसूत्रीवर आधारलेले होते.  पाश्चिमात्य देशात जी औद्योगिक क्रांती घडली ती या त्रिसूत्रीच्या आधारावरच, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.  ज्ञान ही एक शक्ती आहे.  विद्या ही एक प्रकारची ऊर्जाच असते.  शिक्षण हे एक प्रकारचे जलसिंचनच आहे.  पण हे समजण्यासाठी 'दृष्टी' ची आवश्यकता आहे.  यशवंतरावजींना ही 'दृष्टी' लाभली होती.
---------------------------------------------------------------------------------------------
३.  'सोनियाचा दिवस', सह्याद्रीचे वारे, पृ. ५६.
४.  'लोकशाहीतील नियोजन', सह्याद्रीचे वारे, पृ. ११४.
५.  'नियोजन, मनुष्यबळ व शेती'.  सह्याद्रीचे वारे, पृ. १२५-२६.

-----------------------------------------------------------------------------------------

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org