मराठी मातीचे वैभव- ५६ प्रकरण १४

१४ यशवंतराव चव्हाण यांचे शैक्षणिक विचार व कार्य

प्राचार्य डॉ. जे. एम. वाघमारे

स्व. यशवंतराव चव्हाण हे एक फार मोठे लोकनेते होते.  खरा लोकनेता हा एका अर्थाने लोकशिक्षक असतो.  लोकनेत्याला लोकांच्या विविध प्रश्नांची उकल तर करावीच लागते, पण त्याचबरोबर त्यांना समाजाचे सातत्याने प्रबोधनही करावे लागते, आणि म्हणून तो लोकशिक्षक असतो.  लोकशिक्षक हा समाजाला सतत विचार देत असतो; त्याला तो विचारप्रवण आणि विचारशील बनविण्याचा प्रयत्नही करीत असतो.  समाजाला शेवटी कार्यप्रवणता प्राप्त होत असते ती अशा व्यक्तीच्या विचार आणि का-यातून.

यशवंतरावजींनी हयातभर लोकशिक्षणाचे कार्य केले.  सत्तेवर येण्यापूर्वी, सत्तेवर आल्यानंतर आणि सत्तेपासून दूर गेल्यानंतर-अशा तिन्हीही अवस्थांत त्यांनी लोकशिक्षणाचे अविरतपणे कार्य केले.  अनेक प्रश्नांच्या बरोबर त्यांनी शैक्षणिक प्रश्नांवरही आपले विचार व्यक्त केले, आणि दीर्घकाळ शासनात असल्यामुळे त्यांना आपल्या काही शैक्षणिक विचारांचा अनुभव प्रत्यक्ष का-यात अनुवादित करता आला.  भावी महाराष्ट्राचा आकृतिबंध कसा असावा याविषयी त्यांनी सतत चिंतन आणि कार्य केले आणि म्हणून महाराष्ट्राच्या आजच्या जडण-घडणीमध्ये त्यांनी फार मोठे योगदान दिले.

राज्यपुनर्रचनेनंतर द्वैभाषिक राज्याची आणि महाराष्ट्र राज्यनिर्मितीनंतर एकसंघ अशा महाराष्ट्राची धुरा इतिहासाने यशवंतरावजींच्या हाती सोपविली.  महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी आम मराठी जनतेसमोर लोककल्याणकारी राज्याचे व कृषि-औद्योगिक समाजाचे अतिशय कल्पक मनाने चित्र रेखाटले.  महाराष्ट्र राज्य हे लोकशाही समाजवादाची प्रयोगशाळा बनावी म्हणून त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.  वस्तुतः कोठलीही प्रयोगशाळा ही मूलतः संशोधनाची व ज्ञाननिर्मितीची प्रयोगशाळा असते.  तिचा पाया घालण्याचे व त्या पायावर इमारत उभी करण्याचे कार्य शिक्षणाला करावे लागते.  हे ओळखण्याची दृष्टी यशवंतरावजींना लाभली होती.  इतिहासाचा एक जिज्ञासू अभ्यासक आणि सर्जनशील विचारांनी भारलेला एक द्रष्टा नेता व प्रशासक होण्याचे भाग्य लाभल्यामुळे यशवंतराव चव्हाणांनी शिक्षणाची ही अनिवार्यता लक्षात घेतली होती आणि ती आपल्या सहका-यांच्याही लक्षात आणून दिली होती.  आपल्याला अभिप्रेत असलेल्या सामाजिक पुनर्रचनेच्या कार्यासाठी शिक्षणाचा उपयोग कसा करता येईल, याचे चिंतन त्यांनी सातत्याने केले होते.

महाराष्ट्र राज्यनिर्मितीचा सोहळा साजरा करण्यापूर्वी त्यांनी 'महाराष्ट्राच्या भवितव्याची सफर' ही कशी असेल आणि कशी असावी, याचे विचारपरिप्लुत असे विवेचन व विश्लेषण आपल्या एका भाषणात केले होते.  भवितव्याच्या या प्रदीर्घ सफरीत महाराष्ट्राला ज्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांस तोंड देणे भाग आहे याची स्पष्ट अशी कल्पना त्यांनी मराठी जनतेला करून दिली होती.  त्या प्रश्नांच्या मागे शैक्षणिक प्रश्नही दडून बसले आहेत आणि म्हणून तेही आपल्याला चांगल्या प्रकारे सोडविता आले पाहिजेत, याची चर्चाही त्यांनी त्या भाषणात केली होती.  महाराष्ट्र राज्य हे सर्वांगांनी वर्धिष्णू करण्याच्या कामी इतर अनेक घटकांच्या बरोबर शिक्षणाला किती व कशा प्रकारचा वाटा उचलता येईल याचाही ऊहापोह त्यांनी आपल्या या भाषणात आवर्जून केला होता.  त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांचा मागोवा घेतला तर शिक्षणाकडे पाहण्याच्या त्यांच्या दृष्टिकोणाचा उलगडा आपल्याला होऊ शकेल.  ते म्हणाले होते : ''आमच्या शिक्षणाची पद्धती कशी असावी हाही आजचा महत्त्वाचा प्रश्न आहे.  आजपर्यंत आम्ही ज्या त-हेचे शिक्षण घेतले ते शिक्षण चांगले असेल, योग्यही असेल, परंतु त्यामुळे आमच्यात नोकरीपेशाची मनोवृत्ती निर्माण झाली आहे.  आम्हाला असे सांगण्यात येते की, आमची बुद्धीच- आमचा पिंडच- नोकरीपेशाचा आहे.  मला ही गोष्ट मंजूर नाही.''

मराठी माणसाची बुद्धीच- किंवा त्याचा पिंडच- नोकरीपेशाचा आहे असे मानणे अर्थातच चुकीचे आहे.  पण चुकीच्या शिक्षणपद्धतीमुळे चुकीच्या प्रवृत्ती निर्माण होत असतात, हेही तितकेच खरे आहे.  नोकरीपेशाची मनोवृत्ती ही ब्रिटिशांनी येथे जी शिक्षणपद्धती राबविली तिचे फलित आहे.  या मनोवृत्तीतून देशातील सुशिक्षितांमध्ये समाजपराङमुखता निर्माण झाली आहे हे नाकारता येत नाही.  असे असतानाही महाराष्ट्रात निरनिराळ्या क्षेत्रांत कर्तृत्व गाजविणा-या व्यक्ती निर्माण झाल्या.  उद्योगधंद्यांमध्येही कर्तृत्व गाजवणा-या पल्लेदार बुद्धिसामर्थ्याच्या किलोस्करांसारख्या व्यक्ती महाराष्ट्रात निर्माण झाल्या.  तेव्हा मराठी माणसाचा पिंडच नोकरीपेशाचा आहे असे मानणे चुकीचे ठरेल.  पण महाराष्ट्राचा आर्थिक विकास घडवायचा असेल तर तांत्रिक शिक्षणाचीही कास धरावी लागेल, असे यशवंतरावजींना वाटत होते.  ते पुढे म्हणतात : ''फक्त आम्हाला तांत्रिक शिक्षण, वेगवेगळ्या शास्त्रांचे शिक्षण घेतले पाहिजे.  अशा तर्हेच्या शिक्षणाला आम्ही प्राधान्य दिले पाहिजे. याशिवाय ज्याला आपण निव्वळ ह्युमॅनिटीजचे शिक्षण म्हणतो अशा त-हेच्या शिक्षणाचेही महत्त्व आहेच.  ते मूलभूत शिक्षण आम्हाला मंजूर आहे, आणि या शिक्षणाच्या बाबतीत शिक्षणाची सारी दारे सताड उघडी करून ते खालच्या थरापर्यंत पोहोचविण्याचे आमचे ध्येय असले पाहिजे.  मी तर असे म्हणेन की, या तर्हेच्या शिक्षणाचे प्रकाशझोत अगदी शेवटच्या थरापर्यंत जर आम्ही नेऊ शकलो, तर महाराष्ट्राची शक्ती इतकी जबरदस्त वाढेल की, त्याला कोणाच्याही मेहेरबानीवर अवलंबून राहण्याचे कारण राहणार नाही.  तो स्वतःचे रक्षण करील आणि राष्ट्राचेही रक्षण करील.''
---------------------------------------------------------------------------
१.  'महाराष्ट्राच्या भवितव्याची सफर', सह्यादीचे वारे (मुंबई : प्रसिद्धी विभाग महाराष्ट्र सरकार, १९६२) पृ.१८.
२.  कित्ता, पृ. १९
------------------------------------------------------------------------------

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org