मराठी मातीचे वैभव- ५४ प्रकरण १३

१३ यशवंतराव महाराष्ट्रातील अखेरचा रोमन

अनंत भालेराव

पुण्याचे सुप्रसिद्ध विद्वान प्राध्यापक डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे यांचे वर्णन त्यांचे एक विद्यार्थी श्री. विद्याधर पुंडलिक यांनी 'पुण्यातील ग्रीक शिक्षक' असे केले आहे.  याच धर्तीवर यशवंतराव चव्हाणांचे वर्णन करावयाचे झाल्यास मी त्यांना 'महाराष्ट्रातील अखेरचा रोमन' असेच संबोधीन.  रोमन या शब्दाद्वारे जुन्या रोमन राज्यकर्त्यांतील गुणसमुच्चयांचा, प्रशासकीय कौशल्याचा, चांगल्या अर्थाने व मूल्यांच्या संदर्भात कर्मठपणा आणि जबरदस्त आवाक्यांचा बोध होतो.  या कोरीव महाराष्ट्रातून ज्यांची ज्यांची गणना करता येते अगर करता येत होती त्यांतले यशवंतराव हे शेवटचेच.  यशवंतरावांनी दोन मोठ्या ऐतिहासिक कालखंडांचा सांधा कौशल्याने जोडला एवढेच नव्हे तर अंगीकृत का-याच्या म-यादेत आणला.  या सांधेजोड वर ठसाही उमटविला.  सत्तेवर अव्याहत ३५-४० वर्षे राहून अनेक मर्यादांनी आकुंचित बनलेली शासनव्यवस्था चापल्याने आणि सामर्थ्याने वापरून आपल्या पाऊलखुणा पाठीमागे सोडणारे आणि अखिल भारतीय पातळीपर्यंत पोचलेले यशवंतराव हे एकटेच राज्यकर्ते होत.  महाराष्ट्राला त्यांच्यानंतर कन्नमवार, वसंतराव नाईक, वसंतरावदादा, शंकरराव चव्हाण आदी कर्तबगार मुख्यमंत्री लाभले हे खरे, परंतु अखिल भारतीय पातळीवर काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बनण्याचे भाग्य एकट्या यशवंतरावांनाच लाभू शकले.  बाकीचे मुख्यमंत्री जास्तीत जास्त आपले राज्य अथवा आपले विभाग यांच्यापुरतेच व्यापक बनले.  या अर्थाने विचार केला तर नरीमन, बाळासाहेब खेर आणि मोरारजी देसाई यांच्यानंतर अखिल भारतीय स्तरावर जाण्याचे व तेथेही आपले कर्तृत्व गाजविण्याचे श्रेय अलीकडेपर्यंत एकट्या यशवंतरावांनाच हस्तगत करता आले.  या अर्थानेही यशवंतराव 'लास्ट ऑफ द रोमन्स' ठरावेत.

पुढारी आपण अनेक बघितले व नित्य बघतो आहोत.  काही पुढारी सत्तेवर असे तोवरच लोकमानसात असतात.  सत्ता गेली की ते निस्तेज बनतात.  अशी लोपलेली नावे पुष्कळ सांगता येतील. या लोकांचे कर्तृत्व चंद्राप्रमाणे परप्रकाशित आणि त्यांचा पुरुषार्थ परभृत होता.  आणखी काही पुढारी इतके उद्धट आणि अधिकारमदाने मस्त झालेले असतात की, लोक त्यांच्या अस्ताची जणू वाट बघत असतात.  थोडेच नेते असे असतात की, ज्यांच्या मोठेपणाला सत्तेची अगर इतर कुठल्याही तकलुवी आधाराची गरज नसते.  जो काही प्रकाश असेल जो त्यांच्या स्वतःचा असतो.  यशवंतराव या तिस-या प्रकारातील नेते होते.  आज आपल्यात ते नाहीत.  तसे पुष्कळ नेते आज हयात नाहीत, परंतु यशवंतराव हे अशा नेत्यांपैकी व अशा व्यक्तिमत्त्वांपैकी आहेत, की त्यांच्या मृत्यूने आपण खरोखरीच काहीतरी गमावले आहे, कुठेतरी एक पोकळी निर्माण झाली आहे, जिला आपण अपरिमित हानी अगर कधीही भरून न येणारे नुकसान म्हणून संबोधित असतो अशी खंत आणि तसली चुटपूट लावून यशवंतराव गेले.  सत्तेत राहूनही यशवंतरावांना ही अनिवार्यता प्राप्त करून घेता आली.

मृत्यूच्या काही महिने आधी ते औरंगाबादी आले होते.  कै. उद्धवराव पाटलांच्या एकसष्टी समारंभाचे ते मुख्य पाहुणे होते.  तेव्हा त्यांची भेट झाली.  यशवंतराव या वेळी बरेच खंगले होते व म्हातारपणाच्या खुणा चर्येवर बाळगणारे वाटले.  आपलेही मन मोठे गमतीचे आहे.  आपण काही व्यक्तींवर जेव्हा अनिवार प्रेम करतो तेव्हा त्या व्यक्ती आपल्या मनाच्या गाभा-यांना सदैव 'अजर' असतात.  पंडित नेहरू म्हातारे झालेले बघण्यास आपले मन तयार नसायचे.  त्यांच्या शरीरावर तसे काही चिन्ह दिसले तर आपल्यालाच वाईट वाटावयाचे.  तसेच यशवंतरावांचे होते.  यशवंतरावांना आपण स्वातंत्र्यानंतर व विशेषतः राज्य-पुनर्रचनेनंतर राजकारणाच्या विविध आखाड्यांत कुस्त्या मारताना व हरताना बघितले आहे.  त्यांची हार त्यांना नव्हे तर आपल्यासारख्या त्यांच्या चाहत्यांनाच नाराज करून गेली.  थकलेले यशवंतराव बघितले आणि वाईट वाटले.  या माणसावर आपण खूप टीका केली, त्यांच्या गुणदोषांची आपण खूप चिरफाड केली, पुष्कळदा त्यांच्यावर अत्यंत कठोर प्रहारही केले.  आपल्या अपेक्षांना यशवंतराव जेव्हा जेव्हा उतरले नाहीत तेव्हा तेव्हा त्यांच्यावर महाराष्ट्रात व बाहेर खूप टीका झाली.  असाच काहीसा विषय औरंगाबादच्या भेटीत निघाला.  यशवंतरावांचा चांगुलपणा व त्यांचा मोठेपणा त्या क्षणी जाणवला व मनाला एक जखम करून गेला.  आणीबाणीच्या नंतरची यशवंतरावांची वागणूक आणि काँग्रेस-अंतर्गतच त्यांचे पक्षांतर याविषयी चर्चा निघाली तेव्हा यशवंतरावांनी त्यांच्या नेहमीच्या हस-या व नर्मविनोदी पद्धतीने आपले समर्थन असे दिले की, लोकांचे एकदा प्रेम जडले की, तेही इतर प्रेमासारखेच आंधळे असते.  आपल्या नायकांच्या म-यादा लोकांना दिसत नाहीत.  यशवंतराव हसतच पाठीवर थाप मारीत, मधूनच एखादी कोटी करीत सांगू लागले की, सत्तेचे हे काही स्वभाव व गुणदोष असतात.  फार दिवस सत्तेवर राहिल्यामुळे तिचे दोषही आपल्याला बाधित असतात.  माझी त्यांच्याविषयीची मते त्यांना माहीत होती.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org