मराठी मातीचे वैभव- ५२ प्रकरण १२

१२ यशवंतराव चव्हाण आणि महाराष्ट्र काँग्रेस

अनंतराव पाटील

पंडित जवाहरलाल नेहरू इतर प्रांतांना सांगत की, काँग्रेस पक्ष कसा असावा तर महाराष्ट्र काँग्रेससारखा.  काँग्रेसचे राजकारण कसे असावे तर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या राजकारणासारखे आणि काँग्रेसचे प्रशासन कसे असावे तर यशवंतराव चव्हाण यांच्या प्रशासनासारखे.  यशवंतरावजींच्या कारकीर्दीत महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष एकजिनसी व एकमुखी होता.  काँग्रेसचे राजकारण हे सर्व समावेशक होते, आणि काँग्रेसचे प्रशासन लोकाभिमुख होते.  राज्य चालविताना, सरकार चालविताना यशवंतरावजींनी प्रशासन आणि संघटना या दोन्हींत सामंजस्य आणि समन्वय राखण्याबाबत कटाक्ष ठेवला होता.  मंत्रिमंडळात एकजिनसीपणा आणि एकोपा राखला होता.  प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निवडणुका, जिल्हा आणि ब्लॉक काँग्रेस कमिट्यांच्या निवडणुका पक्षाच्या घटनेप्रमाणे होत होत्या, आणि प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीची आणि जनरल बॉडीची बैठक देखील वेळच्या वेळी व्हायची.  कार्यकारणीवर जे कार्यकर्ते निवडून येऊ शकत नव्हते त्यांची सल्लामसलत उपलब्ध व्हावी म्हणून त्यांना निमंत्रितांच्या यादीत समाविष्ट करण्याचा यशवंतरावजींचा शिरस्ता असे.  बैठकीत सर्वांना बोलण्याचे स्वातंत्र्य असे आणि वक्तयांच्या विचारांची मतांची कदर केली जात असे.  पक्षांतर्गत लोकशाही आणि सामुदाचिक नेतृत्व यावर चव्हाणांचा कटाक्ष असे.  तरुणांना जवळ करावे, त्यांना कामाची संधी द्यावी, त्यांचेवर जबाबदारी टाकावी, त्यांच्या कामात जरूर तेव्हा सहकार्य करावे, अशी यशवंतरावजींची भूमिका असे.  तसेच वडीलधा-या नेत्यांचा मान राखावा, त्यांचा सल्ला घ्यावा, त्यांचा आदर करावा या बाबतीत चव्हाणसाहेब दक्ष असत.  शंकरराव देव, काकासाहेब गाडगीळ, केशवराव जेधे, मामासाहेब देवगिरीकर, देवकीनंदन नारायण या वडिलधा-या प्रान्ताध्यक्षांप्रमाणेच यशवंतरावजींनी तरुण अध्यक्ष राजाराम बापू पाटील, विनायकराव पाटील, वसंतदादा पाटील यांच्यासारख्याबरोबर सहकारी म्हणून काम केले.  त्यांचा मान राखला.  कोणत्या जिल्ह्यात कोणता जुना नवा नेता आहे.  जुना-नवा कार्यकर्ता आहे हे यशवंतरावाजींना चांगले माहीत असायचे.  एवढेच नव्हे तर कार्यकर्त्यांना नावागावावरून ओळखायचे आणि त्यांच्या घरच्या मंडळींची आत्मीयतेने विचारपूस करायचे.  काँग्रेस संघटना म्हणजे एक कौटुंबिक संस्था असेच चव्हाणसाहेब मानायचे आणि कार्यकर्त्यांप्रमाणे सर्वांना बरोबर घेऊन पुढे जायचे.  चव्हाणांची बोलण्याची, वागण्याची, काम करण्याची आणि काम करून घेण्याची पद्धत १९४६ पासून अगदी जवळून पाहण्याची संधी मला लाभली.  मुंबई प्रांतांचे पार्लमेंटरी सेक्रेटरीपदापासून तो भारताच्या उपपंतप्रधानपदाच्या उच्च स्थानावर काम करताना चव्हाणांनी कधी अहंकार-गर्व बाळगला नाही.  बडेजाव केला नाही.  संघटनेची आणि कार्यकर्त्यांची साथ सोडली नाही.  त्याचप्रमाणे ते सामान्य माणसापासून दूर गेले नाहीत की त्यांच्या प्रश्नाकडे त्यांनी पाठ फिरविली नाही.  यशवंतरावजी म्हणत की काँग्रेस ही आपली खरी शक्ती आहे आणि कार्यकर्ते हा फार मोठा आधार आहे.  काँग्रेस संघटनेत काम करायला मिळणे आणि जवाहरलाल नेहरूंच्या मांडीला मांडी लावून बसणे हे एक मोठे भाग्यच समजायला हवे.

१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर काँग्रेस पक्षाचे कार्य, कार्यक्रम, धोरण, भूमिका यांत बदल होणे अपरिहार्य होते.  काँग्रेसच्या शिरावर एक वेगळ्या प्रकारची जबाबदारी येऊन पडलेली होती.  शासन चालविणे आणि राज्याचा विकास व प्रगती करणे यासाठी काँग्रेस संघटना बलवान हवी होती, कार्यकर्त्यांचा मोठा संच हाती असण्याची गरज होती.  नवे नवे कार्यकर्ते जोडणे, त्यांना कामाला लावणे जरून होते.  निवडणुका, उमेदवार आदी गोष्टी अपरिहार्य बनल्या होत्या.  सर्वच कार्यकर्त्यांना असेंब्लीत उभे करणे किंवा तिकीट देणे शक्य नव्हते म्हणून यशवंतरावजींनी काहींना संघटनेची पदाधिकारपदे दिली.  सहकार संस्थांची प्रमुखपदे उपलब्ध करून दिली आणि सत्तेच्या विकेंद्रीकरणानंतर जिल्हा परिषदा, पंचायत समित्या यांत काम करण्याची संधी मिळवून दिली.  काँग्रेस खेड्यात रुजवावी, वाढावी, ग्रामीण नेतृत्व पुढे यावे म्हणून यशवंतरावजींनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.  एवढेच नव्हे तर इतर पक्षांत गेलेल्या सुशिक्षित तरुण कार्यकर्त्यांना काँग्रेसमध्ये आणून त्यांचा उपयोग या संघटनेला करून दिला.  १९४८-४९ मध्ये जेव्हा जेधे-मोरे-जाधव-खाडिलकरप्रभृती काँग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी शेतकरी कामगार पक्ष स्थापन केला आणि महाराष्ट्रात काँग्रेसला आव्हान दिले, तेव्हा हे आव्हान काँग्रेसच्या वतीने यशवंतराव चव्हाणांनी स्वीकारले आणि काँग्रेस पक्षाला एखाद्या जातिजमातीचे अथवा प्रादेशिक स्वरूप येऊ नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्टा केली.  त्या वेळी त्यांना मदत करण्यास काँग्रेसमधील, बहुजन समाजातील कितीतरी कार्यकर्ते पुढे आले.  काँग्रेसचे राजकारण चव्हाणांनी जातीच्या, प्रदेशाच्या, विभागाच्या वरती नेले आणि शे. का. प. च्या धोक्यापासून काँग्रेसचे रक्षण केले.  चव्हाणांनी बहुजन समाजातील तरुणांना तर काँग्रेसमध्ये आणि शासनामध्ये काम करण्याची संधी दिलीच, पण त्याचबरोबर पाढंरपेशा वर्गातील ब्राह्मणांना व हुशार कर्तृत्ववान मारवाडी, गुजराथी, माळी, धनगर, हरिजन, गिरिजन आदींना काँग्रेसमध्ये आणून काँग्रेसचा पाया व्यापक केला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org