मराठी मातीचे वैभव- ५१

यशवंतरावांच्या का-याचा, विचारांचा, धोरणाचा केंद्रबिंदू ग्रामीण भागातील माणूस आणि लोकशाही मूल्ये हाच होता.  महाराष्ट्राचे सहकारी साखर कारखानदारीचे क्षेत्रात काम करीत असताना मला स्वतःलाही याचा चांगलाच अनुभव आला.  यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मी महाराष्ट्र सहकारी साखर संघाचा काही वर्षे अध्यक्षही होतो.  त्या वेळेस सहकारी साखर कारखान्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मंत्री समिती होती.  त्या समितीचे यशवंतराव चव्हाण अध्यक्ष होते.  कै. धनंजयराव गाडगीळ आणि मी मंत्री नसूनही या समितीचे सभासद होतो.  सहकारी साखर कारखाने कर्ज पुरवठा करणा-या संस्थांकडून राज्य सरकारच्या साखर कारखानदारांचे पोट-नियम त्या वेळच्या परिस्थितीत सहकारी खात्याच्या सल्ल्याने केलेले सहकारी साखर कारखान्याच्या शेतकरी संचालकांनी बहुमताने केलेल्या ठरावाविरुद्ध 'व्हेटो' वापरण्याचा अधिकार सरकारी प्रतिनिधींना होता.  ही तरतूदही लोकशाही तत्त्वाचे विरुद्ध होती म्हणून हा नियम रद्द करण्यासाठी राज्य सरकारकडे दाद मागण्याचा निर्णय साखर संघाने घेतला.  मी व कै. धनंजयराव गाडगीळ साखर संघाची बाजू मांडण्यासाठी राज्याचे आणि मंत्री समितीचे प्रमुख म्हणून यशवंतरावांना भेटलो.  यशवंतरावांनी आमचे म्हणजे शांतपणाने ऐकून घेतले आणि या प्रश्नावर शासन लवकरच निर्णय घेईल असे आम्हास त्यांनी सांगितले.  यशवंतरावांनी घेतलेल्या निर्णयाने आम्ही आश्चर्यचकित झालो.  सहकारी प्रतिनिधीने सहकारी साखर कारखान्यांच्या सभांना हजरच राहू नये असे आज्ञापत्र यशवंतरावांनी काढले.  सहकारी अधिका-यास सहकारी चळवळीत हस्तक्षेप करण्यास संधीच मिळू नये आणि सहकारी चळवळीतील लोकशाही मूल्यांची जोपासना व्हावी म्हणून यशवंतरावांनी अशा प्रकारचा खळबळजनक निर्णय आमच्या विनंतिपत्रावर दिला.

लोकशाही मूल्यांची जोपासना करण्याच्या दृष्टीने असे प्रशासकीय आज्ञापत्र म्हणजे प्रशासनाच्या इतिहासातील मोठी क्रांतिकारक घटनाच होती.  परंतु यात यशवंतरावांच्या लोकशाही निष्ठेची प्रचिती आली.  वास्तविक सहकारी साखर कारखान्याच्या सभांना येणा-या अनेक अधिका-यांची साखर कारखान्यांना मोलाची मदत होत असे, म्हणून पुन्हा कै. गाडगीळ यांना व मला यशवंतरावांना भेटून वरील हुकमात आवश्यक ते फेरबदल करून घ्यावे लागले.

यशवंतरावांच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे व प्रेरणेमुळेच ही कारखानदारी उभी राहिली व प्रचंड वृक्ष म्हणून वाढली.  त्यामुळेच आज महाराष्ट्रात अनेक कर्तबगार कार्यकर्ते व पुढारी ग्रामीण महाराष्ट्राच्या आधुनिकीकरणाचा पाया घालणारी नवीन पिढी यशवंतरावांनी निर्माण केली.  महाराष्ट्राची जडणघडण करण्याचे ऐतिहासिक कार्य हीच पिढी करीत आहे.  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. वसंतरावदादा हे यशवंतरावांच्या प्रमुख सहका-यांपैकीच जसे राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीतून पुढे आले तसे त्यांच्या कर्तबगारीला खरा बाब मिळाला तो यशवंतरावांच्या कृषि-औद्योगिक क्रांतीच्या कार्यक्रमामुळेच.  यशवंतराव हे सर्व अर्थाने कृषि-औद्योगिक क्रांतीचे शिल्पकार होते.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org