मराठी मातीचे वैभव- ५

एम. एन. रॉय यांनी वर्तविलेल्या जागतिक साम्राज्यशाहीच्या र्हासाच्या भविष्याची सत्यता १९४५ सालाने पटवून दिली.  १९४५ साली दोस्त राष्ट्रांचा विजय होऊन आणि हिटलर, मुसोलिनी आणि जपानची साम्राज्यशाही याचा पराभव होऊन भारतीय स्वातंत्र्याचा उषःकाल दिसू लागला.  

१९४६ ची मार्च महिन्यातली निवडणूक यशवंतरावांनी जिंकली.  काँग्रेस पार्लमेंटरी पार्टीचे नेते म्हणून बाळासाहेब खेर निवडले गेले होते.  त्यांनी यशवंतरावांची पार्लमेंटरी सेकेंटरी म्हणून निवड केली.  त्यामुळे यशवंतरावांना कृष्णाकाठावरून अरबी समुद्राच्या किनार्यावरील एका महानगरात म्हणजे मुंबईत आपले निवासस्थान थाटावे लागले.  पुढे ते शेवटपर्यंत कृष्णाकाठावर कायम कधीच परतले नाहीत.  मुंबईत महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा त्यांच्या खांद्यावर थोड्या वर्षांच्या अवधीत आली.  पुढील जीवनाची भव्य यात्रा यशस्वी रीतीने डौलात पुढे जाऊ लागली.  यमुनेच्या तीरावरच त्या यात्रेची समाप्ती झाली.

पार्लमेंटरी सेक्रेटरीपदावर राहून यशवंतराव मुंबईत काम करू लागले.  शरीर मुंबईत पण मन कराडात अशा द्विधा मनःस्थितीत ते काम करीत होते.  परमप्रिय वडीलबंधू गणपतराव क्षयाने आजारी होते.  त्यांची सेवा करीत असताना गणपतरावांच्या पत्नींनाही त्या संसर्गजन्य रोगाने पछाडले.  या दोघांच्या सेवेमध्ये यशवंतरावांची तरुण पत्नी वेणूताई सारख्या झटत होत्या.  त्यांनाही क्षयाची बाधा झाली.  १९४७ च्या डिसेंबर महिन्यामध्ये गणपतराव दिवंगत झाले.  पुढील दोन वर्षांत गणपतरावांच्या पत्नीही इहलोक सोडून गेल्या.  गणपतरावांच्या मुलांची म्हणजे पुतण्यांची जबाबदारी यशवंतरावांवरच पडली.  सौ. वेणूताईंची प्रकृतीही ढासळलीच होती.  अशा आपत्तीच्या वेढ्यात यशवंतराव सापडले.  वेणूताई मिरजेच्या डॉ. जॉन्सन या मिशनर्यांच्या उपचाराने संकटातून बाहेर पडल्या.  कराडच्या घरात त्या परिवाराची जबाबदारी समर्थरीतीने पेलणारी यशवंतरावांची माता विठाबाई, त्या खूप वृद्ध झालया होत्या, परंतु थकल्या नव्हत्या.  

पार्लमेंटरी सेक्रेटरी म्हणून नेमणूक झाल्यानंतर त्यांची गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी गृहखात्यात उपमंत्री म्हणून नेमणूक केली.  या त्यांच्या उत्कर्षाच्या पहिल्या वर्षाच्या अखेरीस कराड-वाळवा भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये यादवी सुरू झाली.  या यादवीला 'कर्हाडचे कुर्हाडीचे राजकारण' असे नाव देत होते.  यशवंतरावांचे जिवलग मित्र के. डी. पाटील यांची शेतात कुर्हाडीने हत्या झाली.  हा सूडाचा प्रकार होता.  अगोदर आमदार चंदू पाटील यांचा खून झाला होता.  त्यांच्या खुनाचा आळ के. डी. पाटलांवर आला.  के. डी. पाटलांच्या गटाचे म्होरके म्हणून यशवंतरावांवरही हत्येचे संकट टपून बसले होते.  यशवंतराव मुंबईहून आजारी व अत्यवस्थ स्थितीतल्या वडील बंधूंना उभ्या उभ्या भेटून जावे म्हणून कर्हाडला आले.  कल्याणी बिल्डिंगमध्ये ते राहात.  बंधूंच्या जवळ बसून मनमोकळेपणे दोन तास बोलणे झाले.  नंतर खोलीच्या बाहेर पडून सिगारेट पेटविली.  त्या इमारतीच्या गच्चीवरून सिगारेट ओढत विचार करीत बाहेर उभे राहिले.  थोरली बहीण तेथेच होती.  तिच्याशी बोलत असता कसल्या तरी विचारतंद्रीत दूर दिसणार्या रेल्वे स्टेशनचा सिग्नल पाहिला, मनात एकदम धस्स झाले, कराड त्वरित सोडावे असे त्यांच्या मनाने घेतले.  त्वरित रेल्वे स्टेशनचा रस्ता धरला.  बहीण जाऊ देत नव्हती.  तिचे ऐकले नाही.  कर्हाड स्टेशनमध्ये उभ्या असलेल्या गाडीत शिरले व पुण्यास निघून गेले.

नंतर त्याच दिवशी रात्री विलक्षण भीषण प्रसंग घडला.  टपलेल्या शत्रुपक्षाला बातमी लागली होती की, यशवंतराव कल्याणी बिल्डिंगमध्ये वडील बंधूंच्या समाचाराकरिता आले आहेत.  मध्यरात्र उलटल्यावर दोनच्या सुमारास सहा जवान ठासलेल्या बंदुका, भाले, कुर्हाडी घेऊन कल्याणी बिल्डिंगवर चाल करून आले.  त्यांनी दारावर धक्के मारून दार फोडण्याचा प्रयत्न केला.  ही बातमी पोलिसांपर्यंत पोचली व गावात पसरली.  लोकांचा समज झाला की यशवंतरावांना शत्रूंनी पळवून नेले असावे.  यशवंतरावांचा शोध सुरू झाला.  रात्री सर्वत्र तारा झाल्या.  रेल्वेने यशवंतराव अगोदरच पुण्यास पोचले होते व इन्स्पेक्शन बंगल्यात झोपी गेले होते.  पुण्याच्या पोलिसांनी कराडच्या पोलिसांना यशवंतरावांच्या खुशालीची बातमी दिली.  भीषण प्रसंग टळला.  यशवंतरावांच्या अंतर्मनाला सांकेतिक भाषेत इषारा मिळाला व त्याप्रमाणे यशवंतरावांनी सावधगिरीने संकटाच्या क्षेत्रातून पलायन केले.  परंतु यशवंतरावांना या अंतर्मनाच्या इषार्याच्या बाबतीत अगम्य व गूढ घटनाच वाटली.  ते 'ॠणानुबंध' या लेखसंग्रहात 'नियतीचा हात' या लेखात म्हणतात, ''त्या सिग्नलच्या बोलावण्याचा अर्थ समजून घेण्याचा मी खूप प्रयत्न केला आहे.  परंतु या गोष्टीचा अन्योन्य संबंध जुळवून देणारा मला अजून कोणी भेटला नाही.  एवढे मात्र खरे की तो खुणेचा हात नियतीचा होता.''

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org