मराठी मातीचे वैभव- ३३

अद्ययावत वाचन

चव्हाणसाहेब खरे तर फडके, खांडेकर युगातले.  बोरकर-कुसुमाग्रज हे वास्तविक त्यांचे कवी.  परंतु माडगुळकर, जी. ए. नेमाडे, चित्रे, महानोर, दया पवार, एवढेच नाही तर १९६५ च्या नंतरची कथा, कविता, चरित्र, आत्मचरित्र इत्यादी लेखन त्यांनी जास्ती नाही पण किती तरी प्रमाणात वाचलेलं असायचं.  त्याबद्दल ते चर्चा करायचे.

औरंगाबादला साहित्य सभेच्या उद्धाटनाला ते दोन वर्षांपूर्वी आले होते.  तेव्हा १९६५ नंतरच्या पुस्तकांबद्दल, लेखकांबद्दल नुसते नावानी नाही तर त्यातील एकूण जाणिवांसंबंधी, प्रवाहासंबंधी उदाहरणांनी ते बोलले.  तेव्हा समोरचा साहित्यिक, रसिकवर्ग चाट पडला व त्यांनाच त्याची लाज वाटू लागली.  कारण बहुतेकांनी एवढी नवी पिढी व त्यांची पुस्तकं वाचलेली नव्हती.  त्या वेळी त्यांनी एका अगदी नव्या कवीच्या-सुधाकर गायधनी- कवितेच्या ओळी व कविता तोंडपाठ सांगितली.

चिंध्या पांघरून सोनं विकायला बसलो
गिर्हाईक कुठेही फिरकेना ।
अंगावर सोनं पांघरून चिंध्या विकाया बसलो
गर्दी हटता हटेना ॥

त्यांनी मग नवी कविता कुठेतरी येणार, कथा येणार, परंतु ती खेड्या-पाड्यातल्या सामान्यांच्या जीवनातून येते ही गोष्ट महत्त्वाची आहे.  केंद्र बदलले आहे.  इत्यादी गोष्टी परिपक्व वाङ्मयीन भूमिकेतून मांडल्या.

साहित्यिकांच्या व्यासपीठावरून ते जेव्हा नितळ रसिक साहित्यिक वाणीनं असं बोलत असत तेव्हा त्यांचे राजकीय कपडे, त्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहणे, इत्यादी बदललं पाहिजे.  असं अनोळखी साहित्यिक मग जवळ आल्यावर, ऐकल्यावर म्हणत.  साहित्यावर अपार प्रेम, साहित्यिकांसंबंधी प्रेमजिव्हाळा, साहित्य संस्था, संमेलनं इत्यादीविषयी त्यांना खूप अंतःकरणापासून आतून वाटायचं व ते त्यासंबंधी सर्व काही करायला तयार असत.

अठ्ठावन्नाव्या जळगावच्या साहित्य संमेलनाच्या वादामुळे ते फार खजील झाले.  असे म्हणाले होते, ही पद्धत बदलली पाहिजे.  साहित्यातल्या सर्वोच्च निवडीचा हा कुठला बहुमान ?  घटना बदलवा, ज्येष्ठ साहित्यिकांना फार तर अधिकार द्या, कुठे फार घटना व तपशिलात जाता ?  आपलं म्हणून सोयीचं, सन्मानाचं काही अध्यक्षपदासाठी करा, असं सांगत.  साहित्य प्रांतात राजकारणातल्यापेक्षाही कटुता अधिक वाढीस लागल्याची खंत तेव्हा त्यांनी बोलून दाखविली.  त्यांच्याशी ह्या विषयावर संवाद करण्यास त्यांना फार आनंद वाटत असे.

प्रत्येक भेटीत बोलणं झाल्यावर मग काय नवीन लिखाण इत्यादी, नवीन चांगली पुस्तके कुठली आली का ?  कुणाचं काय लिहिणं चाललं आहे, 'उपरा'नंतर लक्ष्मण मानेनं काही लिहिलं का ?  मी उत्सुक आहे तो आता काय लिहिल ?  नेमाडेनं 'हिंदू' अजून कशी पूर्ण केली नाही ?  अशी चौकशी करत.  करमणूक इत्यादी ठीक आहे.  पण शेतीच्या, शेतकर्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात मी थिएटर वर्क करावे असं एकदा सहज म्हणाले.

'घाशीराम कोतवाल' परदेशात पाठविण्यासंबंधी पंतप्रधानांना सांगण्याचा भाग त्या वेळचा महत्त्वाचा म्हणून असो की, ''जनांचा प्रवाहो चालला'', ''सिंहासन'' ह्या पुस्तकांची पारितोषिकं महाराष्ट्र शासनानं नाकारणं असे त्यांचं स्वच्छ मत असे.  आमदार म्हणून त्यांच्याशी ह्या प्रसंगी मी फोनवर बोललो होतो.  त्यांनी त्यांची स्पष्ट भूमिका मलाही व जाहीरही सांगितली.  दोन्ही ठिकाणी दोन्ही प्रश्न धसास लागले.  शासन नमले.  कलाकृती म्हणून व त्यातले तज्ज्ञ जाणकार साहित्यिक काय म्हणतात ह्याचाच विचार महत्त्वाचा,  राजकीय दडपण शहाणपणाचं नाही अशी त्या वेळी त्यांनी भूमिका सांगितली.

कितीही मोठ्या वृद्ध कलावंताचं खासगी शासनातलं काम असो की लता मंगेशकरांचा कलाप्रकल्प असो, त्या विषयाला गती द्यायला, पूर्ण करायला चव्हाणसाहेब हा एकमेव माणूस होता.  त्याची त्यांना पूर्णपणे समज होती, आस्था होती.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org