मराठी मातीचे वैभव- ३२

''अहो, हा तर पंचविशीतला पोरगा.  पळसखेडचा.  हा कुठला थोर कवी वगैरे ?''  आमचे लोक.  माझ्या खेड्यात धावाधाव.  जेवणानंतर पुन्हा शेती, घरचं व गप्पा झाल्या.  

चव्हाणसाहेबांना माझ्या कविता समोरच्या रसिकांना (?) पाठ म्हणून दाखविल्या.  नंतर मी म्हटल्या वगैरे.  ही रसिकता, साहित्यप्रेम व माणसावर, कलेवर जीव ओवाळून टाकणं फक्त त्यांच्याजवळच होतं.

एक परराष्ट्रमंत्री, सार्वभौम नेता आपल्याकडे राजकीय प्रणालीत कसा असतो, वागतो, हे नवीन नाही.  एवढं निर्भर, निर्मळ, काहीही संबंध नसताना प्रेम करायला मन आभाळाएवढं, फार परिपूर्ण लागतं.  नंतर दहा वर्षं मी आणखी अनेक लोक चव्हाणसाहेबांच्या घरातले झालो.  कवितेच्या निमित्तानं जवळ आलो.  गेली दहा वर्षं एका कुटुंबातले असल्यागत जगलो.  प्रेम केलं.  कविता, साहित्य, त्याशिवायचं व्यवहारातलं जग, माझे शेतीचे प्रश्न, कुटुंबातले प्रश्न, माणंस त्यांची झाली.  

त्यांच्यात-माझ्यात सर्वार्थांनी फार मोठं अंतर.  ते अंतर मोडून ते सातत्यानं जवळ राहिले.  हे वाटतं तितकं सोपं नाही.  एका उन्हाळ्यात बद्रीनारायणाच्या दर्शनानंतर माझे आईवडील.  चव्हाणसाहेबांकडे दिल्लीत मुलांची ओळख आहे भेटून यावं म्हणून गेले.  लाल पगडीचं मुंडासं, धोतर, आईचं नऊ वारी लुगडं-चोळी.  लिहिणंवाचणं नाव माहीत नाही.  पोलिस, पहारेकरी, सर्वत्र अडवाअडवी, त्रास.  पण चव्हाणसाहेबांचा किती आनंद सांगावा ?  माझ्या कवीचे आई-वडील माझ्या घरी.  त्यांनी त्यांना थांबवून घेतलं, दिल्ली दाखविली, इंदिरा गांधी, राष्ट्रपती व अनेकांच्या भेटीची वडिलांची व सोबत्यांची इच्छा होती.  सगळं काही केले.  हे फक्त तेच करू शकत होते.

कवितेसाठी हे सारं

नंतर माझे वडील वारल्यावर दिवसावर घरी पळसखेडला आले.  ते, मुख्यमंत्री इत्यादी आले ह्याचा मला मोठेपणा वाटत नाही.  दरम्यान त्यांना माझे काही प्रश्न माहीत झाले होते.  मी एकाकी, उदास पत्रं त्यांना मोकळेपणानं पाठवायचो.  भेटीत त्यावर ते आवर्जून विचारीत.  वयाचं, मोठेपणाचं अंतर, नातं नंतर नव्हतंच.  माझ्याच घरातले ते वडील माणूस म्हणून अंतःकरणानं होते.  वडील वारलेले.  मी सगळ्यात मोठा.  धाकटी भावंडं, बहिणी, दोन मातोश्री, घरकुलातील भांडणं, अडचणी, पेच, भयाणता व त्यात माझी म्हणून जबाबदारी, भार, त्यांना माहीत होता.  घरातला माणूस बोलतो म्हणून, त्यांनी तो सोडवला.  त्यांचा धाक, दबाव घरच्यांची डोकी शुद्ध करून गेला.  आज प्रश्न नाहीत असं नाही.  परंतु त्यांनी संपूर्ण गुंतागुंत काढूनच टाकली.  हे खरं तर त्यांच्या आमच्या वयाच्या, मोठेपणाच्या हिशेबात बसत नाही.  परंतु आमच्यात हे, असं नातं राहिलं.  माझी कविता राहावी यासाठी हेही त्यांना जरुरीचं वाटत होतं.  

खरं तर शरदराव किंवा त्यांच्याइतक्याच जवळच्या आपल्या समवयस्क सहकार्यांना सांगितलं नाही ते मी त्यांना सांगितलं.  आज कुटुंबप्रमुख गेले !  

सव्वीस जानेवारी ८३ ला, गेल्या वर्षी त्यांच्या घरी दिल्लीला - 'खेड्यातील मराठी कविता' असा काव्यवाचनाचा कार्यक्रम त्यांनी घेतला होता.  वेणूताई आणि चव्हाणसाहेबांनी खूप परिश्रम घेतले.  यशवंतराव चंद्रचूड, वसंतरावदादा पाटील, बहुसंख्य केन्द्रीय मंत्री, आमदार, खासदार, दिल्लीतले पत्रकार व इतर मराठी रसिक.  त्या दिवशी ते कवितेवर, मराठी कवितेवर खूप बोलले, चर्चा-गप्पा झाल्या.  ना. घ. देशपांडे, बी. रघुनाथ व भालचंद्र लोलेकर ह्यांची मी वाचलेली कविता त्यांना खूप आवडली होती.  त्वरित त्यांनी त्यांच्या संग्रहाची नावे लिहून घेतली.  ''एवढे मराठीतले चांगले कवी मी नीट वाचले नाहीत म्हणून मला वाईट वाटते'' असे म्हणाले.  नंतर दोन दिवस अशोक जैन, चव्हाणसाहेब, मी, दिल्लीतली भेटणारी मंडळी खूप चर्चा.

नॅशनल बुक ट्रस्टचं दिल्लीनंतरचं केंद्र मुंबईत आणले.  तो आग्रह त्यांनीच धरला.  साहित्य अकादमीची बक्षिसं, त्याची पद्धती, स्वरूप बदललं पाहिजे असं ते आवर्जून म्हणाले.  अनेकांशी त्यांची-आमची चर्चा झाली.  कितीतरी नव्या कल्पना कला, साहित्य, संस्कृती, नृत्य, चित्र, शिल्प, यासंबंधात त्यांच्या असायच्या.  महाराष्ट्राच्या ह्या संदर्भातल्या जडणघडणीतल्या व्यवस्था, यंत्रणा, संस्थांसंबंधी- साहित्य संस्कृती मंडळ, लोकसाहित्य समिती, कला अकादमी इत्यादी- आता कालाच्या संदर्भात खूप बदल केला तर पाहिजेच; परंतु निश्चित स्वरूपाचं संशोधन, संपादन काळजीपूर्वक केलं पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.  

केव्हा तरी आमदार म्हणून सभागृहात मी काही बोललो तर त्यांच्या मूळ कल्पना, विचार नंतर भेटीत ते बोलून दाखवीत.  पदरात फार कमी पडतं, ह्या सगळ्या संस्था स्थापण्यातला हेतू, त्यापासूनच आपण दूर जातो, किंवा पसरट काही तरी करीत असतो ही खंत त्यांना होती.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org