मराठी मातीचे वैभव- २९

साहेब परदेशात गेले म्हणजे तिथल्या भौतिक वैभवाबरोबरच साहित्यकारांची विचारपूस करायचे.  त्यांचं वागणं बोलणं समजावून घ्यायचे.  त्या संदर्भात कृष्णाकाठचं आपलं राहणं जोखून पाहायचे.  आपल्या आईच्या मुखी रुळलेल्या ओव्या आठवीत आपलीपण वेगळी तालेवारी आहे हे लक्षात घ्यायचे.  वेळप्रसंगी इतरांपुढं आपल्या अस्खलित वाणीनं इतरांवर छाप पाडायचे.  ते स्वतः वकील असल्यामुळे आपल्या देशाची बाजू प्रभावीपणानं मांडणं त्यांना सहज जमून जायचं.  म्हणून जे बोलताय ते लिहा, जे लक्षात आहे ते कागदावर येऊ द्या, जे मनात आहे ते शब्दांकित होऊ द्या, असा आम्ही त्यांना वारंवार आग्रह करायचे.  अशा वेळी त्यांचा चेहरा प्रसन्न दिसायचा.  ''मनात खूप आहे पण वेळ कुठाय ?''  या उत्तरानं मनातली खंत बोलून दाखवायचे.  साहेबांचं बरंचसं आयुष्य पुढारीपणात, मंत्रिपद सांभाळण्यात गेल्यामुळे त्यांची स्वतःच्या हातानं लिहायची सवय मोडून गेली होती.  त्यांना हाताशी लेखनिक लागत होता, पण मराठी बोलणं चटकिनी लघुलिपीत टिपणाराची दिल्लीत वानवा होती !  त्या करणानं साहेबांची दिवाळी अंकातील एखाद दुसर्या लेखापलीकडे ललित लेखनाची हौस बाजूला राहिली होती.  हिरमुसल्या मनानं वावरत होती.  त्याचा पडताळा साहित्यविषयक सभासंमेलनांतून होणार्या साहेबांच्या भाषणामधून यायचा.  अशा वेळचं साहेबांचं भाषण एवढं चटकदार व्हायचं की, साहेबांमधला लेखक गुदमरून गेला आहे याची स्पष्ट जाणीव ऐकणाराला व्हावी !  लक्षात कुणी आणून दिलंच हे तर साहेबांना देखील !....

म्हणून तर आम्हा अनेक सुहृदांच्या विलक्षण आग्रहाखातर साहेबांनी ''कृष्णाकाठ''चं लेखन हातावेगळं केलं आणि आपल्या भाषणांचा संग्रह प्रकाशित होताना त्या मजकुरावरून हात फिरवला.  तसंच दिल्लीला कामात व्यग्र असतानाही त्यांनी पुस्तक-प्रकाशनाची आणि साहित्यविषयक समारंभाच्या उद्धाटनाची निमंत्रणं आवर्जून स्वीकारली.  पुण्याच्या साहित्य परिषदेच्या हीरकमहोत्सवासाठी ते मुद्दाम वेळ काढून पुण्याला आले आणि कराडच्या साहित्यसंमेलनाचं स्वागताध्यक्षपद त्यांनी स्वीकारलं.

त्या वेळी साहेब बारीकसारीक सगळ्या शाखा-उपशाखांना कराडात हजर राहिले.  ''होस्ट'' म्हणून त्यांनी सर्वांचं आदरातिथ्य येवढं केलं की, माणसं हारखून गेली.  विरोधातल्या मंडळींनी त्या संमेलनात आरडाओरडा केला, निदर्शने मांडली तरी साहेबांनी सगळ्यांना प्रेमानं वागवलं.  कराडला उभारलेल्या भव्य शामियान्यातील त्यांचं आगळं सौजन्यशील रुपडं बघण्याजोगं होतं.

साहेबांनी त्या वेळी कराडला नुसतं साहित्य संमेलनच भरवलं नाही तर त्या निमित्तानं जमा करण्यात आलेला बराचसा निधी न्यास निर्माण करून बँकेत ठेवला.  त्या निधीतून येणार्या व्याजामधून उपलब्ध होणारी ठरावीक रक्कम दरवर्षी वेगळ्या साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट कलाकृतीला बक्षिसादाखल दिली जाईल अशी व्यवस्था केली.

वाङ्मयाचा मोठा भोक्ता माणूस आमचे साहेब.  मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी साहित्यविषयक विकासाच्या संदर्भातील ''साहित्य संस्कृती मंडळ'', ''लोकसाहित्य समिती'', ''भाषा सल्लागार समिती'', असली राज्य थरावरील मंडळं स्थापन करून त्या त्या क्षेत्रातील मान्यवरांना कामाला लावलं.  अधूनमधून ही निरनिराळी मंडळी भेटली म्हणजे आणि स्वतः महाराष्ट्रात ते आले म्हणजे त्यांनी या सर्व कामकाजात तसे येऊन त्यातील विकासाच्या संदर्भातील चर्चा केल्या.  मार्गदर्शन केलं.  वेळ काढून विचारपूस मांडली.  त्यांना त्यांच्या या कार्यात सर्वांनी आपला हातभार लावला.  एवढंच नव्हे तर हे काम वेगानं आणि उमेदीनं यापुढंही चालू राहील हे पाहिलं.

साहेब अवचितच देवाघरी गेले.  पण त्यांच्या या भावलंकेत सामावून गेले.  त्यांनी त्यांची ही आवडनिवड महाराष्ट्राची अस्मिता म्हणून जिद्दीने जोपासली जाईल याची निष्ठा पदरी बाळगलेली आहे.  केवळ राजकीय वर्तुळातून, सरकारी कार्यातून नव्हे तर खाजगीतून देखील !  म्हणून आमचं म्हणणं साहेब गेले नाहीत त्यांचं काम जणू त्यांच्या रूपानं उभं आहे.  त्यात खंड पडायचा नाही.  उलट ते वाढीदिडीनं चालूच राहील.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org