मराठी मातीचे वैभव- २८ प्रकरण ७

७ भावलंकेचा माणूस :  यशवंतराव चव्हाण

डॉ. सरोजिनी बाबर

समाजकारणात, राजकारणात, बरीच मंडळी वावरतात.  आमदारकीच्या, खासदारकीच्या रिंगणात पुष्कळजणं उतरतात.  नेतेपदात, मंत्रिपदात, निवडक मंडळी रमतात.  पण जाणूनबुजून, विचार करून या कार्यक्षेत्रात आयुष्यातली बरीच वर्ष घालविणारी अशी फारच थोडी असतात.  त्यातून एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करीत निवडलेलं कार्यक्षेत्र कारणी लावणारी तर आणखीनच फार कमी.  आमचे यशवंतराव चव्हाण त्यांपैकीच एक.  आम्ही त्यांना 'साहेब' म्हणत असू.  आमच्यापैकीच एक मानीत असू.  आमचं ते आपलेपण साहित्य क्षेत्रातलं.  लेखक कवीच्या सहवासातलं.  निवडक पुस्तकांच्या वाचनातून रंगणार्या रसिकांच्या मेळाव्यातलं.  चोखंदळ वाचकांमधलं, जिवाभावाच्या नात्यातलं.  

साहेबांनी बैठक घालून तसं कधी फारसं लिहिलं नाही.  पण त्यांच्या मनाचा पिंड साहित्यिकाचा, त्यांना लेखनकलेची खूप हौस असायची पण वेळेअभावी त्यांना ते जमायचं नाही.  परंतु कुणी काय लिहिलंय आणि कुणाची कशात वाहवा होतेय, त्यातला बारकावा त्यांच्या ठायी दांडगा.  त्यांचं वाचन फार विस्तृत.  इंग्रजी, मराठीतली आणि हिंदीतली ठळक ठळक पण निवडक पुस्तकं त्यांच्या संग्रही असायची.  भेट आलेली जेवढी त्यापेक्षा विकत घेतलेलीच फार. त्यामुळं एखादा परिचित लेखक, कवी समोर दिसला की, साहेब लगेच त्याच्या नवीन कलाकृतीबद्दल आवर्जून बोलायचे.  ऐकणाराला वाटायचं की, ''ह्यांना हे वाचायला वेळ तरी केव्हा मिळाला ?  आणिक एवढं ह्यांनी लक्षात तरी कसं घेतलं बारीकसारीक ?''

साहेब रोज रात्री वाचत बसायचे.  कामाच्या निरनिराळ्या फाईली, निवडक ग्रंथ, विमानात अगर रेल्वेत सवड मिळाली की बरोबर आणलेली आवडीची पुस्तकं वाचून ते त्यावर महत्त्वाच्या कल्पनाविस्तारासंबंधीच्या किंवा उल्लेखनीय विचारातील आविष्काराबद्दलच्या मजकुरावर खुणा करायचे.  हा तपशील जरूर पडेल तेव्हा त्यांच्या लक्षात यायचा.  आवश्यक तेव्हा भाषणांमधून प्रगट व्हायचा.  विधानभवनातलं, संसदेतलं अगर जनसंमेलनातलं त्यांचं भाषण त्या कारणानं श्रवणीय ठरायचं.  

आगाशिवाच्या डोंगरावर मोठमोठ्यानं बोलण्याचा सराव करीत त्या ध्वनिप्रतिध्वनींच्या आधारावर साहेब बोलायला शिकलेले.  त्यामुळे आवाजातील चढउतार आणि विचारातील पल्ला त्यांच्या ठायी त्यांनी पक्का जोडलेला होता.  अभ्यासून आत्मसात केला होता.  त्या कारणानं श्रोत्यांशी त्यांना जवळीक साधणं जमत होतं आणि जनतेला नेमकं काय हवं ते जिद्दीनं मापलं होतं.

मराठवाड्यात मुख्यमंत्री म्हणून कामाच्या निमित्तानं साहेब प्रवासात असताना एका शेतकर्यानं त्यांना प्रेमानं नोटांचा हार घातला !  वडिलकीच्या अधिकारानं म्हणून !  तसे साहेब हसले.  त्यांना जणू आपलं लहानपण गवसल्यागत झालं.  ह्या साधुसंतांच्या भूमीचा आपल्याला आशीर्वाद आहे असं त्यांनी मानलं !  एकनाथांनी या भूमीतून वावरताना गोरगरिबांचा त्यांनी ठेवलेला मान त्यांनी लक्षात घेतला.  जिजाऊ मासाहेबांचं माहेर याच भागातलं हे लक्षात घेऊन वाचलेला इतिहास नजरेपुढे आणला.  

आपला मुलूख, आपलं कार्यक्षेत्र साहेबांनी असं जोपलं होतं.  आपण जिथं आयचं आहे तिथल्या परिस्थितीचा, तिथल्या लोकांच्या आचारविचारांचा आणि तिथं मांडून गेलेल्या इतिहासाचा अभ्यास करून मगच तिथं पाऊल टाकलं होतं.  म्हणून त्या त्या ठिकाणचे भावबंध त्यांना गवसले होते.  भावनिक ऐक्य साधणं शक्य झालं होतं.  तिथल्या लेखक-कवींशी, कलाकारांशी, कार्यकर्त्यांशी जवळीक साधता आली होती.  साहेब स्वतः क्रांतिपर्वात वावरलेले असल्यामुळे आणि स्वातंत्र्यसंग्रामात आघाडीवर राहिल्याकारणानं तुरुंगात किंवा भूमिगत जीवनात लाभलेली मैत्री त्यांच्या ठायीच्या अगत्यामुळं जपली गेली होती.  त्यांचं विश्व व्यापक झालं होतं.

जगातील क्रांतिकारकांच्या गाथा साहेबांनी वाचल्या होत्या.  चिंतनमननात बाळगल्या होत्या.  लढाईतले डावपेच आत्मसात केले होते.  त्यासाठी कितीतरी पुस्तकं वाचली होती.  जागोजागची स्मारकं न्याहाळली होती.  त्यामुळे संरक्षणमंत्री म्हणून आत्मविश्वासानं त्यांनी बजावलेली कामगिरी अपूर्वाईची ठरली.  जागोजागच्या जवानांशी वेळोवेळी बोलताना त्यांच्या साहित्यिक वाणीनं देश मजबूत करायला स्फूर्ती दिलेली.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org