मराठी मातीचे वैभव- २१

श्रद्धा ही एक अशी शक्ती आहे की, अढळ आणि निस्सीम श्रद्धा मानवाला सर्वस्वाचा स्वाहाकार आनंदाने करण्यास सिद्ध बनवते.  व्यक्तिगत आणि सार्वजनिक, राजकीय जीवनात संघर्षाचे, जीवननिष्ठा दोलायमान करणारे प्रसंग यशवंतरावांच्या जीवनात घडोघडी निर्माण होत राहिले.  घटना शिजल्या, परंतु त्या प्रत्येक वेळी जीवननिष्ठा अधिक मजबूत, बळकट करण्याची त्यांनी ती एक संधी मानली.  संघर्षावर, संकटांवर स्वार होत राहिले.  लोकशाहीवरील, लोकांवरील श्रद्धेच्या बळावर, राष्ट्रनिष्ठा, समूहनिष्ठा, मानवतेवरील निष्ठा, समाजपरिवर्तनावरील निष्ठा, जीवननिष्ठेपासून अलग होऊन दिली नाही.  एरवी ते जीवन निर्माल्य बनले असते.

यशवंतरावांनी नेतृत्वाचे थोर आदर्श भारतीय समाजासमोर व्यक्तिगत वागणुकीतून ठेवले हा तर इतिहासच आहे.  परंतु त्याचबरोबर नेता हा नीतिमान असलाच पाहिजे, हा आदर्शही त्यांनी प्रत्यक्ष आचरणाने देशासमोर, जगासमोर ठेवला.  हे सदासर्वकाळ स्वीकारार्ह असेच आहे.  आयुष्यभर सद्गुणाचे कण वेचण्याचा, साठवण्याचा आणि बहुतांना वाटण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला.

राजकारणात, सामाजिक जीवनात पन्नास-पंचावन्न वर्षांचा प्रदीर्ष काळ व्यतीत केलेल्या यशवंतरावांच्या जीवनाची समीक्षा करणं हे तसं पाहिलं तर समीक्षकांना आणि इतिहासलेखकांना एक आगळं आव्हान आहे असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं ठरू नये.  राजकारणी यशवंतराव आणि व्यक्ती यशवंतराव अशी त्यांच्या जीवनाची दोन रूपे.  परंतु ती पूर्णतः एकवटलेली आढळतात.  व्यक्ति-जीवनाचा आसरा त्यांच्या राजकीय जीवनावर किती आणि कसा पडला आणि राजकीय जीवन व्यक्तिगत जीवनाला छेद देण्याइतपत प्रभावी बनले काय हा निश्चितच संशोधन करून निष्कर्षाप्रत येण्याचा विषय आहे.

लोक हे ज्यांनी त्यांनी आराध्य दैवत मानले आणि आराध्य दैवत म्हणून लोकांनी ज्यांचा स्वीकार केला त्यांच्या जीवनाचा, जीवनकार्याचा शोध घेताना, इतिहास लिहिताना एकारलेल्या भूमिकेतून करण्याचा प्रयत्न क्वचितच आढळतो.  ज्यांनी कुणी असा प्रयत्न केला ते फसले.   एकांगीपणाने लिहिलेला इतिहास, इतिहास या संज्ञेस पात्र ठरत नाही.  समतोल न्याय देण्यातील अभाव हे त्याचे प्रमुख कारण.

ज्येष्ठ ठरलेल्या व्यक्तींचे सामाजिक, राजकीय, लोकजागृतीचे, लोकहिताचे, लोकांच्या जीवनाला स्पर्श करणारे, प्रेरणा देणारे कार्य जेवढे केवढे महत्त्वाचे आणि इतिहासाचा विषय ठरणारे असते तेवढेच त्यांचे व्यक्तिजीवन, चारित्र्य, नीतिनिष्ठा, सदाचार, विद्वत्ता, बुद्धिनिष्ठा, विचारप्रगल्भता, दूरदर्शित्व महत्त्वाचे असते.  इतिहासकारांनी या पैलूंचा शोध घेणे, अभ्यास करणे आवश्यक ठरते.  कारण एकाचा परिणाम दुसर्यावर आणि दुसर्यावरून पहिल्याची परिक्षा अशी ही सांगड असते.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, म. जोतिबा फुले आदी आदर्श पुरुषोत्तमांचे व्यक्तिरेखाटन करताना, कर्तृत्व रेखाटताना, इतिहासकारांना समतोल राखावाच लागतो.  तसा तो राखल्यामुळे देशात उदयास येणार्या नव्या पिढीला या व्यक्तींच्या आदर्शांपासून अव्याहत प्रेरणा मिळत राहिली.  मिळत राहणार आहे.  छत्रपतींचा ज्वाज्वल्य राष्ट्राभिमान, धर्माभिमान, शौर्य, मुत्सद्दीपणा, लोकसंग्रह, न्यायप्रियता त्याचबरोबर, नीतिमत्ता, व्यक्तिगत चारित्र्य, निरहंकारी वृत्ती, लोकमान्य टिळक आणि म. गांधी यांची स्वातंत्र्याची तळमळ, त्यासाठी लोकजागृती, सर्वस्व समर्पणाची तयारी, स्वत्व आणि समानीतत्व यासाठी आग्रह, निःस्वार्थ, निरपेक्ष आचार आणि त्याचबरोबर लोकामान्यांनी स्वतः आचरलेला आणि गीतारहस्याच्या माध्यमातून लोकांसमोर ठेवलेला कर्मयोग, म. गांधींची सत्याचरण व अहिंसापालनाची निष्ठा आणि या सर्वांचा जनमानसावर घडलेला आसर याची सांगत इतिहासकारांना घालावीच लागते.  म. फुले यांच्या बाबतीतही सामान्यांची सेवा, दलितांची सेवा, गरीब शेतकर्यांची सेवा, शिक्षण उपलब्ध करून देण्याचा हव्यास याचबरोबर शुद्ध विचार, शुद्ध चारित्र्य, निरपेक्ष कर्तृत्व याचीही सांगत घातलीच पाहिजे.  ज्यांचे संपूर्ण जीवन हेच सद्गुणांची, सद्विचारांची, सत्कृत्यांची सांगड बनलेले असते त्यांचा अलग अलग असा विचार करणे किंवा तसा इतिहास रेखाटणे अन्यायकारक नव्हे का ?

यशवंतरावांच्या जीवनाची समीक्षा करताना समीक्षकांना आणि इतिहासकारांना आव्हान आहे ते याच संदर्भात.  कारण त्यांच्याही जीवनात व्यक्तिगत गुणसंपदा, चारित्र्यसंपन्नता, बुद्धिनिष्ठा, लोकसंग्रह, देशनिष्ठा, नीतिमत्ता आणि राजकारणी व्यक्तिमत्त्व यांची बेमालूम सरमिसळ झालेली आढळते.  एकाच आम्रवृक्षाने दिलेल्या आम्रफळांची ही निपज वाटते.  एक फळ गोड आणि एक आंबट अशी निपज एकच आम्रवृक्ष कधी करीत नाही.  ज्यानं रुची द्यावयाची त्याला फळाची पक्वता पारखण्याची जबाबदारी मात्र स्वीकारावी लागतेच.  पारखच कच्ची असेल तर फळाचं माधुर्य चाखायला मिळणार नाही आणि ते उमजणारही नाही.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org