मराठी मातीचे वैभव- २ प्रकरण २

२  आदर्शाच्या प्रकाशात विकसित झालेले व्यक्तिमत्व

तर्कतीर्थ श्री. लक्ष्मणशास्त्री जोशी

भारताच्या लोकशाही क्रांतीचा महिमा ज्यांच्या जीवनाने चांगला ध्यानात भरेल अशा अनेक व्यक्ती आधुनिक भारताच्या राष्ट्रीय जीवनात चमकून गेल्या; त्यांपैकीच यशवंतराव चव्हाण ही व्यक्ती होय.  अशा काही थोड्याच शक्ती झाल्या आहेत की, ज्यांच्या जीवनात भारताच्या वर्तमान युगाचा गर्भितार्थ अधिक खोलपणे सूचित होतो; या युगाच्या प्रेरणा, ध्येयवाद, स्थित्यंतरे आणि महत्त्वाच्या घडामोडी यांचा धन्यर्थ ज्यांच्या जीवनात उमटलेला आहे अशा थोड्या व्यक्तींपैकीच यशवंतराव चव्हाण हे होत.

ब्रिटिशांच्या राज्यस्थापनेपासूनची भारताच्या इतिहासाची गेली २००-२५० वर्षे हे एक महत्त्वाचे युग आहे.  पूर्वीच्या अनेक शतकांच्या आणि सहस्त्रकांच्या इतिहासापेक्षा हे युग संपूर्णपणे वेगळ्या ऐतिहासिक घटनांनी भरलेले युग आहे.  म्हणून यास युगांतर म्हणता येते.  अस्तित्व किंवा जीवन हे नित्य परिवर्तनशील असते.  जग जगते म्हणजे नित्य बदलत राहते.  जगाची ही परिवर्तनशीलता सामाजिक वा राष्ट्रीय जीवनात अधिक स्पष्ट होते.  काही थोड्या कर्तृत्वशाली व्यक्तींमध्ये ही परिवर्तनशीलता उत्कट प्रमाणात अनुभवास येते.  परंतु नुसती परिवर्तनशीलता म्हणजे इतिहास नव्हे.  काही विशिष्ट उत्कट घटना, आणि तशा घटनांच्या मालिका, इतिहास या संज्ञेस प्राप्त होतात.  बर्याचशा घटना काळाच्या पोटात गडप होतात, भूतकाळाच्या अंधारात त्यांचा मागमूसही राहात नाही.  कारण त्यांना ऐतिहासिक महत्त्व नसते.  विशेषतः समाजात किंवा राष्ट्रात गुणात्मक, अर्थपूर्ण वैशिष्ट्ययुक्त होणारी घडामोड म्हणजेच इतिहास होय.  इतिहास घडतो तेव्हा काही तोडमोडही अपरिहार्यपणे होते.  विकास घडविला जातो म्हणजे परंपरा मोडावीच लागते.  इतिहासातील वैशिष्ट्यपूर्ण अशा घडामोडीच्या नव्या घटनांची मालिका म्हणजे युगांतर होय.  सामाजिक वा राष्ट्रीय जीवनात नेहमीच काहीतरी अत्यंत मूलगामी समस्या निर्माण झालेल्या असतात.   जेव्हा अशा समस्या सोडविण्याचा प्रयत्न शिथिल होतो, मंद होतो, त्या समस्यांमध्ये सामाजिक जीवन कुंठित होऊन अगतिक व सुस्त बनते, तेव्हा त्यास अंधारयुग म्हणतात.  भारताचा भूतकाळ पाहिला तर अशा कुंठित अवस्थेत अनेक युगे निघून गेली.  रवींद्रनाथ ठाकूर यांनी म्हटल्याप्रमाणे निर्विकल्प योगसमाधीत गढलेला अस्थिपंजरावशेष असा हा भारत देश बनला होता.  या योग्याच्या चिरनिद्रेचा भंग नवयौवन-संपन्न अशा पश्चिमी संस्कृतीच्या गोर्य, बूट घातलेल्या पुरुषाने एका लाथेच्या तडाख्याने केला.  कठीण समस्यांचे पहाड डोळे उघडल्याबरोबर एकदम या योग्याला दिसले.  त्या समस्यांचे आव्हान स्वीकारले.  मुकाबला सुरू झाला.  इतिहास घडू लागला.  खुरटलेले अनेक दुर्धर मानसिक व्याधींनी जर्जर झालेले राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक दुरवस्थेचे विषादकारक आणि निराशाजनक चित्र ग्रामीण जीवनाचे होते.  इतिहास घडत नव्हता म्हणून विकासाचा स्पर्श कोठेही नव्हता.  अशाच ग्रामीण जीवनात ब्रिटिश पारतंत्र्याच्या उत्तरार्धात किंवा अखेरच्या अर्धशतकात यशवंतराव चव्हाण यांचा सातारा जिल्ह्यातील एका खेड्यात देवराष्ट्रे या लहानशा गावात एका गरीब शेतकर्याच्या घरात जन्म झाला.

समस्यांचे आव्हान स्वीकारणे व त्या समस्या सोडविणे यांचा अव्याहत क्रम यशवंतरावांच्या आयुष्यक्रमात दिसतो.  त्यांच्या वडिलाचे नाव बळवंतराव आणि मातुश्री विठाबाई.  यशवंतरावांच्या जन्माच्या वेळी विठाबाईंची सुटका लवकर झाली नाही.  आमचा कयास असा की, सुटका लवकर न होण्याचे कारण या बालकाचे डोके मोठे होते.  या धोक्यातून योगायोगाने सुटका झाली.  डोके मोठे असल्यामुळेच अखेरची ५-६ वर्षे सोडली तरी विलक्षण कठीण समस्यांचा मुकाबला यशवंतराव करू शकले.  ब्रिटिशांच्या द्वारे भारतात जवळ जवळ १५० वर्षे बीजारोपण झालेली आणि पसरत असलेली आधुनिक संस्कृती भारताच्या शहराच्या मर्यादा ओलांडून कोठेही फारशी गेली नाही.  मात्र स्वातंत्र्योत्तर काळात अलीकडे ग्रामीण भारताला ती स्पर्श करू लागली आहे.  यशवंतरावांचे जन्मगाव या आधुनिक नागरी संस्कृतीपासून त्या वेळी म्हणजे ७० वर्षांपूर्वी अगदी दुरावलेले होते.  यशवंतरावांचे पिताजी बळवंतराव यांचे प्राथमिक शिक्षण जेमतेम झाले होते.  पण नशीब काढायची अनिवार इच्छा होती. देवराष्ट्राची सीमा उल्लंघून कर्हाड येथे बेलिफाची नोकरी पत्करली.  अजूनही अगणित ग्रामीण व्यक्तींना खेडे सोडून शहरात पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्याकरता जावे लागते, तरी नागरी संस्कृतीपासून वंचितच राहावे लागते.  याला काही अपवाद सापडतात.  चव्हाणांचे कुटुंब असा हा क्वचित सापडणारा अपवाद होय.  आधुनिक संस्कृतीचा उदार वरदहस्त प्राप्त झाला म्हणजे जीवन-विकासाच्या वाटा दिसू लागतात.  कित्येकांची दृष्टी त्यामुळे क्रांतदर्शीही बनते.  याचे महाराष्ट्रातील अत्यंत अपवादभूत उदाहरण म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांचे होय. 

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org