मराठी मातीचे वैभव- ११

यशवंतरावांचं बावन्नकशी संस्कारित मन जे या वेळी एका क्षणी प्रकट झालं त्याला मात्र तोडच नाही.  त्या वेळी झालं ते असं.  संरक्षणमंत्री म्हणून यशवंतरावांचा कोल्हापूर भागात दौरा लागला.  पुढे एस्कॉर्टची एक गाडी, पाठीमागे एक.  मध्ये दस्तुर खुद्द यशवंतरावांची गाडी असे ते कोल्हापूरपासून पंधरा एक मैल अलीकडं आले.

''मुकादम'' वीर माने त्याच रस्त्यावर आपल्या डयूटीवर होते !  डोक्यावर नेहमीची राखी रंगाची फर कॅप होती त्यांच्या.  एस्कॉर्टची पुढची गाडी रस्त्याने भरधाव निघून गेली.  वीर माने यांना कोण खास असामी चाललीय याची काहीच कल्पना नव्हती.  आपले मैल-कुली आवरून ते रस्त्याच्या कडेला ही ''कटकट'' केव्हा एकदाची पसार होते आहे याची डोळ्यात धूळ जाऊ नये म्हणून ते किलकिले करून वाट बघत होते.  यशवंतरावांची मुख्य गाडीही पास झाली.  पन्नास एक मीटरवर जाऊन मात्र ती अचानक थांबली.  साहेबांनी स्वगत वाटावं असं सचिव श्रीपाद डोंगर्यांना म्हटलं - ''वीर माने दिसतात बहुधा.  श्रीपादराव गाडी थोडी रिव्हर्स घ्यायला सांगा. बघूया !''

त्या निर्जन रस्त्यावर भारताच्या संरक्षणमंत्र्याची गाडी थांबून परतून आली.  दार स्वतःच उघडून धोतराचा सोगा सावरत यशवंतराव रस्त्याच्या कडेला झपाझपा गेले.  भुवयांवर हाताची झड घेऊन डोळे बारीक करीत त्यांनाच निरखणार्या वीर मान्यांसमोर उभे ठाकले !

''ओळखलंत तरी ?  सांगा बघू.''  नेहमीच्या पद्धतीनं त्यांनी आपल्या जिवलग सत्याग्रही मित्राला प्रश्न टाकला.

गोंधळलेल्या, आता उतारवयानं थकलेल्या वीर मान्यांनी खिशातली चाळिशी काढून प्रथम डोळ्यावर चढविली.  माने अस्पष्ट पुटपुटले - '' यशवंत - बळवंत -''

- आणि साहेबांनी गाडीतून उतरतानाच हाताशी पडलेल्या हारातील सोबत घेतलेला हार स्वातंत्र्य सैनिक, बेडीमित्र बळवंत ऊर्फ वीर माने यांच्या गळ्यात क्षणात चढविला - ''बरोबर'' म्हणाले.  ते दोघे स्वातंत्र्य शिपाई एकमेकांना कडकडून उराउरी भेटले.  वीर माने तर फार संकोचून गेले होते.  दोघांच्याही मनात ४२ च्या मंतरलेल्या दिवसांच्या शिवकर स्मृतींच्या घंटा घणघणत होत्या.  आठवणीच आठवणी.  त्याही तुरुंगातील दोघांच्या मनात दाटल्यानं शब्द फुटत नव्हत्या.  ते दृश्य टिपायला कुठलाही कॅमेरा नव्हता.  साहेबांनी सावरत विचारलं ''काय वीर, कसं चाललंय ?  काही अडचण वगैरे ?''

''जी, काही नाही.  बेस चाललंय.  फार वर्षांनी भेट झाली.  काळीज भरलं.  तुमचं कसं काय चाललंय ?''  वीर मान्यांचा सवाल निकोप, रांगड्या व भाबड्या मनाचा होता.  निरपेक्ष मैत्रीपोटीचा होता.  साहेबांनी उत्तर दिलं, ''छान''.  त्या दोघांचा तो संवाद टिपायला कुठलाही टेपरेकॉर्डर नव्हता.

कुणीही प्रत्यक्ष संरक्षणमंत्री यशवंतरावांनी निर्मनुष्य रस्त्याच्या कडेला थांबलेल्या आपल्या जुन्या सत्याग्रही मित्राच्या गळ्यात हार घालून त्याला कडकडून मारलेली मिठी डोळ्यापुढे आणून बघावी.  फरकॅप घातलेले गळ्यात तो हार वागविणारे मुकादम वीर माने डोळ्यासमोर आणून बघावेत.  यशवंतरावांच्या मनाची नस नक्कीच कळेल.

मराठी मुलखातल्या सर्व भागातील, सर्व थरांतील जनतेला यशवंतराव हे आपलं दुखलं-खुपलं मन व त्याची कैफियत मांडण्याचं न्यायालय वाटे.  ते     महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद सोडून दिल्लीला गेले तरी ही नाळ काही तुटली नाही.  मध्यंतरी याबाबत म. टा. मध्ये आलेली बागलाण भागातील एक शेतकरी स्त्री गाठोडं बांधून थेट दिल्लीलाच कशी गेली, तिनं आपल्या जमिनीचा कायदेशीर गुंता साहेबांच्या कानी कसा घातला, त्यांनी तो अत्यंत सुहृद शांतपणे कसा ऐकून घेतला, नासिकच्या जिल्हाधिकार्यांना तात्काल ट्रंक जोडून तिची अडचण कशी समजावून सांगितली, शेवटी वेणूताईंच्या हस्ते तिची साडीचोळीनं ओटी भरून तिला अगत्यानं आपल्या एक-रेस कोर्स या दिल्लीच्या निवासात एक दिवस ठेवून घेऊन रेल्वेचे पहिल्या वर्गाचे तिकीट काढून आपल्या सचिवांना तिच्या सोबत स्टेशनपर्यंत पाठवून यशवंतरावांनी तिची बागलाणपर्यंतची परतीची बाळवण कशी केली याची केवळ हारून-अल-रशिदच्या चरित्रात शोभावी अशी सुरोचक कथा मराठी वाचकांनी डोळे विस्फारून वाचली आहे.

अनेक वेळा स्पष्टपणे आपल्या भाषणात यशवंतरावांनी स्पष्ट इन्कार केला होता की, ''मी प्रतिशिवाजी मुळीच नाही.  असलोच तर शिवरासाचे एक निष्ठावान भक्त आहोत, चाहते आहोत.''  तरीही भारावल्या जनसामान्यांनी त्यांना आपल्या रांगड्या मनाच्या कप्प्यात शिवरायांच्या लगीनं मानलं होतं हे अनेक सूर्यप्रकाशवत बोलक्या घटनांनी सिद्ध केलं आहे.  वानगीदाखल त्यातील एकच अशी घटना पुरेशी आहे की मराठवाड्यातील एक ठार अडाणी व वृद्ध अशा मराठमोठ्या, कष्टकरी बाईशी निगडित आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org