विदेश दर्शन - ८८

                                             दर्शन तिसरे

                           विदेश-मंत्री (ऑक्टोबर १९७४ ते मार्च १९७७)
----------------------------------------------------------------------------------------------------------------
४६ रोम
१९ जानेवारी, १९७५

पुन्हा या वर्षीच्या जानेवारीत काही तासांसाठी येथे राहिलो आहे. आज रविवार. दुपारी एक वाजता बेलग्रेडला विमान आहे.

गेल्या खेपेच्या असीसि आणि फ्लारेन्सच्या भेटीची तीव्र आठवण झाली. तुला एक वेळ असीसिला घेऊन जाण्याचे कबूल केले आहे - सेंट फ्रॅन्सिसला. त्यांचे आशीर्वाद आहेत, घडून येईल.

येथे फारसे कुठे हिंडता येईल असे दिसत नाही. ब्रेकफास्ट करून बाहेर पडू ते भटकत भटकत विमानतळावर जाऊ. नंतर युगोस्लाव्हमध्ये गर्दीचे व कामाचे तीन-चार दिवस जातील. तेथून निघताना मुंबईहून रात्री उशीरा निघालो परंतु विमानात झोप चांगली झाली. त्यामुळे आता स्नानानंतर खूपच फ्रेश वाटतंय. श्री. डोंगरे बरोबर आहेत. त्यामुळे चिंता नाही.

रात्री दादासाहेब भेटले. विमानतळावरही आले होते. छान वाटले. ती. आक्का, बाबूराव कोतवाल, राजा, अशोक भेटले.*  बराच वेळ बसले होते. अनेक घरगुती गोष्टीसंबंधी मोकळेपणाने बोलले. मुख्य चर्चेचा विषय होता - दादा घाडगे.
---------------------------------------------------------------------------------------------------
* राजा, अशोक हे यशवंतरावांचे पुतणे. बाबूराव कोतवाल हे भाचे.
--------------------------------------------------------------------------------------------------
दादासाहेबांनी दिल्लीला स्थळ शोधले आहे परंतु बाबाच्या डोक्यात प्रकाश पडेल तेव्हा खरे. असो, उगीच मनात आले म्हणून लिहिले.
बाकी नंतर बेलग्रेडहून.