विदेश दर्शन - ६७

३४ मॉस्को
२४ जून, १९७४

दहा वर्षांनंतर सोविएत रशियाला, विशेषत: मॉस्को विभागात पुन्हा काल सकाळी ९॥ (मॉस्को टाइम) पोहोचलो.

दहा वर्षांपूर्वीच्या स्वागत-समारंभासारखा थाट अर्थातच या वेळी नव्हता. बाकी आदरातिथ्य, स्वागत मनापासूनचे होते.

सोव्हिएटस्स्कॉया या हॉटेलमध्ये व्यवस्था आहे. जुने खानदानी हॉटेल आहे. व्यवस्था उत्तम आहे. या वेळच्या प्रवासामध्ये एकूण मला थकवा जास्त वाटला. प्रवासात तास-दीड तास झोपलो असेन तेवढाच.

पोहोचल्यापासून येथील धावपळीत झोप शक्यच नव्हती. जेव्हा थोडा वेळ मिळाला तेव्हाही पडून राहिलो. परंतु झोप नाही. काल रात्री ११॥ वाजता झोपलो. ५॥-६ तास झोप झाल्यामुळे सकाळी पुष्कळच हुशारी वाटली.

काल सकाळचा तेहरान ते मॉस्को प्रवास मात्र मनोरंजक झाला. सकाळची कोवळी सूर्यकिरणे पडू लागली होती, तेव्हा आमचे विमान इराणच्या उत्तर सीमेवर होते.

दूर बर्फाच्छादित शिखरे दिसू लागली नि स्पष्ट होऊ लागले की, सीमा जवळपास आहे. एकदम डाव्या बाजूला ढगांच्या वर डोके काढून सूर्यकिरणात चकचकणारे हिमाच्छादित असे एकुलते एक उंच शिखर दिसते. त्याच्या आसपास मैलोगणति काही दृष्टिपथात येत नव्हते.

हा एकाकी पहारेकरी कोण? अशी जिज्ञासा निर्माण झाली. चौकशी केली हवाईसुंदरीजवळ. मुंबईची उत्तम मराठी बोलणारी ही मुलगी माहितगार दिसली. तिने सांगितले की Holy Mountain Ararat म्हणतात तो हाच. तिने त्याचे धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व मोठया जिव्हाळयाने सांगितले. मला काहीसे आश्चर्य वाटले.

मी विचारले, तुला एवढी माहिती कशी? तिने मोकळेपणाने हसून सांगितले की माझी आई आर्मेनियन आहे. वडील सारस्वत - मंगलोरकडचे. तेहरानमध्ये असताना आईशी लग्न केले. घरात कोकणी बोलतो. मुंबईत मराठी वस्तीत राहतो. त्यामुळे मराठी मातृभाषाच झाली आहे. वगैरे वगैरे, ''एकूण सर्वच गोंधळ नाही?'' असं तीच म्हणाली. मी म्हटलं, ''तसं काही नाही, आता नव्या हिंदुस्थानमध्ये असेच होत राहणार आणि त्यात वावगे असे काहीच नाही.''

अरारतचे शिखर (शिखर शिंगणापूरची आठवण होते) तुर्कस्तानच्या हद्दीत आहे. ते पहात पहात आम्ही सोव्हिएट हद्दीत शिरलो.
 
अर्मेनिया, जॉर्जिया ओलांडून पुढे आलो तेव्हा कॉकेशियसची उंच तटबंदी लागते. मोठे मनोहर दृश्य होते.