१८ वॉशिंग्टन
सप्टेंबर २६, १९७२
ही सर्व हकिगत लंडनची झाली. दि. २३ ला दुपारी एक वाजता निघून साडेसात तासांच्या प्रवासानंतर वॉशिंग्टनच्या ४ वाजता, पॅन अमेरिकन सर्व्हिसने एकदाचे वॉशिंग्टनला पोहोचलो.
गेले चार दिवस कसलीच उसंत नाही. अनेक कार्यक्रमांनी गच्च भरलेले होते. आलो त्या दिवशी ऑफिसर्सशी डेलिगेशनसह चर्चा झाली. २४ ला G . 24* ची मीटिंग झाली. २५ ला I.M.F. वर्ल्ड बँकेची बैठक झाली. प्रेसिडेंट निक्सन १५ मिनिटांचे भाषण देण्यासाठी मधेच येऊन गेले.
I.M.F. चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. स्वाइट्झर (Pierre-Paul Schweitzer) (दिल्लीला सहकुटुंब आपणाला भेटले होते. त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी पाहिल्याचे आठवत असेल. तिला पॅरिसमध्ये कोणी गुंडाने हल्ला करून सु-याने वार केले होते. परंतु ती आता सुखरूप आहे असे तिचे वडील मी त्यांना भेटलो तेव्हा सांगत होते.) यांचे उत्तम भाषण झाले.
गेल्या संबंध वर्षात या माणसाची आंतरराष्ट्रीय कर्तबगारी नजरेत भरण्यासारखी झाली. अमेरिकेला चार शब्द-शहाणपणाचे-त्यांना सांगावे लागले. परंतु त्यामुळेच अमेरिका त्यांच्यावर नाराज असून त्यांच्या जागेवरून त्यांना बाजूला काढण्याची कारवाई सुरू केली आहे. त्याची प्रतिक्रिया अशी झाली की, ते भाषणासाठी उभे राहिले तेव्हा प्रेसिडेंट निक्सनपेक्षा कितीतरी अधिक असे स्वयंस्फूर्त टाळयांच्या गजरात त्यांचे स्वागत झाले.
श्री. मॅक्नामारा (जागतिक बँकेचे अध्यक्ष) उत्तम बोलले. त्यांचे भाषण म्हणजे आपल्या काँग्रेस पक्षाच्या 'गरीबी हटाव' चा जाहिरनामाच होता म्हणाना!
-------------------------------------------------------------------------
* G . 24 : Inter-Governmental Group of 24. परिशिष्ट पहा.
------------------------------------------------------------------------
काल संध्याकाळी स्वातंत्रदिनाच्या २५ व्या वर्धापन-दिनाच्या निमित्ताने राजदूत-निवासावर रिसेप्शन आखले होते. अनेक अमेरिकन पुढारी, पत्रकार हजर होते. मोठा गोड, आकर्षक मेळावा होता. अमेरिकन सरकारतर्फे मैत्रीचा 'टोस्ट' देण्यासाठी श्री. इर्विन होते. उत्तरादाखल मी बोललो. भूतकाळ विसरून संबंध सुधारण्याची आमच्या देशाची इच्छा आहे, हे मी आग्रहपूर्वक सांगितले.
सामान्यपणे अमेरिकन धोरण भारताला अनुकूल नाही. त्यांच्या मनामध्ये किंतु आहे. त्यांच्या अर्थमंत्र्यांना मी आज भेटलो. त्यानंतरही माझ्या मनावर तोच परिणाम राहिला. त्यांच्या जागतिक डावपेचांच्या आराखडयामध्ये भारताला महत्त्वाचे स्थान नाही. मोठी काळजी वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण करावयास हे लोक मागेपुढे पाहतील असे वाटत नाही. फार सावधानतेने राहिले पाहिजे.
वार्षिक बैठकीमध्ये आज संध्याकाळी ५ वाजता भारतातर्फे निवेदन केले. आता रात्री केनेडी सेंटरवरील कॉन्सर्ट ऐकून परत आलो आणि हे लिहिणे पुरे केले.