खरे म्हणजे युरोपमधील संगीताची ही एक राजधानी आहे. अनेक जगप्रसिध्द कंपोझर्स या शहरामध्ये राहिले व वाढले. मोझारत्, बीथोव्हेन ही नावे त्यांतील प्रमुख आहेत. त्यांच्या कलेची प्रथा आजही मोठया अभिमानाने या देशातील जनता आणि सरकार नुकसान सोसून जतन करीत आहेत.
आजच त्यांचा ऑपेरा पाहिला. ऑपेराबद्दल अनेकवेळा ऐकले व वाचले होते. परंतु प्रत्यक्ष पाहण्याचा योग आज आला. इतिहासप्रसिध्द ऑपेरा-हाउसमध्ये हा प्रयोग झाला. अर्थात् जुने ऑपेरा-हाउस युध्दामध्ये मोडून तोडून गेले होते. येथील सरकारने लक्षावधींनी खर्च करून पुन्हा ते उभारले आहे. जवळ जवळ २५०० माणसे बसतील अशी व्यवस्था आहे.
हा ऑपेरा म्हणजे संगीत नाटक आहे. संपूर्ण संगीतामध्येच नाटक चालते. पहिल्या प्रतीचे गायक नट, दर्जेदार ऑर्केस्ट्रा आणि तसेच रसिले प्रेक्षक यांचा मेळ बसला म्हणजे फारच बहार येते.
आज आम्ही जो ऑपेरा पाहिला त्याचे नाव Le Nozze De Firago (Marriage of Firago) असे आहे. गाण्याचे शब्द व कथा इटालियन आहे. संगीत मोझार्टने दिलेले आहे. याचा पहिला खेळ याच शहरात १७८६ मध्ये झाला होता.
जवळ जवळ २०० वर्षे हा खेळ सातत्याने चालूच आहे. असे अनेक आहेत. या सर्व ऑपेरांची माहिती देणारा एक मोठा ग्रंथ मला माहितगारांनी दाखविला. शब्द समजत नाहीत परंतु कथा समजते. संगीतातले गूढ समजले नाही तरी लय लागून जाते. तीन तास केव्हा निघून गेले लक्षातही आले नाही. फार दिवसांची इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान मिळाले.
आज दुपारी सभा संपल्यानंतर व्हिएन्नाचे बाहेर फिरावयाला बाहेर पडलो.
या शहराच्या उत्तरेस वृक्षराजीने भरलेला पहाडी प्रदेश आहे. डॅन्यूब नदीपासून व्हिएन्नाचे ईशान्येकडे आल्प्स पर्वतांची जी रांग सुरू होते, त्याचा श्रीगणेशा म्हणा हवेतर, इथून सुरू होतो.
आम्ही जेव्हा या wood मध्ये गेलो तेव्हा बारीकसा पाऊस पडत होता. आभाळ ढगाळ होते. आसमंत धुक्याने भरले होते. आम्हाला वाटले दिवस उदासीन व व्यर्थ जाणार.
या वनराजीमधील एका Fisherman's रेस्टॉराँमध्ये आमचे दुपारचे जेवण घेतले. वातावरण कसे अगदी घरगुती आणि प्रसन्न होते. आधुनिक हॉटेल्समधील कृत्रिम व नखरेबाजपणाचे प्रदर्शन तेथे नव्हते.
जेवणे संपवून आम्ही बाहेर आलो तो वातावरण बदलून गेले होते. आकाश मोकळे झाले होते. स्वच्छ उन्हे पडली होती. हवेत वा-यामुळे अर्थातच गारवा होता. या डोंगरमाथ्यावरून व्हिएन्ना शहराचे सुरेख दर्शन होते. कितीतरी वेळ आम्ही हे सर्व पहात भटकत राहिलो. मनामध्ये कितीतरी दिवस घर करून राहतील, अशा काही घटका या होत्या, यात संशय नाही.
तेथून आम्ही एक विलक्षण नवी गोष्ट पहाण्याचे एकाएकी ठरविले. व्हिएन्नापासून २० मैलांवर Seegrottee (cave lake) म्हणून ठिकाण आहे ते पहाण्यास गेलो.