सलामीज नंतर फामागुस्ता या बंदरावर आमचा मोर्चा वळला. हेही फार जुने शहर आहे. ग्रीक व तुर्क यांच्या संघर्षाचे प्रतिबिंब येथील लोकजीवनात स्पष्ट दिसून येते. व्यापार, राहणी व एकंदर शहरातील वातावरण, यावरून ग्रीक वस्ती आधुनिक वाटते. तटबंदीच्या आत असलेल्या जुन्या शहरात मात्र एकदम वेगळेपण जाणवते. आधुनिकतेचा काहीसा स्पर्श आहे, नाही असे नाही, परंतु फरक मात्र लक्षात येण्यासारखा आहे.
दोन्ही शहरांतून आम्ही भटकलो. तुर्की विभागात ६०० वर्षांपूर्वीचे एक जुने चर्च आहे. तुर्कांच्या आक्रमणानंतर ते चर्च मसजिद म्हणून वापरले जात आहे. आतबाहेर सगळी बांधणी चर्चचीच आहे. एका कोप-यावर मात्र एक मिनार चढविला आहे.
नव्या धर्मवेडयांनी जुन्या धर्मप्रतिकांवर विध्वंसक हल्ले करावेत असा जणू काय नियमच होता. आमच्याबरोबर एक प्रौढ ग्रीक स्त्री मार्गदर्शक म्हणून होती. ती म्हणाली, ''धर्माच्या नावाखाली किती शतकापासून मानव अत्याचार सहन करीत आहे! त्याचे दु:ख अजून संपलेले नाही.''
आजच्या मानवाची करूण कहाणीच तिच्या वाणीतून जणू बाहेर पडली.
आणि शेवटी पाहिली या बंदराची समुद्रकाठची तटबंदी!
याला Othello Tower असं म्हणतात. शेक्सपिअरच्या 'ऑथेल्लो' नाटकाची कहाणी येथे घडली आहे. डेस्डिमोनिया ही गौर सुंदरी आणि ऑथेल्लो हा काळा सरदार यांचे प्रेमप्रकरण या सागरतटाच्या पार्श्वभूमीवर रंगले; आणि याच सागराच्या किना-यावर, एका उंच तटावर संशयाने वेडा झालेल्या ऑथेल्लोने आपल्या प्रेयसीचा गळा दाबून खून केला.
या तटावर विमनस्क स्थितीत उभा राहून समोर उसळणारा समुद्र मी पहात होतो. मानवी जीवनातील अनंत काल चालणा-या संघर्षाचे जे कलाचित्र या नाटकात शेक्सपिअरने उभे केले आहे त्याला किती विलक्षण आणि रोमांचकारी पार्श्वभूमी त्याने निवडली आहे!
हा तट राहील किंवा जाईल. मशिदी आणि चर्चेसही कदाचित राहतील किंवा जातील. पण माणसाच्या जीवनांतील प्रीति आणि असूया, भक्ति आणि विद्वेष यांचे खेळ असेच अखंड चालू राहतील - जशा या समुद्राच्या लाटा किना-याला चाटून जात आहेत!
पुढचे उद्या लिहीन.