बोलण्यात गंभीरता होती. काय बोलावयाचे ते पूर्वी ठरल्यासारखे बोलत होते. पण त्यांच्या पूर्वीच्या, १९६१ च्या हिंदुस्थानला दिलेल्या भेटीची आठवण येताच मोकळे झाले. आमच्या प्रधानमंत्र्यांविषयी आवर्जून चांगले बोलले. जबरदस्त सत्तेवरचा माणूस पण सत्तेवरचे तेज दिसले नाही. कशामुळे असे असावे असा मी विचार करीत होतो. निवडून आलेला-नेमणूक झालेला प्रेसिडेंट म्हणून तर असे नसेल ना? शक्य आहे.
आमची चर्चा बरी झाली असे माहितगारांनी मत दिले. ५ वाजता एम्बसी-स्टॉफपुढे भाषण व तेथून १२ मैलांवर पोटॅमॅक नदीच्या पलीकडे असलेल्या टी. व्ही. स्टुडियोवर गेलो. Live cost-cost interview दोन नामांकित पत्रकारांशी टेलिव्हिजनवर झालेले हे संभाषण होते. ७॥ ते ८.
भारत - वृत्तपत्रीय स्वातंत्र्य आणि लोकशाही - प्रेसिडेंट फोर्ड- व परराष्ट्र नीति हे संभाषणाचे विषय होते. अर्धा तास केव्हा गेला ते समजले नाही.
वृत्तपत्र-स्वातंत्र्य म्हणजेच लोकशाही असे समीकरण असलेला हा देश आहे. त्यांची समजूत घालणे-पटविणे-कठीण आहे. त्यांच्याशी वाद न घालता शांतपणे आजच्या परिस्थितीची पार्श्वभूमी सांगणे व तिची अपरिहार्यता नजरेस आणणे हा उपयुक्त मार्ग मी या बाबतीत स्वीकारला होता.
भारताच्या लोकशाहीची परीक्षा भारतीय वस्तुस्थितीच्या (Realities) संदर्भात केली पाहिजे हा माझा मुख्य मुद्दा असे. त्यामुळे वादळ टळत असे आणि शांतपणे विषय स्पष्ट करता येत असे. आमची प्रचाराची हीच स्ट्रॅटिजी या देशात ठेवली पाहिजे.
८॥ वाजता डॉ. किसिंजरला एम्बसीमध्ये आमचे रात्रीचे भोजन होते. म्हणून घाईघाईने ८-२० पर्यंत पोहोचलो. कपडे बदलून पाहुण्यांच्या स्वागतात सामील झालो.
बरेच प्रमुख लोक निमंत्रित होते. सिनेटर्स, काँग्रेसमेन, मिनिस्टर्सही होते. सिनेटर मॅक्गव्हर्न हजर होता. निक्सनविरोधी प्रेसिडेंटचे इलेक्शन ७२ साली लढला होता. त्याने इलेक्शन जिंकले असते तर कदाचित् अमेरिकेचे भारताशी संबंध अधिक जवळकीचे झाले असते अशी माझी भावना होती. त्यामुळे त्याच्या ओळखीने मला आनंद वाटला.
सकाळी ७ ला इंटरनॅशनल कमिटी ऑफ दि हाऊसची चर्चा झाली नंतर पुन्हा एकदा टी. व्ही. वर इंटरव्ह्यू. जॉईंट कमिशनरची दुसरी बैठक दीड वाजता संपली. आमच्या सन्मानार्थ डॉ. किसिंजरची लंच स्टेट डिपार्टमेंट मध्ये झाली. पुन्हा एकदा भाषणे झाली. जेवणानंतर डॉ. किसिंजरशी चर्चेची दुसरी बैठक तासभर झाली.
जॉइन्ट कमिशनने काही निश्चित निर्णय घेतले आहेत. गाडी रुळावर आहे. हळूहळू गति दिली तर प्रगति व्हावी अशी माझी धारणा आहे.