६२ न्यूयॉर्क
३१ ऑगस्ट, १९७५
बोगोटा येथून लिहिले त्यात म्हटले होते की, दुसऱ्या दिवशी सकाळी निघेन. पण सकाळचे विमान निघालेच नाही. सकाळी १० चे ऐवजी ते संध्याकाळी ६॥ वाजता निघालो. त्यामुळे अधिक आठ तास मिळाले.
आम्ही आमचे हॉटेल सोडले होते. त्यामुळे राजदूत श्री. मदनजीत यांच्या घरी गेलो.
गोल्ड म्युझियम ही इथली पाहाण्यासारखी प्रसिध्द गोष्ट. तेथे तासभर काढला. कोलंबिया, पेरू हे देश सोन्याच्या खाणीसाठी प्रसिध्द. येथील प्राचीन संस्कृति-काळातहि सोन्याचे महत्त्व व उपयोग सर्वमान्य होता. स्पॅनिश नेत्यांनी पुष्कळ लुटालूट करूनही काही अवशेष जे त्यांच्या नजरेतून सुटले ते याचा पुरावा देतात.
हे अवशेष या म्युझियममध्ये आहेत. स्त्रियांच्या अनेकविध दागिन्यांचे नमुने पहावयास मिळतात. त्यांत स्त्री-सौंदर्याचा सन्मान करण्यापेक्षा त्यांच्या गुलामगिरीचे अधिक दर्शन होते. निदान मला तरी तसे वाटले.
नमुन्यासाठी एक उल्लेख करतो. ओठांना छिद्रे करून सोन्याचा जाडजूड दागिना त्यांत कायमचा बसवतात असे सांगितले. त्या दागिन्याचा नमुना दाखविला. सोन्याने तोंड बंद करण्याची ही पुरुषी हुषारी कशी काय वाटते?
३१ ऑगस्टला रात्री १ वाजता न्यूयॉर्कला पोहोचलो. कार्लाईल हॉटेलमध्ये येऊन झोपण्यासाठी २ वाजले.
दुसऱ्या दिवशी १ सप्टेंबरला स्पेशल सेशन सुरू होणार होते व २ सप्टेंबरला माझे भाषण होते. त्यामुळे १ सप्टेंबर, या सर्व तयारीत चर्चा-गाठी-भेटी यांत गेला.
येथील आपले P. R. श्री. रिखी जयपाल हे अत्यंत बुध्दिमान पण निगर्वी व मनमिळावू असे गृहस्थ आहेत. फॉरिन सर्व्हिसेसमधील काही तरुण अधिकारी या परिषदांच्या निमिंत्ताने माझ्या संपर्कात आले.
कोणालाही अभिमान वाटावा असे हे तरुण आहेत. त्यांचा व्यासंग चर्चेतील कुशलता, परिश्रमांची तयारी, लेखनातील चापल्य अत्यंत उपयोगी पडले.
श्री. साद हाशमी कृष्णन (gusn) मिस् घोष हे विशेष महत्त्वाचे वाटले. One must watch their future. श्री. शरद काळे हे या लोकांत चांगलेच मिसळले आहेत. त्यांचीही मदत झाली.
१ सप्टेंबरला मध्यरात्रीनंतर अखेरचा ड्राफ्ट तयार झाला. सकाळी उठल्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा जो चर्चेत निघाला होता तो नजर चुकीने राहून गेला होता. त्यासाठी धावपळ करून एक नवा परिच्छेद तयार केला. २ सप्टेंबरला १२-४५ ला या इतिहासप्रसिध्द अधिवेशनात माझे पहिले भाषण झाले.
आपले म्हणणे स्पष्ट पण समजूतदार शब्दांत मांडले होते. त्यामुळे सर्वांनी येऊन अभिनंदन केले. त्यांत अमेरिका, जर्मनी होते. त्याचप्रमाणे अल्जिरिया आणि इतर डेव्हलपिंग देशही होते.