विदेश दर्शन - ९६

५१ Montego Bay
२ मे, १९७५

काल मी आर्थिक प्रश्नावर बोललो. श्री. विल्सन बर्न हॅम (गियाना) यांनी दोन पेपर्स परिषदेपुढे ठेवले होते. त्या अनुषंगाने बोलणे प्राप्त होते.

बर्न हॅमनी डेव्हलपिंग देशांची बाजू मांडली. त्यामध्ये कळकळ, काहीसा संताप होता आणि निर्धारही. काही क्रांतिकारक बदल आणि आंतरराष्ट्रीय संस्थांची मुलभूत पुनर्रचना झाली पाहिजे असे सांगितले.

मला यात नवीन काही वाटले नाही. जागतिक बँकेच्या अधिवेशनामध्ये आणि C 20* मध्ये हे विचार मी अनेक वेळा मांडले आहेत. जगातील गरीब व श्रीमंत राष्ट्रांतील आर्थिक व सामाजिक विषमता घालवावयाची असेल तर संपत्तीची पुनर्वाटणी होईल अशी काही व्यवस्था व्यापाराच्या क्षेत्रांत व इतर आर्थिक क्षेत्रांत व्यवहार करणाऱ्या संस्थांच्या पुनर्मांडणीच्या रूपाने झाली पाहिजे. हे माझ्या विचाराचे सूत्र होते. Real transfer of Resources झाले पाहिजे हा मूलमंत्र आहे.

पण श्रीमंत विकसित देश हे सर्व मख्खाप्रमाणे फक्त गंभीरपणे ऐकून घेतात आणि निर्णय घ्यावयाच्या वेळी त्यांना हवे तसेच वागतात हा माझा अनुभव आहे. S D R-Link चा प्रश्नही मी पुन्हा मांडला.

आज साऊथ आफ्रिकेच्या प्रश्नाची पुन्हा चर्चा सुरू झाली. तेव्हा थोडी गरमा-गरमी झाली. युगांडाचा प्रतिनिधी त्याचा अध्यक्ष अमीनतर्फे काही मूर्खासारखा बोलला. केनेथ कौंडा फारच रागावले. म्हणाले, 'I don't easily suffer fools.‘ चेअरमन मॅनलीने त्यांना आवरले. सामान्यत: अशा परिषदेत असे कधी होत नाही. पण कौंडाचे रास्त होते. मालावी, युगांडा आणि केनिया यांचे वागणे इतरांपेक्षा काहीसे वेगळेच वाटले.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* C-20 The Committee on Reform of the International Monetary System and Related Issuses. (परिशिष्ट पहा.)
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org