विदेश दर्शन - ९५

श्री. व्हाइटलॅम (ऑस्ट्रेलिया) आपल्या उंच व्यक्तिमत्वाने झटकन् डोळयांत भरतात. सर्वांशी मनमोकळे बोलतात, मिसळतात. अविकसित देशांबद्दलची आपुलकी दाखविण्याचा प्रयत्न दिसतो.

उंचीमुळे आठवण झाली. पॅसिफिकमधील बेटांतील बहुतेक प्रतिनिधी त्यांच्या उंचीमुळे (शारीरिक) उठून दिसतात. फिजी व टोंगोचे दोन्ही पंतप्रधान शरीराने खूपच उंच आणि जाडजूड आहेत. बोलणे मात्र सौम्य व वागणेही समंजसपणाचे होते.

न्यूझीलंडचे श्री. Wallace Rowlind अतिशय सरळ व कळकळीचे गृहस्थ वाटले. एका जेवणाचे वेळी त्यांची भेट झाली. त्या वेळच्या त्यांच्या वागण्यावरून व त्यांच्या दोन भाषणांवरून माझा त्या माणसाबद्दलचा आदर वाढला आहे.

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडचे या खेपेचे तीन्हीही पंतप्रधान लेबर पक्षाचे प्रतिनिधी आहेत हा एक योगायोगच आहे. कॉमनवेल्थ परिषदेमध्ये हे प्रथमच घडले आहे, असा मुद्दाम उल्लेख श्री. व्हाइटलॅमनी केला.

कॅनडाचे पंतप्रधान श्री. ट्रयूडो काहीसे अलिप्त वाटले. सर्व चर्चांना सर्व वेळ हजर होते. परंतु अजून बोलले नाहीत. या सर्व कॉमनवेल्थ प्रकरणात त्यांना किती राजकीय रस आहे ते सांगता येत नाही. जागतिक परिस्थितीत वेगाने घडलेल्या फरकांमुळे आणि अमेरिकेच्या प्रांगणातील वास्तव्यामुळे सर्व धोरणांची परीक्षणे चालू असावीत. त्यामुळे घाईने काही बोलण्याची तयारी दिसत नाही एवढेच.

आफ्रिकेमधून आलेल्या सर्व प्रतिनिधींमध्ये World stature चे दोन नेते आहेत. प्रेसिडेंट ज्युलिएस न्येरेरे आणि प्रेसिडेंट केनेथ कौंडा. दोघांची भाषणे प्रौढ व आत्मविश्वासाची वाटली. साऊथ आफ्रिकेचा प्रश्न धैर्याने पण मुत्सद्देगिरीने सोडविण्याचा त्यांचा निर्धार आहे.

दोघांचेही वक्तृत्व पहिल्या प्रतीचे आहे. कर्तृत्ववान नेते म्हणून त्यांच्या शब्दाला एक नवे वजन होते. प्रे. न्येरेरेचे उत्स्फूर्त भाषण मला फार आवडले.

नायजेरियन प्रेसिडेंट जनरल श्री. गोआन हा तरुण गृहस्थ आहे. प्लेझंट पर्सनॅलिटी! विचारपूर्वक बोलतात. Must watch him. बाकी आफ्रिकेचे प्रतिनिधी अजून कोणी फारसे बोलले नाहीत. आफ्रिकेमधील विदेशमंत्र्यांची नवी पिढी 'डायनॅमिक' वाटली.

काल इंदिराजींना दिलेल्या लंचचे वेळी Sierra leone चे पंतप्रधान भेटले. वयस्कर व काहीसे दांडगेश्वर वाटले. परंतु त्यांच्या संभाषणावरून मोठी हुषार वल्ली दिसली. जुने, अनुभवी ट्रेड युनियनचे कार्यकर्ते म्हणून राजकारणात वाढलेले आहेत.

राज्यकर्त्यांनी ट्रेड युनियन्सवर कबजा ठेवला पाहिजे असे आग्रहाने सांगत होते. डेव्हलपिंग देशांमध्ये संपामुळे निर्माण होणाऱ्या अनागोंदी परिस्थितीची सर्वसामान्य चर्चा चालू होती. त्यांनी सांगितले की, मी निरर्थक तात्त्विक प्रश्नामध्ये फसत नाही. ट्रेड युनियन्स या 'राइट डिमांड अॅन्ड राँग डिमांड' असा फरक कधी करूच शकत नाहीत. आपली मागणी रेटण्याची शक्ति असली म्हणजे झाले. रास्तपणाची त्यांची हीच कसोटी असते. ते म्हणाले, In my case I begin at the beginning. म्हणजे काय म्हणून विचारले तर म्हणाले, म्हणजे, ट्रेड युनियन्सच्या निवडणुकी होतात त्यावेळी मी दक्ष असतो. आपली माणसे स्वच्छ त्यात घुसवितो. त्यामुळे ठीक चालले आहे. राज्यकारभाराच्या इतर प्रश्नांबद्दलही अशीच स्पष्ट मते देत होते. त्यांची मते योग्य की आयोग्य हा प्रश्न वेगळा. पण व्यावहारिकपणाच्या कसोटीवर ती बरोबर आहेत याबाबत ते स्वत: बिलकूल नि:शंक दिसले.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org