विदेश दर्शन - ६८

कालचा दिवस काहीसा तयारीत गेला. एम्बसीमध्ये दोन तास वाटाघाटींचा तपशील कसा मांडावा या चर्चेत गेला. दुपारी टेलिव्हिजन टॉवर पहाण्यास गेलो.

मी पूर्वी पाहिलेल्या मॉस्कोत ही चीज नव्हती. १९६७ मध्ये बांधली आहे. १५००-१६००० फूट उंच रॉकेटच्या आकाराची ही इमारत आहे. प्रेक्षणीय आहे. काल रविवार असल्यामुळे हजारो रशियन स्त्री-पुरुष रांगा लावून पहाण्यासाठी, लिफ्टच्या दाराशी उभे होते.

दुपारचे जेवण याच इमारतीत असलेल्या रेस्टॉराँमध्ये घेतले. हे रेस्टॉराँ ९०० ते १००० फूट उंचीवर आहे. ते सारखे फिरत असते. अर्ध्या तासात एक फेरी पुरे करते. इथे बसून सर्व मॉस्को शहर उत्तम पहाता येते.

संध्याकाळी, बोल्शिव्हा थिएटरमध्ये इटॅलियन (मिलानच्या प्रसिध्द कंपनीचा) ऑपेरा पाहिला. फारच बहारदार झाला. अर्थात् शब्द इटॅलियन होते परंतु संगीत सर्वांचे होते. गेले तीन महिने हा ऑपेरा चिक्कार गर्दीत येथे चालू आहे. कालचा शेवटचा दिवस होता. थिएटरमध्ये स्पीकर, श्री. धीलाँ सहकुटुंब भेटले. तेही येथे दौऱ्यावर आले आहेत.

उद्यापासून दोन दिवस चर्चा आहेत. अजून बडेमियांची भेट ठरलेली नाही. होईल का नाही निश्चित कोणीच सांगत नाहीत. प्रेसिडेंट निक्सन २७ ला येथे येत आहेत. त्या भेटीच्या तयारीत सर्व गुंतले आहेत असे सांगितले जाते. शक्य आहे.

दहा वाजता वित्तमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी जावयाचे आहे आणि काही कागदपत्रे चाळावयाची आहेत. तूर्त येथेच थांबतो.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org