विदेश दर्शन - ६५

३३ वॉशिंग्टन

१३/१४, जून, १९७४

येथे येऊन पाच-सहा दिवस होऊन गेले. लिहीन म्हटले तरी उसंतच मिळाली नाही. सकाळी, दुपारी कॉन्फरन्स, लंच आणि डिनर्स. सर्व बांधून घेतलेले कार्यक्रम. उजवीकडे किंवा डावीकडे पहायला जागा नाही अशी परिस्थिती.

आलो त्या दिवशी मुंबईसारखे येथे गरम होते. आणलेले गरम कपडे एकदम निरुपयोगी. खादीचा सूटच खरा उपयोगी पडला.

या खेपेला येतानाचा विमानाचा प्रवासही कंटाळवाणा झाला. निघण्यापूर्वी पाच तास आधी उजाडलेले होते. त्यानंतर १४-१५ तास प्रवास करून लंडनमध्ये पोहोचलो तेव्हाही उजेडच होता. त्यामुळे झोप अशी आलीच नाही. प्रयत्न करून सुध्दा. एअर-पोर्टच्या शेजारी एक्सलसिअर हॉटेलमध्ये एक रात्र राहिलो. कंपोजची झोपेची गोळी घेऊन झोपलो. ५-६ तासांच्या झोपेनंतर सकाळी काहीशी हुषारी वाटली.

या खेपेला बाहेरच्या या मुक्कामात प्रकृति बरी नाही राहिली. रात्रीची झोप अर्धवट. बरे नसल्याची भावना सतत राहिली. एक रात्री तर कण्हत राहिलो. अंग गरम नव्हते पण कणकणी वाटली. सॅकरिन घेऊन झोपलो. तेव्हा काहीसे बरे वाटले. या खेपेला हा काहीसा नवा अनुभव आला.

C 20 च्या मुख्य मीटिंगला या वेळी विशेष महत्त्व होते. कारण ती शेवटची मीटिंग होती. गेली दोन वर्षे सतत प्रयत्न केल्यानंतर त्यातून काही निष्पन्न तर केले पाहिजे!

बऱ्याच देशांचे प्रतिनिधी बदलले होते. चेअरमन अलिवर्धनम्, स्वीडनचा मंत्रि आणि मी एवढेच पहिल्या मीटिंगपासून अखेरपर्यत राहिलले प्रतिनिधी कायम होतो. बाकीचे एकसारखे बदलत राहिले. विशेषत: फ्रान्सचे गिस्कार्ड, जर्मनीचे स्मिथ, इंग्लंडचे बार्बर व यू. एस्. ए. चे श्री. शुल्ट्झ् यांची गैरहजेरी भासली. श्री. बार्बरचे जागी यू. के. चे प्रतिनिधी चॅन्सेलर डेनिस ही आले होते. १९६४ साली रक्षामंत्रि म्हणून आम्ही दोघे इंग्लंडमध्ये भेटलो होतो. त्याची त्यांनी आठवण काढली.

डिफेन्सवर खर्चच खर्च करणारांना वित्तमंत्रि करून खर्चावरचे पहारेकरी करण्यात नियतीने काही मजेदार खेळ केला आहे नाही? असे ते विनोदाने पण मार्मिकपणे म्हणाले. या मीटिंगमध्ये त्यांच्या राजकीय अनुभवाचा उपयोग मी करून घेऊ शकलो. LINK च्या प्रश्नावर जर्मनी व यू. एस्. ए. यांची मने वळविण्यात त्यांची बरीच मदत झाली.

G 24 मध्ये अविकसित देशांची एकी टिकविण्याचे महत्त्वाचे काम घडले. अल्जेर्सचा तरुण वित्तमंत्रि या कॉन्फरन्सचा चेअरमन होता. त्या नात्याने त्याला महत्त्वाचा रोल होता. त्याची माझी युती चांगलीच जमली. परिषदेपूर्वीच त्याने मला आग्रहपूर्वक लिहिले होते.

या शेवटच्या सभेसाठी जर G 24 चा आम्ही उपयोग करू शकलो नसतो तर सर्व व्यर्थ होते. ता. १३चा म्हणजे आजचा सर्व दिवस याच नाटयमय घडामोडीत गेला.

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org