विदेश दर्शन - ६४

३२ न्यूयॉर्क
१४ मे, १९७४

आज दिवसभर न्यूयॉर्कमध्ये काढला. सी .व्ही. नरसिंहन् यांच्याकडे लंच घेतले. दुपारनंतर दीड-दोन तास इकडे-तिकडे मोटारीतून भटकलो-न्यूयॉर्क पाहाण्यात.

येथे सकाळी येणे आणि संध्याकाळी येथून जाणे हा माझा नित्याचाच कार्यक्रम झाला आहे. तेच ते रस्ते व इमारती पहात असतो. पुन्हा विसरत असतो. केव्हातरी येथे एक-दोन दिवस राहिले पाहिजे. न्यूयॉर्कमध्ये ब्रॉडवेवरील प्रमुख थिएटरमध्ये नाटक पाहण्याचे माझे अजून राहून गेले आहे.

यू. एस्. ए. मध्ये वॉटरगेटचेच वातावरण खच्चून भरले आहे. अध्यक्ष निक्सनच्या इंपीचमेंटची तयारी सुरू आहे. सर्व वृत्तपत्रांतून याच प्रश्नांची चर्चा सुरू आहे. त्यात डॉ. किसींजरने राजनाम्याची धमकी देऊन भर टाकली आहे. चांगला गुणी माणूस म्हणून तो सर्वांना हवासा आहे. परंतु हा पोरकटपणा करावयास नको होता असे काहींचे म्हणणे आहे.

हिंदुस्थानबाबत दोन प्रश्न विचारले जात होते.

१)  न्युक्लिअर एक्स्प्लोजन आणि     २) आर्थिक परिस्थितीचे गांभीर्य.

अणुसंशोधनाबाबत आमचा दृष्टिकोन आम्ही तपशीलाने सांगत असतो. काहींना तो समजतो परंतु काहींना तो समजूनही पटत नाही. अणुस्फोट आणि तो शस्त्रासाठी नाही ही गोष्ट दुर्दैवाने त्यांना समजतच नाही. त्यांची टीका दोन दृष्टीने असते. हिंदुस्थानने आजपर्यंत नैतिक भूमिका (अणूबाबत व जागतिक शांततेबाबत) घेतली, तिच्याशी हे सुसंगत नाही. दुसरी, उपाशी - गरीब हिंदुस्थान हा बॉम्ब कशाशी खाणार? या लागट दृष्टीने होते.

हिंदुस्थानच्या आर्थिक परिस्थितीबाबतही विलक्षण अतिरेकी चित्र हिंदुस्थानचे मित्र म्हणविणारेच काढीत असतात. हिंदुस्थानचे राजकीय स्थैर्य संकटात आहे अशी कल्पनाचित्रे तयार करतात.

आमच्यापुढे अडचणी सर्वांप्रमाणे जरूर आहेत. परंतु आम्ही त्यांच्यावर मात करू शकू असे विश्वासाचे उत्तर, माहितीच्या आधारे आम्ही देत असू. पण पर कॅपिटावर त्यांचे गणित आधारलेले असल्यामुळे त्यांचा किती विश्वास बसतो कोण जाणे!

यशवंतराव चव्हाण सेंटर

जन.जगन्नाथराव भोसले मार्ग,
नरिमन पॉईंट, मुंबई – ४०००२१

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : info@chavancentre.org